Tuesday, January 13, 2009

रामायण बालकांड - भाग ३

दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टि यज्ञ केला अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात त्याने अश्वमेध केला. यावेळी दशरथाचे वय काय असावे? पुढे विश्वामित्राच्या आगमनाचे वेळी ’आपण साठ वर्षांचे आहोत व राम जेमेतेम सोळा वर्षांचा आहे’ असे तो म्हणाला. यावरून यज्ञाचे वेळी तो साधारण ४२-४३ वर्षांचा होता. म्हणजे अपत्ये होण्याचें त्याचें वय गेलेलें नव्हतें. मात्र तीन विवाह करूनहि पुत्रप्राप्ति झाली नव्हती. पुढे उल्लेख अहे कीं तीन राण्यांशिवाय त्याचा इतरहि बराच राणीवसा होताच! थोर असे वसिष्ट ऋषि राजाचे दरबारात असूनहि अश्वमेधाची जबाबदारी त्यानी स्वीकारली नाही! त्यासाठी ऋष्यशृंग ऋषीना बोलावून घ्यावे असा त्यानी दशरथाला सल्ला दिला. त्यानी असे कां केले असावे? दशरथाचा यज्ञ नेहमींचा अश्वमेध नव्हता. पुत्रप्राप्ति हा हेतु होता. पुत्रप्राप्तीच्या हेतूने करावयाच्या यज्ञामध्ये काही गौणत्व मानले जात होते काय? महाभारतातहि, द्रुपदाचा यज्ञ करण्यास कोणी ब्राह्मण / ऋषि तयार नव्हता असे म्हटले आहे. कदाचित या गौणत्वामुळेच वसिष्ठाने स्वत: यज्ञ चालवला नसावा.
या ऋश्यशृंगाची कथा मजेदार आहे. जन्मापासून तो वनात पिता व इतर ऋषिमुनि यांच्याच सहवासात वाढला होता. त्यामुळे त्याला स्त्रीरूप माहीतच नव्हते! रोमपाद नावाच्या राजाच्या राज्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता व ’ऋष्यशृंग तुझ्या राज्यात रहावयास आला तर त्याच्या पुण्याईने पाऊस पडेल’ असे त्याला सांगण्यात आले. त्याला मोहात पाडून घेऊन येण्याची कामगिरी वेश्यांकडे सोपवली गेली. त्यांना पाहून, या स्त्रिया हे न कळल्यामुळे हे कोणी वेगळ्याच प्रकारचे मुनि आहेत असे त्याला वाटले! मात्र रोमपादाच्या इच्छेप्रमाणे ऋष्यशृंग त्याच्या राज्यात आला व मग त्याच्या पुण्याईने रोमपादाचे पाप नष्ट होऊन पाऊस पडला! रोमपादाने आपली कन्या शांता त्याला दिली व ऋश्यशृंग त्याचेपाशी राहिला. दशरथाने आमंत्रण दिले त्याचा मान ठेवून रोमपादाने ऋश्यशृंगाला त्याचेकडे पाठवले. पूर्ण एक वर्षभर तयारी चालून मग दशरथाचा अश्वमेध झाला. त्याची कथा पुढील भागात पाहूं.

4 comments:

  1. फार सुंदर लिहिल काका. प्रश्न फक्त एकच तो असा कि हृष्याशृंग ऋषि ह्यांना रोमपाद राजाने आपली मुलगी शांता दिली . ही शांता दशरथ राजाची मुलगी होती आणि रोमपाद नि तिला दत्तक घेतली \होती अस काही माझ्या वाचनात आल आहे . त्या वर थोडा प्रकाश टाकळ?

    ReplyDelete
  2. बालकांड पुन्हा एकदा नजरेखालून घातले. आपण म्हणता तसा कोणताही उल्लेख मला दिसला नाही. शांता ही रोमपादाचीच मुलगी असाच स्पष्ट उल्लेख आहे. दशरथाचा उल्लेख तोपर्यंत अपत्यहीन असाच केला आहे.

    ReplyDelete
  3. नमस्कार काका कदाचित तुम्ही रेफर केलेल्या बाल कांड मधे ही माहिती नसेल. पण याच उल्लेख मात्र रामायणात आहे मला नक्की आठवत नाहीए की ते वाल्मिकी रामायण होत कि कांबन किंवा तुलसीदास रचीत रामायण. नेट वर माहिती सर्च करताना हा लिंक सापडला. http://www.geocities.com/mahaabhaarat/witnesses/index-n-z.htm ह्या लिंक वर महाभारत आणि रामायणात असणार्‍या व्यक्ति रेखांचा संक्षिप्त परिचय दिलेला आहे त्यातच रोम पाद राजा ची माहिती दिली आहे. अर्थात ह्या माहितीचा नक्की स्रोत मी पुढे देईनच.

    ReplyDelete
  4. मी प्रथमच सांगून टाकले आहे कीं माझे वाचन वाल्मिकिरामायणाच्या मराठी भाषांतरापुरतेच आहे. आपली माहिती विचारात घेतली तर दशरथाला बर्‍याच पूर्वी अपत्य झाले होते म्हणावे लागते. कोणत्या राणीला? एकच कन्या झाली व तीहि दशरथाने दत्तक देऊन टाकली हे जरा चमत्कारिकच वाटते. तसेच या शांतेचा रामायणात पुढे कोठेहि उल्लेख नाही.
    मूळ वाल्मिकि रामायणात तसा उल्लेख नसताना तिला दशरथाची कन्या मानणे मला फारसे पटत नाही.

    ReplyDelete

Locations of visitors to this page