Friday, January 30, 2009

रामायण बालकांड - भाग ६

चौघा राजपुत्रांचे बालपण संपण्याच्या सुमारासच विश्वामित्र ऋषि दशरथाकडे आले व यज्ञाला उपद्रव देणार्‍या मारीच सुबाहु वगैरे राक्षसांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी रामाची मागणी केली. दशरथ स्वत: एक अक्षौहिणी सैन्य घेऊन मदतीस जाण्यास तयार होता पण विश्वामित्राला रामच हवा होता. वसिष्ठांनी विश्वामित्रांचा सर्व महिमा सांगून त्यांचा हवाला दशरथाला दिला व मग राम-लक्ष्मण विश्वामित्राबरोबर गेले. यावेळी भरत कोठे होता? रामाबरोबर जाण्यासाठी त्याचे नाव पुढे आले नाही. तो कदाचित आजोळी असावा. राम-लक्ष्मण यावेळी १५-१६ वर्षांचे होते. राम अजून १६ वर्षांचाहि झालेला नाही असे दशरथच विश्वामित्राला म्हणाला होता.
यज्ञाला त्रास देणारा मारीच हा सुंद व ताटकेचा पुत्र. सुबाहु हा उपसुंदाचा पुत्र पण ताटकेचा पुत्र असा स्पष्ट उल्लेख नाही. सुंद-उपसुंद हे मोहिनीच्या मोहात पडले व आपसात लढून मेले पण त्याना त्यापूर्वी ताटकेपासून पुत्र झाले होते असे दिसते. ताटका स्वत: सुकेतु यक्षाची कन्या. मग या सर्वांची गणना राक्षसांत कां होते? यज्ञसंस्कृति न मानणारे ते राक्षस असे म्हणावे तर राक्षसराज रावण हा स्वत: यज्ञ करीत असे! अगस्तीच्या शापाने मारीच-सुबाहु राक्षस झाले असे म्हटले आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांची राक्षसांत गणना होत असावी. रामायणातील राक्षस व वानर कोण हे एक न उलगडणारे कोडे आहे. वानर इतरत्र कोठेहि नाहीत. राक्षस मात्र सर्वत्र असतात पण त्यांचे जन्म क्षत्रिय वा ब्राह्मण कुळांत असतात. त्यांच्या मनोवृत्ति वा वर्तणुकीमुळे त्यांची गणना राक्षसांत होत असावी. उदा. रावण, जरासंध वा कंस.
यानंतर येणारी ताटकावधाची, सगर/भगीरथांची व समुद्रमंथनाची कथा मी बाजूस ठेवणार आहे. भगीरथाने गंगा भूमीवर आणणे हे एक रूपक आहे व गंगेचे खोरे शेतीखाली आणण्याशी त्याचा संबंध असावा असा माझा तर्क आहे. समुद्रमंथन कथेमध्ये एक गमतीचा उल्लेख मिळाला. समुद्रमंथनातून बाहेर आलेली सुरा, म्हणजे दारू, ही देवांनी पळवली, राक्षसांनी नव्हे! सुरा पिणारे ते सुर व न पिणारे ते असुर असे चक्क म्हटले आहे! तेव्हा आपणाला असुर म्हणवून घ्यावयाचे नसेल तर सुरा प्यावी लागेल! पहा बुवा!
यापुढील प्रसंग पुढील भागात.

Tuesday, January 27, 2009

रामायण बालकांड - भाग ५

यापुढच्या सर्ग १७ मध्ये अनेक देवांनी याचवेळी अनेक वानरवीरांना जन्म दिला असा खुलासेवार उल्लेख केला आहे. त्यांत सर्व प्रमुख वानरवीरांचा उल्लेख आहे. यातील अद्भुतरस मी सोडून देतो. वाली हा इंद्रपुत्र व सुग्रीव हा सूर्यपुत्र असे म्हटले आहे. त्यावरून ते जुळे भाऊ नव्हते हें उघड आहे. मात्र ते दिसावयास अतिशय सारखे असल्यामुळे पुढे द्वंद्वयुद्ध करणार्‍या दोघांपैकी वाली कोण व सुग्रीव कोण हे रामाला ओळखू येईना व पहिल्या प्रयत्नाचे वेळी वालीला मारता आले नाही असे वर्णन केले आहे. पुन्हा द्वंद्व करताना सुग्रीवाने गळ्यात पुष्पमाला घातली व मग रामाला वालीवर बाण सोडतां आला. या प्रसंगामुळे ते जुळे भाऊ असावेत असा समज होतो तो खरा नाही. पुढे महाभारतात अर्जुन हा इंद्रपुत्र व कर्ण हा सूर्यपुत्र असे वर्णन आहे मात्र त्यांना कोणी वाली-सुग्रीवांचे अवतार मानत नाही! कारण ते पडले वानर! दोन्ही ठिकाणी इंद्रपुत्र जास्त प्रबळ वर्णिला आहे.
यज्ञाच्या प्रभावाने म्हणा कीं यदृच्छेने म्हणा पण दशरथाला राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न असे चार पुत्र पाठोपाठ झाले. त्यांच्या वयामध्ये किती फरक होता याचा स्पष्ट उल्लेख कोठेच केलेला नाही. सुमित्रेने लक्ष्मण व शत्रुघ्न यांना जन्म दिला असे म्हटले आहे पण ते जुळे होते असे स्पष्ट म्हटलेले नाही. पण पाठोपाठ जन्म झालेले असल्यामुळे ते जुळे असलेच पाहिजेत. यज्ञानंतर एक वर्षाने रामाचा जन्म झाला व चौघांचाहि नामकरण विधि एकदमच झाला असे म्हटले आहे. लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर व कर्कलग्नी झाला या वर्णनावरूनहि ते जुळे असले पाहिजेत याला दुजोरा मिळतो. तसें नसतें तर एकाच नक्षत्रावर जन्म घेण्यासाठी त्यांच्या वयात एखाद्या वर्षाचा फरक पडला असता. राम व भरत या दोघांच्याहि जन्मराशि व जन्मनक्षत्रे दिलीं आहेत. राम पुनर्वसु नक्षत्रावर व कर्कलग्नीं तर भरत पुष्य नक्षत्रावर व मीनलग्नीं जन्मला. रामाचा जन्म माध्यान्हीला झाला हे सर्वमान्य आहे. भरताची जन्मवेळ दिलेली नाही. एवढ्या माहितीवरून त्यांच्या जन्मवेळेत किती फरक होता हे ठरवतां येते काय हे मला निष्चित माहीत नसल्यामुळे थोडेफार ज्योतिष जाणणार्‍या एका व्यक्तीशी चर्चा केली त्यावरून असे दिसून आले कीं भरत हा रामजन्माच्या दुसर्‍या दिवशी सकाळच्या सुमारास म्हणजे रामानंतर १७-१८ तासांनी जन्मला. लक्ष्मण-शत्रुघ्नांच्या जन्मनक्षत्र-राशीवरून असेच गणित करून ते रामजन्मानंतर दोन दिवसांनी दोन-प्रहरी जन्मले. म्हणजे ते रामाहून दोन दिवसांनी लहान होते. ज्योतिषाची आवड व अभ्यास असणारांनी यावर अधिक प्रकाश टाकावयास हरकत नाही. रामायण काळी आपल्याकडे राशी होत्या काय याबद्दल शंका आहे. त्या बर्‍याच पुढे, वराहमिहिराच्या काळी आल्या (ग्रीकांकडून?) राशिनामे आपलीं व ग्रीकांची एकच आहेत. कोणी कोणाकडून घेतली? मात्र, रामायणानंतर दीर्घकाळाने झालेल्या महाभारतकाळीहि अधिक मासांचे गणित- आजच्याप्रमाणे-राशिसंक्रमणाशी जुळवलेले नव्हते. ५८ चांद्रमासांनंतर दोन अधिक चांद्रमास एकदम घेतले जात. यावरून, महाभारतकाळीहि राशिकल्पना व राशि-संक्रमण-दिन निश्चिति माहीत नव्हती म्हणावे लागते. सूक्ष्म वेध घेण्याच्या पद्धति आटोक्यात येईपर्यंत ते शक्यहि नव्हते. रामायणात हे जन्मराशींचे उल्लेख मागाहून घातले गेले काय? हा प्रष्न मी वाचकांवरच सोडतो!

Monday, January 19, 2009

रामायण बालकांड - भाग ४

दशरथाच्या यज्ञाला राजा जनक ’जुना संबंधी’ या नात्याने आला होता. म्हणजे दोन्ही कुळांचा राम-सीता विवाहापूर्वींहि संबंध होता असे दिसते. कैकय राजा, कैकेयीचा पिता, हाहि उपस्थित होता. कौसल्या वा सुमित्रा यांच्या माहेरच्या कुळांचा उलेख नाही. कौसल्या, तिच्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी असे म्हणता येईल. सुमित्रा कोठली याचा मात्र खुलासा कोठेच नाही. दशरथाने तिच्याशी विवाह सौंदर्यामुळे वा पुत्रप्राप्तीसाठी केला असावा.
यज्ञीय अश्व एक वर्षानंतर परत आला. अश्वाबरोबर दशरथ स्वत: ससैन्य गेलेला नव्हता. मुलगे नव्हतेच तेव्हा प्रश्नच नव्हता. मात्र कोणाबरोबरहि युद्धप्रसंग उद्भवला नाही. दशरथाबद्दल इतर राजाना आदर असावा. यानंतर यज्ञाचे खुलासेवार वर्णन आहे. अनेक पशूंचे बळी दिले गेले. अश्व्मेधातील एक विचित्र प्रथा म्हणजे यज्ञाचे शेवटी अश्वाशेजारी राणीने एक रात्र शयन करणे! या प्रथेचा उल्लेख महाभारतातहि द्रुपदाच्या यज्ञाच्या संदर्भात आहे. यामागे काय तत्व असावे हे कळत नाहीं. यानंतर त्याच अश्वाचा यज्ञात बळी देऊन यज्ञ समाप्त झाला. ऋष्यशृंगाने राजाला ’तुला चार पुत्र होतील’ असा आशीर्वाद दिला. दशरथाला एकहि पुरला असता! एकच मिळाला असता तर राम वनात गेलाच नसता व रामायणच झाले नसते! येथे दशरथाच्या वैश्य व शूद्र स्त्रियांचा उल्लेख आहे. त्यानंतर पुत्रेष्टि हा स्वतंत्र यज्ञ अथर्ववेदाच्या मंत्रांनी केला गेला. पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा यज्ञ बहुधा गौण मानला जात असावा म्हणून वसिष्ठांनी स्वत: न करता ऋश्यशृंगाला बोलावले. अश्वमेधाचे निमित्तने दशरथाने त्याला अपार धन दिले व मग त्याने पुत्रेष्टि यज्ञ करून दिला असा प्रकार दिसतो!
यज्ञात प्रजापतिलोकांतील पुरुष प्रगट झाला व त्याने क्षीरपात्र दशरथाला देऊन ’ही खीर तुझ्या योग्य त्या पत्नीला दे’ असें म्हटले. खिरीची वांटणी करताना, दशरथाने अर्धी कौसल्येला, पाव सुमित्रेला व अष्टमांश कैकेयीला दिली व उरलेली अष्टमांश, काही विचार करून पुन्हा सुमित्रेलाच दिली. असा कोणता विचार त्याने केला असेल बरे?
खिरीची वांटणी करताना दशरथाने राण्यांच्या सीनियॉरिटीला प्राधान्य दिलेले दिसते. यज्ञाला कैकय राजा उपस्थित होता. खिरीच्या वांटणीत आपल्या मुलीला फक्त अष्ट्मांश वाटा मिळाला याबद्दल त्याने राग वा तक्रार केलेली नाही! खुद्द कैकेयीनेहि तक्रार केली नाही. यामुळे ती दुष्ट वा मत्सरी होती या समजुतीला आधार दिसत नाही. मला तर ती भोळी-भाबडी वाटते!

Tuesday, January 13, 2009

रामायण बालकांड - भाग ३

दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टि यज्ञ केला अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात त्याने अश्वमेध केला. यावेळी दशरथाचे वय काय असावे? पुढे विश्वामित्राच्या आगमनाचे वेळी ’आपण साठ वर्षांचे आहोत व राम जेमेतेम सोळा वर्षांचा आहे’ असे तो म्हणाला. यावरून यज्ञाचे वेळी तो साधारण ४२-४३ वर्षांचा होता. म्हणजे अपत्ये होण्याचें त्याचें वय गेलेलें नव्हतें. मात्र तीन विवाह करूनहि पुत्रप्राप्ति झाली नव्हती. पुढे उल्लेख अहे कीं तीन राण्यांशिवाय त्याचा इतरहि बराच राणीवसा होताच! थोर असे वसिष्ट ऋषि राजाचे दरबारात असूनहि अश्वमेधाची जबाबदारी त्यानी स्वीकारली नाही! त्यासाठी ऋष्यशृंग ऋषीना बोलावून घ्यावे असा त्यानी दशरथाला सल्ला दिला. त्यानी असे कां केले असावे? दशरथाचा यज्ञ नेहमींचा अश्वमेध नव्हता. पुत्रप्राप्ति हा हेतु होता. पुत्रप्राप्तीच्या हेतूने करावयाच्या यज्ञामध्ये काही गौणत्व मानले जात होते काय? महाभारतातहि, द्रुपदाचा यज्ञ करण्यास कोणी ब्राह्मण / ऋषि तयार नव्हता असे म्हटले आहे. कदाचित या गौणत्वामुळेच वसिष्ठाने स्वत: यज्ञ चालवला नसावा.
या ऋश्यशृंगाची कथा मजेदार आहे. जन्मापासून तो वनात पिता व इतर ऋषिमुनि यांच्याच सहवासात वाढला होता. त्यामुळे त्याला स्त्रीरूप माहीतच नव्हते! रोमपाद नावाच्या राजाच्या राज्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला होता व ’ऋष्यशृंग तुझ्या राज्यात रहावयास आला तर त्याच्या पुण्याईने पाऊस पडेल’ असे त्याला सांगण्यात आले. त्याला मोहात पाडून घेऊन येण्याची कामगिरी वेश्यांकडे सोपवली गेली. त्यांना पाहून, या स्त्रिया हे न कळल्यामुळे हे कोणी वेगळ्याच प्रकारचे मुनि आहेत असे त्याला वाटले! मात्र रोमपादाच्या इच्छेप्रमाणे ऋष्यशृंग त्याच्या राज्यात आला व मग त्याच्या पुण्याईने रोमपादाचे पाप नष्ट होऊन पाऊस पडला! रोमपादाने आपली कन्या शांता त्याला दिली व ऋश्यशृंग त्याचेपाशी राहिला. दशरथाने आमंत्रण दिले त्याचा मान ठेवून रोमपादाने ऋश्यशृंगाला त्याचेकडे पाठवले. पूर्ण एक वर्षभर तयारी चालून मग दशरथाचा अश्वमेध झाला. त्याची कथा पुढील भागात पाहूं.

Friday, January 9, 2009

रामायण बालकांड - भाग २

सुरवातीच्या सर्ग १ मध्ये नारदाने वाल्मिकीला रामकथा सांगितली आहे. वाल्मिकीने नारदाला विचारले कीं सांप्रत सर्वगुणानी संपन्न असा कोण पुरुष आहे? त्यावर नारदाने राम असे म्हणून त्याचे वर्णन केले व संक्षिप्त रामकथा सांगून ’सद्ध्या राम व सीता अयोध्येत राज्य करीत आहेत’ असे म्हटले. वर्तमानकाळाचा वापर दर्शवितो कीं रामाने सीतेचा त्याग करण्याअगोदरची ही घटना आहे. राम दीर्घकाळ राज्य करील असे नारदाने म्हटले. या अतिसंक्षिप्त रामकथेत व पुढील विस्तृत रामायणामध्ये साहजिकच काही फरक दिसून येतात. राम वनात गेला तेव्हा दशरथ त्याला पोचवण्यासाठी दूरवर बरोबर गेला असे येथे म्हटले आहे! रामाने विश्वामित्राबरोबर जाणे, ताटकावध, धनुर्भंग वगैरे येथे काही नाही! वालीसुग्रीवाची राजधानी किष्किंधा हिचे वर्णन ’गुहा’ असे केले आहे.
दुसर्‍या सर्गामध्ये प्रख्यात असा क्रौंचवधप्रसंग व वाल्मिकिची पहिल्या ’मा निषाद प्रतिष्ठां त्वम …’ या श्लोकाची रचना वर्णिली आहे. आपण काहीतरी नवीनच केले असे वाल्मिकीला वाटले तेव्हाच खुद्द ब्रह्मदेवाने प्रगट होऊन श्लोकरचनेबद्दल वाल्मिकीचे अभिनंदन केले व तसे करण्याची मीच तुला प्रेरणा दिली, आता संपूर्ण रामकथा तूं श्लोकबद्ध कर अशी त्याला आज्ञा केली. रामायण रचनेमागची ही पार्श्वभूमि या दोन सर्गांत वर्णिली आहे.
सर्ग तीन मध्ये रामायणाची सर्व कथा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपांत वाल्मिकीने स्वत:च्या शब्दांत सांगितली आहे. येथे मात्र कथेचा शेवट प्रजेच्या समाधानासाठी रामाने सीतेचा त्याग करण्यापर्यंत नेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. रामाने त्यागिल्यानंतर सीता दीर्घकाळपर्यंत वाल्मिकीच्याच आश्रमात राहिली व लवकुशांचा जन्म व सर्व संगोपन तेथेच झाले त्यामुळे राम-सीता यांनी दीर्घकाळपर्यंत राज्य केले हा नारदाने सांगितलेला रामकथेचा शेवट खरा नाही हे वाल्मिकीला ठाऊकच होते. पहिला सर्ग व तिसरा सर्ग यांमध्ये १३-१४ वर्षांचा काळ लोटला असे दिसते. कदाचित नारदाने रामकथा सांगितली तेव्हा राम-सीता आता दीर्घकाळ राज्य करतील अशी नारदाची अपेक्षा असावी !
उत्तर-रामचरित्र हा रामायणाचा भाग मानावयाचा कीं नाही हा एक विद्वानांचा वादविषय आहे अशी माझी कल्पना आहे. रामायण वाल्मिकीने प्रथम रचले व लवकुशांना शिकविले तेव्हा सीतेच्या त्यागाचा सुरवातीचा कथाभाग त्यांत कदाचित समाविष्ट असावा. लवकुशांनी अयोध्येत जाऊन ते लोकांना व नंतर खुद्द रामाला ऐकविले. त्यानंतर राम स्वत: वाल्मिकीच्या आश्रमांत आला, सीतेची भेट झाली व वाल्मिकीने सीतेबद्दल सर्वतोपरी आश्वासन दिले तरीहि रामाने सीतेचा स्वीकार केला नाहीच व संशयही पूर्णपणे सोडला नाही. तेव्हां निराशेने सीता भूमिगत झाली व शोकाकुल राम लवकुशांना घेऊन अयोध्येला परत गेला हा अखेरचा कथाभाग तर मूळ रामायण रचनेच्या वेळी घडलेलाच नव्हता त्यामुळे तो मूळच्या रामायणांत समाविष्ट असण्याचा संभवच नाही. मात्र त्यानंतर केव्हातरी वाल्मिकीने स्वत:च वा इतर कोणाकडून तरी हा कथाभागहि रामायणात समाविष्ट केला असावा. अर्थात तो रामकथेचा अनिवार्य भागच आहे. रामाने सीतेचा केलेला कायमचा त्याग हा योग्य कीं अयोग्य, न्याय्य कीं अन्याय्य हा एक कूट्प्रष्न आहे व रामावर अतीव श्रद्धा बाळगणारांनाहि तो अवघडच आहे.
वाल्मिकीने श्लोक व अनुश्टुभ छंद पहिल्याने रचला कीं इतर पूर्वींची कांही रचना त्या छंदांत आहे हे मला माहीत नाही. मात्र वेद, उपनिषदे रामायणाच्या खूप पूर्वींचीं व त्यांत काव्यमय व गेयहि रचना – सूक्तें- आहेत अशी माझी समजूत आहे. तसे असेल तर मग रामायणाला आदिकाव्य कां म्हणतात असा मला प्रश्न आहे.
सर्ग ४ मध्ये वाल्मिकीने सर्व रामकथा सात सर्गांत रचली असे म्हटले आहे व त्यांत उत्तरकांडाचाही समावेश आहे. नंतर तें लवकुशांना शिकवले गेले व त्यांचेकडून त्याचे गायन फार परिणामकारक होते असे सर्व मुनिगणांचे मत होऊन सर्वांनी त्याना कौतुकाने त्यांना काही भेतवस्तू दिल्या. त्यांत छाटी, लंगोटी, रुद्राक्षांची माळ अशा नामी वस्तूंचा समावेश होता! लवकुश अयोध्येच्या रस्त्यांतून रामायण गात फिरत असतांना खुद्द रामानेच त्यांना दरबारांत नेऊन त्यांचे कौतुक व सन्मान केला व सर्व रामायण गाण्याची त्यांना आज्ञा केली. त्यावेळी त्यांनी गाइलेली रामकथा म्हणजे पुढील सर्व सर्गांत व उत्तरकांड सोडून इतर कांडांत आलेले रामायण होय. इथून पुढे, लवकुशांचा वा दरबाराचा उल्लेख न करतां सर्व रामकथा क्रमवार सांगितली आहे. सर्वसाधारणपणे सर्व रामकथा आपल्या सर्वांच्या भरपूर परिचयाची असल्यामुळे ती सर्व क्रमाने सांगण्याचा माझा विचार नाही. रामायण वाचताना कित्येक ठिकाणी आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात व आपले दीर्घकाळचे काही समज चुकीचे असल्याचे दिसून येते. बालकांडांतील व पुढे इतर कांडांतीलहि अशा प्रसंगांवर लिहिणार आहे.

Tuesday, January 6, 2009

रामायण - बालकांड - भाग १

महाभारताप्रमाणेच रामायणाचेहि माझे वाचन मर्यादितच आहे. विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रकाशित केलेले रामायणाचे भ्हाषांतराचे पांच खंड मला वाचावयास मिळाले. त्यांत वाल्मिकि-रामायणाची मूळ कथा विद्वान संपादकांनी अभ्यासपूर्वक भाषांतर करून छापलेली आहे. त्यांचे भाषांतर अचूक आहे व उत्तम आहे असे मी गृहीत धरलेले आहे. माझा संस्कृतचा अभ्यास नसल्यामुळे तसे करण्यावाचून पर्याय नाही! रामायणाची इतर अनेक भाषांतरे व आवृत्त्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. रामकथेचे स्वरूप या ग्रंथांतून देशोदेशीं भाषा, काळ, लेखक, संस्कृति यानुरूप बदलत आले आहे. यांचा तौलनिक अभ्यास हे महा-विद्वानांचे काम आहे, माझे नव्हे, तेव्हां त्या भानगडीत न पडतां, मूळ वाल्मिकि रामायणाचे समोर असलेले भाषांतर आपल्याला पुरेसे आहे असे मी ठरवले.
प्रत्यक्ष रामकथा आपल्याला सर्वसाधारणपणे परिचित असते. अनेक महाकाव्यें, नाटकें, कादंबर्‍यांना तिने जन्म दिला आहे. साधारण्पणे श्रद्धा बाळगून जशी कथा वाचनात येईल तशी खरी मानण्याकडे आपला कल असतो. राम हा प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार अशी दृढ श्रद्धा असली म्हणजे तर्क चालवण्याची गरज राहत नाही. माझ्या मनाचा कल तसा नसल्यामुळे काही विचार, शंका वा कल्पना उभ्या राहतात.
माझ्या महाभारतावरील लेखनाप्रमाणेच या रामायणावरील लेखनातहि श्रद्धा आवश्यक तेथे दूर ठेवून, पूर्वग्रह न बाळगतां, वाचन करताना काही नवीन वा पूर्वसमजुतीपेक्षां वेगळ्या कथा वा घटना नजरेला आल्या त्याबद्दल मी लिहिणार आहे. कोणाच्याही श्रद्धा दुखवण्याचा वा त्यांचा अनादर करण्याचा अर्थातच माझा हेतु नाही, तरीहि तसे झाल्यास मी प्रथमच दिलगिरी व्यक्त करतों.
महाभारताप्रमानेच रामायणातहि अनेक उपकथानके, स्थळवर्णने, यात्रा, धार्मिक कृत्ये यांची रेलचेल आहे. काही उपकथानके दोन्ही ग्रंथांत समान आहेत, मात्रा त्याचे स्वरूप काही वेळां दोन्हीकडे एकच नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.
बालकांड हे रामायणाचे पहिले कांड. त्याचे ७७ सर्ग आहेत. त्यांत राम व त्याचे तीन बंधु यांच्या जन्मापासून त्यांच्या विवाहापर्यंत कथाभाग येतो. याबरोबरच रामाच्या कुळाची पूर्वपीठिका व इतर अनेक उपकथानके आहेत. यापुढील भागांमध्ये बालकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे.
आपणांस हे लेखन महाभारताप्रमानेच रुचेल अशी आशा आहे.
Locations of visitors to this page