Wednesday, January 26, 2011

किष्किंधा कांड - भाग ६

वर्षाकाळ संपेपर्यंत राम-लक्ष्मण त्या गुहेच्या आश्रयाने राहिले. रामाला शोक वाटला कीं लक्ष्मण त्याची समजूत करी. शरदऋतु संपल्यावरच रावणावर स्वारी करतां येणार होती. तोवर स्वस्थ बसणे भागच होते.
किष्किंधेत सुग्रीव तारा-रुमा यांच्यासह कामभोगात मग्न होता. शरद संपत आल्यावर हनुमानाने त्याला कर्तव्याची आठवण करून दिली. हनुमान हा राम व सुग्रीव या दोघांचाहि खरा हितकर्ता होता. मग सुग्रीवाने वानरवीर नील याचेकडून सर्व वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश कळवले.
सुग्रीवाकडून काही कळत नसल्यामुळे रामाला राग आला. ’सुग्रीव काही करीत नाही तर लक्ष्मणा तूं जाऊन त्याला आठवण दे व निष्क्रिय राहिलास तर वालीप्रमाणे मी तुलाहि शासन करूं शकतों असे सांग’ असे त्याने लक्ष्मणाला म्हटले. लक्ष्मणाला खूप राग आला पण रामानेच त्याला संयम न सोडण्यास सांगितले. लक्ष्मणाने किष्किंधेस जाऊन सुग्रीवाला कडक भाषेत निरोप कळवला. सुग्रीव अजूनहि कामभोगातच दंग होता. हनुमानाने पुन्हा कर्तव्याची जाणीव करून दिली. ’रामाने लोकापवादाची पर्वा न करतां तुझ्यासाठी वालीला मारले’ याची जाणीव करून दिली. ( वालीचा वध हा रामायणकर्त्याच्या मतेहि दोषास्पद होता हे येथे स्पष्ट सूचित होते!)
लक्ष्मणाचा निरोप मिळाल्यावर सुग्रीवाला भय वाटले. त्याने तारेला लक्ष्मणाला समजावण्यासाठी पाठवले. तिने सांगितले की सुग्रीव स्वस्थ बसलेला नाही. लक्ष्मणाने तरीहि राग सोडला नाही तेव्हां वालीकडून पूर्वी ऐकलेले रावणाचे सैन्यबळ त्याच्या निदर्शनास आणले व मोठ्या सैन्याशिवाय युद्ध विफल होईल हे दाखवून दिले. वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश पाठवलेले आहेत हेहि सांगितले. मग लक्ष्मणाचा राग निवळला. सुग्रीवानेहि विनम्रभाव धरला. हनुमानाकडून पुन्हा सर्व वानरवीरांना समज देऊन दहा दिवसांत किष्किंधेला जमण्यास सांगितले. लक्ष्मण व सुग्रीव दोघानी सैन्य जमत आहे असे रामाला कळवल्य़ावर राम आनंदित झाला. ’सीतेच्या जीविताचा व रावणाच्या निवासस्थानाचा निश्चित ठावठिकाणा लागल्यावर मग पुढचे बेत आखूं’ असे त्याने म्हटले. कितीहि शोक असला तरी रामाचे परिस्थितीचे भान सुटलेले नव्हते! सुग्रीवाच्या मदतीशिवाय आपण एकट्याने काही करू शकत नाही हे त्याला स्पष्ट दिसत होते.

Thursday, January 6, 2011

किष्किंधा कांड - भाग ५

वालीचा वध ग्रीष्म ऋतूच्या शेवटी झाला असा स्पष्ट कालनिर्देश केलेला आढळतो. मात्र महिना, तिथि सांगितलेली नाही. सीताहरण माघ वद्य अष्टमीला झाले होते, त्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा काळ लोटला होता.
वाली घायाळ होऊन कोसळल्यावर त्याला दिसले कीं आपल्याला रामाचा बाण लागला आहे. त्याने अनेक प्रकारे रामाला वाक्ताडन केले. ’माझे तुमचे काहीहि भांडण वा वैर नसतां, मी तुमच्या राज्याला उपद्रव दिलेला नसतां व मी दुसर्‍याशी युद्ध करण्यात गुंतलो असतां, लपून राहून मला मारण्याचे तुम्हाला काय कारण? जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां? त्याचे कारण विचार करून मला सांगा’ असा स्पष्ट जाब विचारला.
यावर रामाने दिलेले उत्तर पूर्णपणे गोलमाल स्वरूपाचे आहे. वालीवर ठेवलेल्या अनेक निरर्थक आरोपांपैकी ’तूं सुग्रीवाच्या पत्नीशीं, जी तुला पुत्रवधूसारखी आहे, कामभोग घेतोस’ हा एकच आरोप खरा होता. मात्र एकीकडे तूं शाखामृग आहेस म्हणून तुझी शिकार करण्याचा क्षत्रिय या नात्याने माझा धर्म आहे’ असे म्हणावयाचे तर दुसरीकडे त्याच्या वर्तनाला सुसंस्कृत मानवसमाजाची नीतिमूल्ये लावावयाची हा प्रकार अशोभनीय होता. ’मी लपून कां मारले कारण तूं शाखामृग म्हणून तुझी शिकार केली’ असे समर्थन केले कारण लपून लढण्याचे दुसरे योग्य कारण देतांच येत नव्हतें! जो आरोप खरा होता तो नंतर सुग्रीवालाहि लागू झाला होता पण त्याला रामाने दोषहि दिला नाही वा शासनहि केले नाहीं. खरे कारण एकच होते कीं वालीला मारून सुग्रीवाला आपलेसे करून घेणे.
रामाचे समर्थन पटो वा न पटो, वालीचा मृत्यु अटळच होता. त्याच्या मृत्यूनंतर तारेने अपार शोक केला. तिनेहि रामाची निंदा केली. हनुमानाने अखेर तिची कशीतरी समजून घातली. आता सुग्रीवाला पश्चात्ताप झाला. ’वालीच्या मनात मला मारून टाकण्याचे कधीहि आले नाही’ अशी त्याने स्पष्ट कबुली दिली. ’मलाहि मारून टाका’ असे तारेने रामाला विनवले. राम व सुग्रीवाने तिचे सांत्वन केले.
वालीची उत्तरक्रिया झाली. (हा वानरसमाज आर्यांच्या चालीरीती पाळणारा कसा काय?) त्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. मात्र वनवासाचे बंधन असल्याचे कारण सांगून रामाने किष्किंधेत जाण्याचे नाकारले. या सर्वामध्ये आणखी काही काळ गेला. ’आता श्रावण महिना सुरू झाल्या’चा रामाचे तोंडी उल्लेख येतो. ’आता वर्षाकाळ असल्यामुळे कार्तिकमासापासून तूं युद्धप्रयत्नाना लाग’ असे रामाने सुग्रीवाला म्हटले. तुंगभद्रेच्या जवळील प्रस्रवण पर्वताच्या गुहेत राम-लक्ष्मण जाऊन राहिले.
Locations of visitors to this page