Wednesday, May 26, 2010

अरण्यकांड - भाग ८

मारीचाने मरताना मारलेल्या आर्त हाका लक्ष्मण व सीता यांना ऐकूं आल्या त्याअर्थी मारीच व राम फार दूर गेलेले नव्हते. मारीच मेल्यावर रामाला शंका आली व म्हणून तो घाईघाईने परत फिरला. हाका ऐकू आल्यावर लक्ष्मण व सीता यांच्यात बराच वादविवाद झाला व अखेर नाइलाजाने लक्ष्मण निघाला यांत काही काळ गेलाच. लक्ष्मणाला राम वाटेतच भेटला व दोघे घाईने परतले. लक्ष्मण निघून परत येईपर्यंत थोडाच वेळ गेला असणार. परत येतात तोंवर रावणाने सीतेला नेलीच होती.
लक्ष्मण कुटी सोडून गेलेला पाहिल्यावर रावण कुटीपाशी आला. सीतेने त्याचे स्वागत केले. रामायण म्हणते दोघांमध्ये लांबलचक संभाषण झाले. रावणाने प्रथम ब्राह्मणवेषाला साजेसे वेदमंत्र म्हतले. मग तिच्या सौंदर्याचे वर्णन करून तूं कोण व या धोकादायक वनात काय करीत अहेस असे विचारले. सीतेने आपला इतिहास विस्ताराने सांगितला. मग रावणाने स्वत:ची ओळख विस्ताराने सांगून तिला वश होण्यास विनविले. सीतेने त्याला झिडकारल्यावर अखेर त्याने तिला पकडले व उचलून घेऊन तो निघाला. हे सर्व होईपर्यंत राम-लक्ष्मण परत कसे आले नाहीत? याचा अर्थ असा घ्यावा लागतो कीं लक्ष्मण बाहेर पडलेला दिसल्याबरोबर अजिबात वेळ फुकट न घालवतां रावणाने सरळ सीतेला उचलले! संभाषणात वेळ घालवला नाही. सीता वश होईल अशी भाबडी कल्पना तो कशाला बाळगील?
रामायण म्हणते , सीतेने या प्रसंगी रावणाला आपली माहिती विस्ताराने सांगितली. तिने म्हटले, ’आमचा विवाह झाल्यावर आम्ही बारा वर्षे अयोध्येत सुखात राहिलो. मग कैकेयीच्या मागणीमुळे आम्हाला वनात यावे लागले, यावेळी रामाचे वय २५ व माझे १८ होते.’ तर मग म्हणावे लागते विवाहाचे वेळी राम १३ वर्षांचा व सीता ६ वर्षांची होती. हे अतिशयोक्त वाटते. रामाची मागणी विश्वामित्राने केली तेव्हां ’राम फक्त सोळा वर्षांचा आहे’ असे दशरथ म्हणाला होता. दुसरें म्हणजे विवाहानंतर बारा वर्षे अयोध्येत गेलीं तर एवढा दीर्घ काळ भरत-शत्रुघ्न कैकय देशालाच होते काय़? ते परत आल्याचा मुळीच उल्लेख नाही! यांत थोडीफार विसंगति आहे. रामायण एकहातीं वाल्मिकीचे मग त्याने अशी विसंगति कां येऊं दिली असेल? मारीच रावणाला म्हणाला होता कीं ताटकावधाचे वेळीं राम फक्त बारा वर्षांचा होता तरी त्यावे बाण मला सोसवले नाहींत. रामाला अवतारस्वरूप मिळाल्यावर त्याचे माहात्म्य वाढवण्याचा हा प्रकार वाटतो.

Friday, May 21, 2010

अरण्यकांड - भाग ७

रावणाने मारीचाला म्हटले ’मी तुझा सल्ला फक्त माझ्या बेतात काय कमीजास्त करावे एवढ्यापुरताच विचारला व मदत मागितली, तुझी परवानगी मागितली नाही. बुद्धिमान मंत्री राजाने विचारल्यावरच आपला विचार नम्रपणे, हात जोडून सांगतो! तूं मृगरूपाने राम-लक्ष्मणाना दूर ने, मग मी सीतेला पळवून नेईन. मग तूं कुठेही जाऊं शकतोस. तुला अर्धे राज्य देईन पण तू विरोध केलास तर जबरदस्तीने तुझ्याकडून हे करून घेईनच नाहीतर तुला मारून टाकीन.’ मारीचाने प्रतिकूल विचार पुन्हापुन्हा ऐकवले पण रावण मानेचना तेव्हां नाइलाजाने ’तुझ्या हातून मरण्यापेक्षां रामाचे हातून मरण आलेले बरे’ असे म्हणून कबुली दिली. मारीचाबद्दलच्या आपल्या पूर्वकल्पनांपेक्षां त्याचे वर्तन वेगळे वर्णिले आहे.
बेत ठरल्यावर दोघेहि लगेच आकाशमार्गाने जाणार्‍या रथाने निघाले. त्यालाच पुढे ’विमानाकार रथ’ असेहि म्हटले आहे. त्यामुळे खूप वेगाने प्रवास करूं शकणारा रथ एवढाच ’विमाना’चा अर्थ अभिप्रेत असावा असे वाटते. हे विमान सीताहरणाच्या वेळी जटायुकडून नष्ट झाले असे पुढे वर्णन आहे. त्या अर्थी हे ’पुष्पक’ विमान नव्हे. तें लंकेत सुखरूप होते. पंचवटीला पोंचल्यावर मारीचाने लगेच मृगरूप धारण केले. पुढचा कथाभाग आपणास परिचित आहे तसाच जवळपास रामायणात आहे. लक्ष्मणाने ’हा मृग म्हणजे मारीच असावा’ असा संशय व्यक्त केला तेव्हां रामाने म्हटले, ’हा मृग असेल तर सीतेला हवे असलेले सोन्याचे कातडे मिळेल आणि हा मारीच असेल तर याला मारलेच पाहिजे कारण याने असेच फसवून इतर शिकार करण्यासाठी रानात आलेल्या राजांना मारले आहे.’ तेव्हां एकटी सीताच फसली होती, रामलक्ष्मणांना सोन्याच्या कातड्याचा लोभ पडला नव्हता! सीतेच्या रक्षणाचे काम लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोपवून राम मारीचाच्या पाठीवर गेला. खूप दूर गेल्यावर रामाचा बाण लागून मरताना मारीचाने रामाच्या आवाजात ’हा सीते, हा लक्ष्मण’ अशा आर्त हाका मारल्या. सीतेने निष्कारण संशय व्यक्त केला म्हणून नाइलाजाने लक्ष्मण रामाच्या मदतीला गेला. त्याने सीतेला सावध रहाण्यास सांगितले मात्र ’लक्ष्मणरेषा’ असा काहीहि प्रकार रामायणात मुळीच नाही. ती निव्वळ हरदासी कथाच! लक्ष्मणावर नाहक संशय घेताना सीतेने विवेकाची लक्ष्मणरेषा आधीच ओलांडली होती.

Sunday, May 16, 2010

अरण्यकांड - भाग ६

यानंतर खराचा ससैन्य नाश झाल्यामुळे फार उद्विग्न झालेली शूर्पणखा स्वत:च रावणाकडे गेली. स्वत:चा झालेला अपमान तिने रावणाला सांगितला व त्याला फटकारले कीं ’जनस्थानातील तुझी सत्ता रामाने उखडून टाकली याचा तुला पत्ता नाही काय?’ तिच्याकडून सर्व हकीगत ऐकून रावण चिंतातुर झाला. शूर्पणखेने राम-लक्ष्मण-सीता यांचे बळ व सौंदर्य याचे वर्णन रावणाला ऐकवले. मी सीतेला तुझ्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मला लक्ष्मणाने विरूप केले असे खोटेच सांगितले. ’सीतेला तूं पळवून आण’ असे तिने सुचवले नाही. रावणाने स्वत:च मंत्रिगणांशी बोलणे करून सीतेचे हरण करण्याचा बेत नक्की केला.
रावण रथातून समुद्रकिनार्‍यापर्यंत आला व मग विमानाने भारतात येऊन पुन्हा मारीचाला भेटला. विमानाचा उल्लेख आहे पण वर्णन नाही. विमान म्हणजे काय हे गूढच आहे. रावणाने पुन्हा मारीचाला खर-दूषणांचा ससैन्य नाश झाल्याचे सांगून रामाने दंडकारण्याचे अभयारण्य केले आहे असे म्हटले. रामाला त्याच्या पित्याने क्रोधाने पत्नीसह घराबाहेर काढले आहे असेहि म्हटले व सीतेला पळवून आणण्याचा बेत सांगून मारीचाचे सहाय्य मागितले. ते ऐकून मारीचाचा भयाने थरकाप झाला. त्याला रामाच्या पराक्रमाचे दर्शन घडलेले होते. त्याने रावणाला पुन्हापुन्हा विनवले कीं ’तूं हा बेत मनात आणू नको, रामाने पितृवचनाचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला आहे. त्याच्याशी वैर धरू नको. तुला ते झेपणार नाही. तूं बिभीषणाचा सल्ला घे. विश्वामित्राच्या सांगण्यावरून राम बालवयातच आमच्या पारिपत्यासाठी आला तेव्हा आमचा सर्वनाश झाला. माझा जीव कसाबसा वांचला. हल्लीच पुन्हा मृगरूपाने दोन मित्रांबरोबर दंडकारण्यात गेलो असतां रामाच्या बाणाने मरतांमरतां वांचलों, माझे मित्र मेले. त्यामुळे मला रामाची फार भीति वाटते. एकतर तूं सरळ रामाशीं युद्ध कर किंवा सर्व विसरून लंकेत सुखाने रहा. खराने रामावर आक्रमण केले व रामाने त्याला युद्धात मारले यांत त्याचा काय दोष? त्याच्याशी वैर धरू नको’. मारीचाने पुन्हापुन्हा हिताचा सल्ला दिला पण रावणाने तो मानला नाही.

Thursday, May 13, 2010

अरण्यकांड - भाग ५

शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी खर, दूषण, त्रिशिरा हे तीन वीर व जनस्थानातील त्यांची मोठी सेना चालून आली. त्या सैन्यात हे तीन वीरच धनुष्य-बाणाने लढणारे होते, इतर सर्व हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्राने लढणारे होते. हे जनस्थान पंचवटीच्या जवळपासच होते व स्थानिक नरभक्षक लोकांच्या सहायाने येथे रावणाने आपले ठाणे वसवले होते असे म्हणावे लागते. अद्याप त्यांचा आर्यावर्तातील कोणा राजाशी संघर्ष झालेला वर्णिलेला नाही. पण संभाव्य संघर्षाची ही रावणाची पूर्वतयारी दिसते.
लक्ष्मणाला सीतेच्या संरक्षणासाठी ठेवून रामाने एकट्यानेच त्याना तोंड दिले. युद्धाचे खुलासेवार वर्णन वाचावयास मिळते. सर्व सैन्य मारले जाऊन एकटा खर उरला व तोही अखेर मारला गेला. रामाने एकहि ’अस्त्र’ वापरल्याचा उल्लेख नाही. फक्त धनुष्यबाण वापरून कितीहि पराक्रमी धनुर्धर असला तरी किती सैन्य मारू शकेल? महाभारतात सर्व धनुर्धर मोठ्या सैन्याविरुद्ध अस्त्रांचा सर्रास वापर करतात. तेव्हा खराचे सैन्य १४,००० होते ही अतिशयोक्ति म्हटली पाहिजे. युद्ध संपल्यावर लक्ष्मण व सीता गुहेतून बाहेर आलीं व रामाला फारशा जखमा झालेल्या नाहीत असे पाहून आनंदित झालीं.
खराचा ससैन्य नाश झाल्याचे वृत्त अकंपन नावाच्या वांचलेल्या सैनिकाने रावणाला सांगितले. रामाच्या बळाचे व युद्धकौशल्याचे त्याने वर्णन केले. ’रामाला युद्धात हरवणे सोपे नाही तेव्हा सीतेला पळवून आणलीस तर राम विरहानेच मरेल’ असे त्याने रावणाला सुचवले. हा सीताहरणाबाबत पहिला उल्लेख आहे. हा रावणाचा स्वत:चा मूळ बेत नाही. मात्र रावणाला हा सल्ला पटला व तो एकटाच निघाला व मारीचाच्या आश्रमात जाऊन त्याला भेटला. जनस्थानातून रावणाचे ठाणे उठल्यामुळे काहीतरी केले पाहिजे असे त्याला जाणवले. ही रावण-मारीच यांची पहिली भेट. तिच्याबद्दल आपण वाचलेले नसते! मारीच हा ताटकेचा पुत्र असल्यामुळे मदत करील अशी रावणाची साहजिकच अपेक्षा होती. हा मारीचाचा आश्रम कोठे होता याचा काही खुलासा नाही.
मात्र यावेळी मारीचाने रावणाला म्हटले, ’सीतेच्या हरणाचा सल्ला तुला देणारा तुझा शत्रूच म्हटला पाहिजे. रामाच्या तूं वाटेस जाऊं नको ते तुला झेपणार नाहीं. तूं लंकेत सुखाने राज्य कर व रामाला पंचवटीत सुखाने राहूंदे!’ नवल म्हणजे रावणाने हा सल्ला मानला व तो लंकेला परत गेला!

Saturday, May 8, 2010

अरण्यकांड - भाग ४

राम-लक्ष्मण-सीता पंचवटीत राहू लागल्यावर घडलेला महत्वाचा प्रसंग म्हणजे शूर्पणखेच्या भेटीचा. हा वेळपर्यंत विराध सोडून इतर कोणाही नरभक्षक राक्षसाशी वा रावणाच्या अनुयायाशी रामाची भेट वा झगडा झालेला नव्हता. रावणपक्षाचा एक खर नावाचा प्रमुख वीर, शूर्पणखेचा भाऊ व रावणाचाहि भाउबंद, मोठ्या सैन्यबळासह पंचवटीजवळच जनस्थानात राहत होता. त्याला राम-लक्ष्मण पंचवटीत आल्याचे माहीत नव्हते, पण सान्निध्यामुळे संघर्ष केव्हातरी अटळ होता. खराच्या सैन्यात धनुष्यबाणाने लढणारे वीर थोडेसेच होते. इतर सर्व सैन्य हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्रांनी लढणारे होते असे पुढील समरप्रसंगाच्या वर्णनावरून दिसते. हे सर्व स्थायिक नरभक्षक जमातींची असावे.
राम दिसल्यावर शूर्पणखेने त्याची अभिलाषा व्यक्त केली. राम-लक्ष्मणांनी तिची टवाळी केली. तिला राक्षसी म्हटले आहे व विद्रूप असे वर्णन केले आहे तसेच ’सुंदर’ असेहि म्हटले आहे. ती रावणाची बहीण, म्हणजे नरभक्षक जमातीची खासच नव्हती. त्यामुळे तिचे विद्रूप असे वर्णन तिला राक्षसी म्हणण्याशी निगडित आहे. रावण व त्याचे कुटुंब व प्रमुख मंत्री, हे यज्ञसंस्कृति मानणारे होते. यज्ञांचा विध्वंस करणार्‍यांपैकी नव्हते. त्यांचा राम प्रतिनिधित्व करणार्‍या आर्यकुळांशी दीर्घकाळाचा वैरभाव कां होता? सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय? आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय? हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते! जणू राम-लक्ष्मणाना आता, रावणाबरोबर अद्याप न घडलेला, संघर्ष हवाच होता.

Tuesday, May 4, 2010

अरण्यकांड - भाग ३

पंचवटीत रामाचे वास्तव्य फारसे झाले नाही. पंचवटीत रहावयास आले तेव्हां शरद ऋतु चालू होता असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर हेमंत व शिशिर हे दोनच ऋतु राम-लक्ष्मण-सीता यांचे पंचवटीत वास्तव्य झाले. रावणाने सीतेचे हरण केले तेव्हां शिशिर संपत आला होता कारण नंतर राम-लक्ष्मण वनात भटकत असताना हा वसंत ऋतु चालू आहे असे राम वारंवार म्हणतो व वसंताच्या शोभेचे वर्णन करतो. पद्मपुराणात सीताहरणाची तिथि माघ व. अष्टमी अशी दिली आहे. हा उल्लेख रामायणाच्या भाषांतरातहि आहे. तेव्हा शिशिर अर्धा संपला होता याला दुजोरा मिळतो.
चित्रकूट व पंचवटी दोन्ही ठिकाणी रामाचे वास्तव्य अल्पकाळच झाले हे स्वच्छ असूनहि चित्रकूटात समजूत आहे कीं रामाचे चित्रकूटात दीर्घकाळ वास्तव्य झाले व महाराष्ट्रात समजूत आहे की पंचवटी हे रामाचे वनवासातील प्रमुख वास्तव्यस्थळ! चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत रामाचा प्रवास दीर्घकाळ व अज्ञात मार्गाने झाला. अनेक नद्या, विंध्य व सातपुडा ओलांडावे लागले असणार. अजूनहि हा भाग दुर्गम आहे व आदिवासी वसतीचा आहे. या आदिवासी समाजांमध्ये रामाच्या प्रवासमार्ग व वास्तव्याबाबत असलेल्या समजुतींचे संकलन व अभ्यास केला तर कदाचित रामाच्या प्रवासमार्गावर काही प्रकाश पडेल. असा कांही अभ्यास वा संशोधन झाले असल्यास माहीत नाही. या संदर्भात, डॉ. सांकलिया नावाच्या पुरातत्त्ववेत्याच्या मते राम विंध्य ओलांडून दक्षिणेत आलाच नाही व रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच असे वाचलेले स्मरते. याला मुख्य आधार म्हणजे, सालवृक्ष दक्षिण भारतात तुंगभद्रा परिसरात, जेथे किष्किंधा होती असे वर्णनावरून दिसते, तेथे आढळत नाहीत, याउलट, मध्यभारतात, सातपुड्याच्या उत्तरेला मुबलक होते. नेपानगरची न्यूजप्रिंट फॅक्टरी सालाइ झाडांपासून कागद बनवण्यासाठी बांधली गेली. (गेल्या काही वर्षात मात्र या सलाई वृक्षांची वारेमाप तोड झाली आहे.) डॉ. सांकलियांपाशी इतरहि अनेक आधार असतीलच. त्यांचे मत खरे असेल तर मग पंचवटी (गोदावरी तीरी म्हटलेली)व जनस्थान महाराष्ट्रात नव्हे तर कोठे होतीं? खरे खोटे ’राम जाणे!’
Locations of visitors to this page