Tuesday, February 17, 2009

बालकांड - भाग ११

बालकांडाच्या अखेरच्या भागांत राम व त्याचे बंधु यांच्या विवाहाची तपशीलवार हकीगत सांगितली आहे. जनकाच्या निमंत्रणाप्रमाणे दशरथ सर्व कुटुंबियांसमवेत मिथिलेला आला. वसिष्ठ व जनकाचा पुरोहित यांनी एकमेकांच्या कुळांचा इतिहास व महिमा एकमेकांस सांगितला. जनकाने आपली दुसरी कन्या लक्ष्मणाला दिली व भावाच्या दोन कन्या भरत शत्रुघ्नांना दिल्या. राम व त्याचे बंधु यावेळी सोळा वर्षांचे होते. सीता रामाला अनुरूप वयाची असे धरले तर ती १२-१३ वर्षांची व इतर बहिणी बहुधा त्याहून लहान म्हणजे बालिकाच होत्या. सीतेच्या प्राप्तीसाठी मागणी करणार्‍या व नाकारल्यामुळे युद्धाला उभे राहिलेल्या सुधन्वा नावाच्या राजाची कथा येथे येते. त्याचा पराभव करून व त्याला मारून त्याचे राज्य जनकाने आपल्या भावाला दिले. किती वर्षांपूर्वीची ही घटना ते सांगितलेले नाही. फार पूर्वीची असणे शक्यच नाही कारण सीतेचे वय यावेळी १२-१३च होते.
चारही भावांचे विवाह पार पडले. दशरथाबरोबर कैकयराजाचा पुत्र युधाजित, भरताचा मामा, उपस्थित होता. भरताला आजोबांच्या भेटीला नेण्यासाठी तो अयोध्येला आलेला होता. तो विवाहासाठी मिथिलेला आला. कौसल्या-सुमित्रा यांच्या कुळांपैकी कोणी आल्याचा उल्लेख नाही. कौसल्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी. तिला माहेराहून संपत्ति, गावे, मिळालेली होतीं असा पुढे उल्लेख मिळतो. सुमित्र गरीब, नगण्य घराण्यातील असावी. जनकाने हुंडा म्हणून अमाप धन, गायी, वस्त्रे, हत्ती, घोडे, रथ व सैनिकही दिले. दासदासी, रत्नेहि दिली. सीतेबरोबर १०० मैत्रिणीहि दिल्या! देवयानीबरोबर आलेली तिची मैत्रिण शर्मिष्ठा अखेर ययातीकडे पोचली, तसे रामाचे बाबतीत झाले नाही! विवाहसमारंभ आटपल्यावर विश्वामित्र आपल्या वाटेने गेले व दशरथही पुत्र, सुना, सैनिक, सेवकांसह अयोध्येला निघाले. मात्र वाटेत त्याना परशुराम आडवे आले.
त्यानी पूर्वी केलेला क्षत्रिय संहार आठवून दशरथ भयभीत झाला. परशुरामाने शिवधनुष्य तुटणे ही अद्भुत व अचिंत्य अशी घटना आहे असे म्हणून स्वत:चे धनुष्य रामासमोर धरले व म्हटले की ’हे सज्ज करून दाखव व तसे करू शकलास तर माझ्याशी द्वंद्वयुद्ध कर’. दशरथाने गयावया करून ’तुम्ही इंद्राजवळ प्रतिज्ञा करून शस्त्रांचा परित्याग केलेला आहे’ याचे स्मरण दिले. परशुरामाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले! त्याने रामाला पुन्हा म्हटले की विश्व्कर्म्याने बनवलेल्या दोन खास धनुष्यांपैकी एक शिवाने त्रिपुरासुराशी युद्ध करताना वापरले व हे दुसरे विष्णूपाशी होते. पूर्वी एकेकाळी शिव व विष्णू ही धनुष्ये घेऊन युद्धाला सज्ज झाले होते. देवांनी त्यांना शांत केले. शिवावे धनुष्य शिथिल अवस्थेत जनकाच्या पूर्वजांकडे ठेव म्हणून दिले गेले व विष्णूचे हे धनुष्य भृगुवंशीय ऋचीक, नंतर माझा पिता जमदग्नि व नंतर माझ्याकडे आले. शिवधनुष्य तुटल्याचे ऐकून मी हे त्याच्या तोडीचे विष्णु धनुष्य घेऊन आलो आहे तर तू हे सज्ज करून दाखव व मग माझ्याशी द्वंद्व युद्ध कर.’ रामाने धनुष्य सज्ज केले, बाण लावला व म्हटले की ’मी हा बाण तुमच्यावर सोडत नाही पण या वैष्णव बाणाने तुमचे सर्व तपोबल किंवा तुमची द्रुतसंचारशक्ति यांतील एक काहीतरी नष्ट होईल’ परशुराम म्हणाला कीं ’मी सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली व त्याने रात्री कोठेहि निवास करण्याची मला बंदी केली आहे त्यामुळे मला रात्रीपूर्वी महेंद्रपर्वतावर पोंचण्यासाठी द्रुतसंचार शक्तीची गरज आहे तेव्हां ती राहूं दे.’ रामाने त्याचे सर्व तपोबल नष्ट केले. राम हाच आपल्यानंतरचा विष्णूचा अवतार आहे हे जाणून परशुराम तपश्चर्येला निघून गेला. महेंद्रपर्वत कश्यपाला पृथ्वी दान केल्यावर परशुरामाने निर्माण केलेल्या ( वसतीखाली आणलेल्या) नवीन प्रदेशामध्ये होता काय? परशुराम यानंतर रामकथेत कोठेहि नाही, तो थेट महाभारतात पुन्हा अवतरतो. भीष्म व कर्ण हे त्याचे शिष्य त्या कथेत महत्वाचे आहेत. रामायणातील या प्रसंगामध्ये परशुरामाला एवढा कमीपणा देण्याचे काय कारण? राममाहात्म्य वाढवणे एवढेच. असे दिसते की क्षत्रियांमध्ये बलवान व्यक्ति पुन्हा जन्माला आल्या आहेत व झाला एवढा क्षत्रियसंहार पुरे हे परशुरामाला मान्य करावे लागले एवढाच मथितार्थ खरा.
विष्णुधनुष्य नंतर वरुणाला देऊन राम व दशरथ अयोध्येला गेले. लगेचच भरत व बरोबर शत्रुघ्नहि युधाजिताबरोबर कैकयदेशाला गेले. त्यांच्या पत्नी त्यांचेबरोबर गेल्याचा उल्लेख नाही. त्या अल्पवयीन असाव्या. भरत-शत्रुघ्न दीर्घकाळ कैकयदेशाला राहिले असे दिसते कारण रामाला राज्य देण्याचा बेत पुढे आला तोवरही ते परत आलेले नव्हते. मध्यंतरी किती काळ गेला? त्याचा उल्लेख रामायणात तेथे स्पष्ट नाही. त्याबद्दल पुढे विस्ताराने लिहीन. बालकांडावरचे लेखन येथे संपले.

Thursday, February 12, 2009

बालकांड - भाग १०

आता धनुर्भंगाची कथा पाहूं.
दुसर्‍या दिवशी जनकाने पुन्हा विश्वामित्र, राम व लक्ष्मण यांचे दरबारात स्वागत केले. विश्वामित्राने म्हटले कीं या दोघाना तुझे प्रख्यात धनुष्य पहावयाचे आहे. जनकाने धनुष्याचा इतिहास सांगितला कीं हें प्रत्यक्ष शिवाचे धनुष्य आहे व तें माझे पूर्वज देवरात यांना ठेव म्हणून देवांनी दिले तेव्हांपासून ते आमचेपाशी आहे. येथे फक्त एका वाक्यात, यज्ञासाठी भूमिशोधन करताना नांगराने उकरल्या जात असलेल्या जमिनीतून कन्या प्रगत झाली ती सीता, एवढाच सीतेच्या जन्माचा इतिहास जनकाने सांगितला आहे. प्रत्यक्षात, एक तर सीता ही जनकाचीच शेतकरी स्त्रीपासून झालेली कन्या असावी वा शेतांत कोणीतरी ठेवून दिलेली नवजात कन्या जनकाने स्वत:ची कन्या म्हणून वाढवली असावी यांपैकी एखादा तर्क स्वीकारावा लागतो. जनकाला त्या वेळेपर्यंत अपत्य नव्हते. जनकाला पुत्र असल्याचा कोठेच उल्लेख नाही. उर्मिळा ही पण जनकाची कन्या खरी पण ती सीतेपेक्षां लहान असली पाहिजे कारण ती लक्ष्मणाची पत्नी झाली. यामुळे जनकाने सीतेला अपत्यस्नेहापोटी स्वत:ची कन्या मानणे योग्य वाटते. रामायणाचे अनेक पाठभेद जगभर अनेक भाषांतून प्रचलित आहेत. त्यांतल्या एकांत ती रावणाची कन्या होती असाही तर्क केलेला आहे असे वाचलेले आठवते. अशा भरमसाठ तर्कापेक्षा मी वर व्यक्त केलेला तर्क कदाचित जास्त उचित म्हणतां येईल.
जनक पुढे म्हणाला कीं जो आपल्या पराक्रमाने हे शिवधनुष्य सज्ज करील त्यालाच ही माझी कन्या द्यावयाची असा माझा निश्चय आहे. पूर्वी एकदा सीतेच्या प्राप्तीसाठी सर्व राजे एकत्र जमून माझ्याकडे आले व कोणता पण लावला आहे असे त्यानी मला विचारले तेव्हा हाच पण मी त्यांना सांगितला. कोणालाही हे धनुष्य उचलता आले नाही. अपयशामुले रागावून त्या सर्वांनी माझ्याविरुद्ध युद्ध पुकारले व एक वर्षभर त्यांनी मिथिलेला वेढा घातला. शेवटीं मी देवांची प्रार्थना केली व त्यांनी प्रसन्न होहून मला चतुरंग सेना दिली व मग मी सर्व राजांना हरवून पिटाळून लावले. ( सीतेच्या प्राप्तीसाठी रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता व त्यांत तो धनुष्य उरावर घेऊन उताणा पडला अशी एक हरदासी कथा आहे मात्र तिला रामायणात कोणताही आधार नाही!) आता रामाने हे धनुष्य सज्ज केले तर मी ही माझी कन्या त्याला देईन असे जनक अखेरीस म्हणाला. ( राम यावेळी जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता फारतर १३-१४ वर्षांची असेल. तेव्हां यापूर्वीच काही काळ अनेक राजांनी तिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला हे जरासे अविश्वसनीयच वाटते!)
या सर्व प्रसंगात सीता अजिबात उपस्थित नाही. तिने रामाला अद्याप पाहिलेलेहि नाही. स्वयंवर वगैरे काही समारंभ योजलेलाच नव्हता. विश्वामित्र व राम-लक्ष्मण अचानक व अनाहूतच आलेले होते. मग ’लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले? हे गाणे लिहिणाराने सीता व द्रौपदी या दोघींच्यात मोठी गफलत केलेली दिसते!
धनुष्य राजा जनक विश्वामित्र राम व लक्ष्मण यांचेसमोर आले. संदूक उघडून रामाने ते सहजच उचलले व त्याला प्रत्यंचा लावली. त्यावर बाण न ठेवतांच त्याने ते खेचले तो तें तुटलेच.! धनुष्य कां तुटले असेल? यापूर्वी वेळोवेळी युद्धात ते त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत अनेकवार खेचले गेले असणार त्यामुळे त्याचे engineering शास्त्राप्रमाणे ’work hardening’ झाले असेल. त्यामुळे रामाने ते झटक्याने खेचले तेव्हा ते तुटले. रामाने धनुष्य सज्ज केले त्यामुळे जनकाने प्रतिज्ञेप्रमाणे सीता रामाला अर्पण केल्याचे जाहीर केले. विश्वामित्राच्या संमतीने लगेच जनकाने आपले मंत्री दशरथाकडे पाठवून, सर्व हकीगत कळवून विवाहासाठी सर्वांनी येण्याचे आमंत्रण केले. एवढेच सीता स्वयंवर! प्रत्यक्षात सीतेला कोणी कांही विचारलेच नाही! तेव्हा या प्रकाराला स्वयंवर कां म्हणावे हा प्रश्नच आहे!

Monday, February 9, 2009

बालकांड - भाग ९

या कथेमध्ये विश्वामित्राने त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टि निर्माण केली असे म्हटले आहे. बर्‍याच विचारांती हे एक रूपक आहे असे माझे मत बनले आहे. त्याचा मला सुचलेला खुलासा खालीलप्रमाणे आहे. आकाशात उत्तरध्रुव व तेथून आकाशीय विषुववृत्तापर्यंतच्या आकाशाच्या भागामध्ये अनेक तारकापुंज आहेत. आकाशीय विषुववृत्ताच्या (Celestial Equator) जवळच्या लहानशा पट्ट्यातून सूर्य, चंद्र व इतर बहुतेक ग्रह फिरतात. त्यांच्या भ्रमणमार्गाच्या या पट्ट्यात जे सत्तावीस तारकापुंज येतात त्याना नक्षत्रे म्हणतात. ही सर्व भारतात आपणाला दिसतात. भारतात येण्यापूर्वी आर्यलोक आणखी उत्तरेला उत्तरध्रुवाजवळच्या भागात राहात असावेत असे लोकमान्य टिळकांचे प्रतिपादन होते. भारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत त्यांचे वसतिस्थान अद्याप मुख्यत्वे उत्तरभारतातच होते. हा भूभाग पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या (terrestrial equator) बराच उत्तरेला २५ ते ३० अक्षांशांदरम्यान आहे. उत्तरध्रुवावरून आकाशाचा फक्त अर्धा भाग, आकाशाच्या उत्तर गोलार्धाचा, आकाशीय विषुववृत्ताच्या उत्तरेचा, दिसतो. उरलेला आकाशाचा भाग त्या भागातून आर्याना कधीच दिसत नव्हता. उत्तरभारतात आल्यावरही विश्वामित्राच्या काळापर्यंत हा दक्षिण ध्रुवापासून २५-३० अंशांपर्यंतचा आकाशाचा भाग आर्य ऋषिमुनीना दिसत नव्हता. या न दिसणार्‍या आकाशाच्या भागातहि अनेक तारकापुंज प्रत्यक्षात आहेतच. प्रत्यक्ष दक्षिण ध्रुवापाशी एखादा तारा नाही. मात्र जवळच सदर्न क्रॉस नावाचा तारा आहे. दक्षिण गोलार्धात समुद्रावर सफर करणार्‍या जहाजांना त्याचा वेध घेऊन दक्षिण दिशा ठरवतां येते. विश्वामित्राने या अद्याप सर्रास न दिसलेल्या आकाशाच्या भागामध्येहि ध्रुव, इतर तारकापुंज, कदाचित दुसरे सप्तर्षि, वा नवीन नक्षत्रे असली पाहिजेत हे तर्काने जाणले असावे वा दक्षिण दिशेला प्रवास करत असताना भारताच्या दक्षिण टोकापाशी पोचून ( हा भाग विषुववृत्तापासऊन फक्त १० अंशांवर आहे.) हे पूर्वी न दिसलेले तारकापुंज प्रत्यक्ष पाहिले असावेत व त्यांना नवीन नक्षत्रे म्हटले असावे. यालाच ’त्याने प्रतिसृष्टि निर्माण केली’ असे म्हटले गेले असावे. रामायणात, प्रतिसृष्टि निर्माण केली याचे वर्णन ’दक्षिणमार्गासाठी नवीन सप्तर्षींची सृष्टि केली व नवीन नक्षत्रेहि निर्माण केली’ असेच केले आहे. रामायणात, सर्ग ६०-श्लोक २४ ते ३२ मध्ये ऋशिमुनींनी व देवांनी विश्वामित्राने निर्माण केलेली प्रतिसृष्टि मान्य केली व ’तुम्ही निर्माण केलेली सर्व नक्षत्रे वैश्वानरपथातून बाहेर प्रकाशित होतील व त्यांत त्रिशंकूहि प्रकाशमान होईल’ असा त्यांना वर दिला असे म्हटले आहे. याचा अर्थ विश्वामित्राचे संशोधन व/वा तर्क ऋषिमुनीनी मान्य केला असा केला पाहिजे. मूळची सत्तावीस नक्षत्रे सूर्याच्या भ्रमणमार्गावर म्हणजे वैश्वानरपथावर आहेत व नवीन नक्षत्रे त्याचे बाहेर, आणखी दक्षिणेला, आहेत हे बरोबर जुळते. रामायणातच असलेल्या या सर्व वर्णनावरून प्रतिसृष्टि निर्माण केली म्हणजे काय याबद्दलचा हा खुलासा मला सुचला आहे. आकाशाच्या या दक्षिणध्रुवाजवळपासच्या भागात एखाद्या तारकापुंजात ’खालीं डोके-वर पाय’ अशा अवस्थेत लोंबकाळणार्‍या माणसासारखा दिसणारा एखादा तारकासमूह आहे काय? असल्यास तोच त्रिशकु! हा तर्क तपासून पाहणे मात्र माझ्या कुवतीबाहेरचे आहे. जो तर्क वा खुलासा वाचलेल्या मजकुरांतून सुचला तो आपणापुढे ठेवला आहे!

Wednesday, February 4, 2009

बालकांड - भाग ८

यानंतर धनुर्भंग, राम-सीता विवाह व परशुरामाशी विवाद हा बालकांडाचा अखेरचा भाग पाहण्यापूर्वी विश्वामित्रकथा पाहूं. अहल्येच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण व विश्वामित्र जनकराजाच्या मिथिलानगरीचे बाहेर उतरले होते. जनकाचा एक यज्ञ चालू होता व त्यानिमित्त ब्राह्मण, ऋषि व शिष्य यांची गर्दी उसळली होती. राजा जनक व पुरोहित शतानंद यांनी विश्वामित्राची भेट घेतली व आदरसत्कार केला. यज्ञाचे उरलेले बारा दिवस येथेच रहा असा आग्रह केला. मग राम-लक्ष्मणांची चौकशी केली. विश्वामित्राने त्यांची माहिती व महती सांगून त्यांना तुझे महान धनुष्य पहावयाचे आहे असे म्हटले. शतानंदाने मातापित्यांची चौकशी केली व मग रामलक्ष्मणांना विश्वामित्रांची सर्व कथा सांगितली. महाभारतांतहि विशामित्राची कथा आहेच. मात्र दोन्ही कथांत थोडाफार फरक आहे.
विश्वामित्राने वसिष्ठांच्या कामधेनूची मागणी केल्यामुळे त्या दोघांचा संघर्ष झाला. विश्वामित्राने कामधेनूचे जबरदस्तीने हरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हां वसिष्ठांच्या सांगण्यावरून तिने स्वत:च सैन्य निर्माण करून स्वत:चे संरक्षण केले. विश्वामित्राच्या सर्व सैन्याचा संहार झाला. त्याचे शंभर पुत्र वसिष्ठाच्या क्रोधाला बळी पडले. उरलेल्या एका पुत्राला राज्य देऊन (विश्वामित्र मूळचा क्षत्रिय राजा) विश्वामित्र तपश्चर्येला गेला. अस्त्रे मिळवून त्याने पुन्हा वसिष्ठावर चाल केली. पण एका ब्रह्मदंडाच्या बळावर वसिष्ठाने त्याचा पुन्हा पराभव केला. तेव्हां ब्राह्मबळापुढे क्षात्रबळाचा निभाव लागत नाही म्हणून क्षत्रियबळाचा धि:क्कार करून विश्वामित्र ब्रह्मर्षिपद मिळवण्याच्या प्रयत्नाला लागला. त्याच्या तप:चर्येला पहिला अडथळा आला तो त्रिशंकूने सदेह स्वर्गाला जाण्यासाठी त्यांची मदत मागितली याचा. वसिष्ठपुत्रांनी त्रिशंकूला मदत नाकारल्यामुळे ईर्षेला बळी पडून विश्वामित्राने आपले तपोबल त्रिशंकूसाठी पणाला लावले. इंद्राने त्रिशंकूला सदेह स्वर्गात प्रवेश नाकारला व स्वर्गातून ढकलून दिल्यामुळे खाली डोके-वर पाय अशा अवस्थेत तो पृथ्वीवर पडू लागला. त्याला आकाशातच लटकत ठेवून त्याच्यासाठी विश्वामित्राने प्रतिसृष्टि निर्माण केली. (प्रतिसृष्टि हे काय प्रकरण आहे याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहिणार आहे.) या सर्व खटाटोपात पुण्यक्षय झाल्यामुळे विश्वामित्र पुष्करतीर्थामध्ये पुन्हा तपश्चर्येला बसले. त्या काळी मेनका ही अप्सरा पुष्करतीर्थात स्नानाला आली. ती स्वत:हूनच आली होती. तिला इंद्राने विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी पाठवले होते असे रामायण म्हणत नाही! मात्र तिच्या मोहात विश्वामित्र पडला हे खरे. एकूण दहा वर्षांचा काळ त्यांनी एकत्र घालवला. हा क्षणिक मोह नक्कीच नव्हता!. रामायणात येथे शकुंतलेचा मात्र अजिबात उल्लेख नाही! दहा वर्षांनी विश्वामित्र भानावर आले. त्यांनी मेनकेला मधुर शब्दात निरोप दिला व पुन्हा तपाला आरंभ केला. यावेळी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने येऊन कौतुक केले पण ब्रह्मर्षिपद मान्य केले नाही. कारण विश्वामित्र अजूनहि जितेंद्रिय झालेले नव्हते. पुन्हा घोर तपश्चर्या चालू राहिली. यावेळी तपोभंगासाठी इंद्राने रंभेला पाठवले. तिच्या दर्शनाने काम व क्रोध दोन्हीहि जागृत झाल्यामुळे निराश होऊन विश्वामित्राने तिला शाप दिला व पुन्हा खडतर तप चालू केले. यावेळी मात्र त्यांनी सर्व विकारांवर विजय मिळवला व आपले ब्रह्मर्षिपद खुद्द वसिष्ठांकडूनच मान्य करवून घेतले. त्यांचे वैर संपून मैत्री झाली. खडतर प्रयत्नानी स्वत:च्या मनोवृत्तींवर विजय मिळवतां येतो हे त्यानी दाखवून दिले. रामायणातील विश्वामित्रकथा ही अशी आहे. महाभारतापेक्षां ही जास्त विस्तृत आहे व रंजकही आहे.

Sunday, February 1, 2009

बालकांड - भाग ७

यानंतर गौतम-अहल्येची प्रसिध्द कथा पाहूं. जनकाच्या मिथिला नगरीत प्रवेश करण्यापूर्वी उपवनात एक उजाड आश्रम दिसला तेव्हां हा कोणाचा असे रामाने विचारले. त्यावर विश्वामित्राने हा आश्रम गौतमाचा असे म्हणून गौतम अहल्येची कथा रामाला सांगितली. ती आपल्या समजुतीपेक्षां बरीच वेगळी आहे. गौतम बाहेर गेलेले असताना, अहल्येची अभिलाषा धरून इंद्र गौतमवेषाने अहल्येकडे आला. हा गौतम नव्हे, इंद्र आहे हें अहल्येला कळले होते. मात्र तरीहि खुद्द देवराज इंद्र आपली अभिलाषा बाळगतो याचा आनंद व अभिमान वाटून अहल्या इंद्राला वश झाली. हेतु साध्य झाल्यावर मात्र गौतमाच्या भयाने इंद्र पळून जात असतानाच गौतम परत आले. झालेला प्रकार ओळखून त्यांनी इंद्राला रागाने घोर शाप दिला, ज्यायोगे त्याचे वृषण गळून पडले. अहल्येची त्यांनी निर्भर्त्सना केली पण शाप दिला नाही! ती शिळा होऊन पडली नाही. ’आपला संसार संपला, मी निघून जातो आहे. झाल्या गोष्टीचा पश्चात्ताप करीत दीर्घ काळपर्यंत तूं येथेच रहा. कालांतराने तुझ्या दुराचरणाचा दोष तुझ्याच तपाचरणाने पुसून जाईल. पुढे राम येथे येईल ती त्याची कालमर्यादा राहील. त्यांनंतर मी पुन्हा तुझा स्वीकार करीन’ असे म्हणून गौतम निघून गेले. गौतमाचे सांगणे मानून अहल्या तेथेच तपाचरण करीत राहिली. ही सर्व कथा सांगून विश्वामित्राने रामाला म्हटले कीं ’अहल्या येथेच आहे तेव्हां तिची भेट घे’. तिचा उद्धार कर वगैरे काही मुळीच सांगितले नाही!
राम लक्ष्मण व विश्वामित्र आश्रमात जाऊन अहल्येला भेटले. रामाने अहल्येला पाहिलें तेव्हां ती दीर्घ तपाचरणामुळे दैदीप्यमान अशी रामाला दिसली. तिने राम-लक्ष्मण व विश्वामित्र यांचा आदर सत्कार केला. राम-लक्ष्मणांनी तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. तेवढ्यांत गौतमहि येऊन त्यानीहि विश्वामित्राला वंदन केले व अहल्येचा स्वीकार केला. पुढे जनकाच्या नगरीत जनकाचा पुरोहित असलेला गौतम-अहल्यापुत्र शतानंद याने रामाकडून हीसर्व हकीगत समजावून घेऊन मातापित्यांचा समेट झाल्याचे ऐकून समाधान व आनंद व्यक्त केला.
ही कथा जशी रामायणात आहे तशीच, नैसर्गिक, उज्ज्वल व रोचक वाटते. तिचें, अहल्या शापामुळे दीर्घकाळ शिळा होऊन पडणे, रामाच्या पायधुळीमुळे ती पुन्हा मानवरूपात येणे, असे खुळचट स्वरूप कां व केव्हां बनले असावे? रामाला ईश्वरावतार मानले जाऊ लागल्यावर निव्वळ रामाला मोठेपणा देण्यासाठी झाला असावा. इंद्र भेटीपूर्वीचा शतानंदाचा जन्म, इंद्रभेटीपूर्वीच तो आश्रम सोडून गेलेला होता म्हणजे तेव्हां तो १५-२० वर्षांचा असावा. तो रामाला भेटला तेव्हा त्याचे वर्णन अतिवृद्ध असे केलेले नाही. त्या अर्थी फारतर २०-२५ वर्षे अहल्येने तपाचरणात व्यक्त केली. युगानुयुगे शिळा होऊन पडून राहून रामाची वाट पाहत नव्हे हे निश्चित! ’पाउलातली धूळ होउनी’ वगैरे सर्व खोटे! अहल्येची खरी कथा खुद्द वाल्मिकिरामायणात स्पष्ट लिहिलेली असूनहि आपण तिचे भ्रष्ट स्वरूप बिनदिक्कत स्वीकारतो याचे नवल वाटते.
Locations of visitors to this page