Tuesday, June 22, 2010

अरण्यकांड - भाग १२

रामाचा शोक, संताप व विरहदु:ख यांचे अतिशय सुरस वर्णन रामायणात केले आहे. त्याने लक्ष्मणाला म्हटले कीं ’सीता नाही, आता मी अयोध्येला परत येतच नाहीं तेव्हां तूं परत जा.’ लक्ष्मणाने कशीबशी त्याची समजूत घातली. असे सुचेल त्या दिशेला दोघे भटकत असताना त्यांची अचानक कबंध नावाच्या राक्षसाशी गाठ पडली. हा महाबलवान, पण विकृत शरीराचा होता असे त्याचे वर्णन केलेले आहे. त्याने दोघानाही अचानक पकडले पण प्रसंगावधान राखून दोघांनी तलवारीने त्याचे दोन्ही हात तोडून टाकले. मरण्यापूर्वी त्याने सांगितले कीं रावण लंकेला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत मिळवावी लागेल. त्यासाठी तुम्ही वानरराज सुग्रीवाला भेटा. तोही राज्यभ्रष्ट व पत्नीभ्रष्ट आहे तेव्हां एकमेकांना मदत करा.’ तो पांपासरोवरानजीक मतंगवनापाशी ऋष्यमूक पर्वतावर भेटेल अशी माहितीहि दिली. हा वेळ पर्यंत रामायणात वानर या समाजाचा उल्लेख केलेला नाहीं त्याअर्थी ते दक्षिण भारतातच असावे असें म्हणतां येईल. हा एक शाकाहारी व अन्न गोळा करणारा पण शेती करण्यापर्यंत प्रगति न झालेला, आर्यांपासून वेगळा, पण ’राक्षसां’प्रमाणे नरमांसभक्षक व यज्ञविरोधक नव्हे, असा बराचसा सुधारलेला मानवसमाज दिसून येतो. पुढे महाभारतकाळापर्यंत हा समाज बदलत जाऊन, आर्याच्यांत मिसळून गेलेला असावा त्यामुळे कोणाही वानरराजाचा उल्लेख महाभारतांत अजिबात दिसत नाहीं.
रामलक्ष्मण दक्षिण दिशेला गेले व पुष्कळ प्रवासानंतर मतंगवनापाशी पोंचले. पंपासरोवर, किष्किंधा वगैरे परिसर आज कर्णाटकांत असल्याचे मानले जाते. पंचवटीपासून येथपर्यंतचा प्रवास करण्यास राम-लक्ष्मणांना, दोन-अडीच महिने लागले असे दिसते. प्रवासांतील सर्व निसर्गवर्णनात वसंतऋतूचा उल्लेख जागोजागीं येतो. सीतेचे हरण माघ व. अष्ट्मीला झाले व सुग्रीवाची भेट होऊन पुढे वालीचा वध ग्रीष्मऋतूच्या शेवटी असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे रामसुग्रीव भेट ग्रीष्म अर्धापाउण संपल्यावर झाली असणार हे उघड आहे. तेव्हा फाल्गुन व चैत्र हे दोन महिने तरी नक्कीच प्रवासात गेले असे दिसून येते. कदाचित रावणहि याच सुमारास लंकेला पोंचला असेल!
मतंगवनात मतंग ऋषींच्या वेळेपासून रहाणारी शबरी यावेळी रामाला भेटली. तिने केलेल्या साध्या-सुध्या सत्काराचा रामलक्ष्मणांनी स्वीकार केला व मग ते पंपासरोवराकडे गेले. मतंगऋषींच्या शापामुळे वाली त्याच्या जवळपासहि फिरकत नव्हता म्हणून सुग्रीव व त्याचे सहकारी, हनुमान व इतर, तेथेच आसरा घेऊन रहात होते. त्याना भेटण्याचा रामाचा बेत होता.
येथे अरण्यकांडातील कथाभाग संपला. पुढील किष्किंधाकांडाची सुरवात राम-सुग्रीवांच्या भेटीपासून होते. ती पुढे पाहूं.

Monday, June 14, 2010

अरण्यकांड - भाग ११

विजयादशमीला रावणवध झाला अशी समजूत आहे. उत्तरभारतात विजयादशमीला रामलीला व रावणवधाची दृश्ये दाखवली जातात. पण खुद्द रामायणातील वर्णनांवरून अशा समजुतीला मुळीच आधार दिसत नाही. हनुमान व सीता यांची भेट मार्गशीर्ष शु. नवमीला झाली असा उल्लेख आहे. त्यानंतर वानरसैन्य समुद्र ओलांडून लंकेत पोचले, आणि युद्ध उभे राहिले. प्रमुख युद्धप्रसंगांच्या भाषांतरकारांनी ज्या तिथि दिल्या आहेत त्याप्रमाणे फाल्गुन वद्य ३० पर्यंत कुंभकर्ण, इंद्रजित वगैरे सर्व प्रमुख वीरांचा वध होऊन रावण स्वत: युद्धाला आला असे म्हटले आहे. तेथून पुढे रावणवधापर्यंत आश्विन शु. दशमी म्हणजे विजयादशमी खासच उजाडली नव्हती. रावणवध विजयादशमीला नव्हे तर चैत्राच्या पहिल्या १०-१२ दिवसांतच झाला असला पाहिजे. रावणवधानंतर राम लगेच अयोध्येला परत गेला. रामाचा वनवास चैत्रांत सुरू झाला होता तेव्हां तो चैत्रांत संपला हे सयुक्तिकच आहे. रावणवध व विजयादशमी यांची सांगड कां घातली जाते याचा मात्र उलगडा होत नाहीं.
(विजयादशमीला अर्जुनाने शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून कौरवांशी सामना केला अशीहि एक समजूत आहे, तीहि सपशेल चुकीची आहे कारण कौरवांचा विराटावरील हल्ला झाला व अर्जुनाने त्यांचा सामना केला तेव्हां ’हा ग्रीष्म चालू आहे’ असा स्पष्ट उल्लेख भीष्माचे तोंडी आहे!)
राम मारीचाला मारून घाईघाईने कुटीकडे परत येत असताना वाटेतच लक्ष्मण भेटला. सीतेला एकटी सोडून आपल्या मदतीला आल्याबद्दल रामाने लक्ष्मणालाच दोष दिला. दोघे कुटीकडे परत आले तर सीता दिसेना. दोघे भयभीत झाले. रामतर वेडापिसाच झाला. त्याच्या शोकाचे व संतापाचे सुंदर वर्णन रामायणात आहे. लक्ष्मणाने त्याला कसेबसे समजावले व दोघांनी सीतेचा शोध सुरू केला. काही वेळाने रावण-जटायु संग्रामस्थळापाशी आले. तेथील रक्तपात पाहून रामाने समजूत करून घेतली कीं सीतेला बहुधा राक्षसांनी खाल्ले. लक्ष्मणाने पुन्हा समजावले कीं येथे दिसणार्‍या खुणांवरून येथे एका वीराचे व एका रथीचे युद्ध झाले आहे. रथ मोडून पडला आहे, गाढवे मरून पडलीं आहेत सारथी मेला आहे व छत्र मोडले आहे. जवळपास शोधल्यावर आसन्नमरण जटायु दिसला. त्याने खेद व्यक्त केला कीं मी रावणाला थोपवूं शकलों नाहीं, तो सीतेला घेऊन गेला. दु:ख बाजूला ठेवून राम-लक्ष्मणांनी जटायूचे दहन केले. रावण सीतेला घेऊन लंकेला गेला एवढे कळले पण लंका कोठे आहे हे रामाला माहीत नव्हते. काय करावे सुचेना.

Monday, June 7, 2010

अरण्यकांड भाग १०

सीतेची व्यवस्था लावून रावण लगेच आपल्या सहाय्यकांना भेटला व खराच्या सैन्याचा नाश झाल्याचे सांगून त्यांना म्हणाला कीं तुम्ही जनस्थानाला जा. रामाने खराला मारल्यामुळे मला फार राग आला आहे व रामाला मारूनच तो शांत होईल. जनस्थानात राहून रामाची खबर तुम्ही मला कळवा. सीतेला पळवून आणल्याचे मात्र त्याना सांगितले नाही. रामाशी युद्ध आता अटळ आहे हे रावणाने जाणले होते व तो तयारीला लागला होता.
रावणाने लंकेचे वैभव सीतेला अनेक प्रकारे ऐकवले व राम लंकेला येऊच शकणार नाही तेव्हां तूं आतां मला वश हो असे विनवले. सीतेने त्याला साफ झिडकारले. रावणाने अखेर तिला अशोकवनात ’राक्षसिणींच्या’ पहार्‍यात ठेवले. त्याना आज्ञा दिली कीं तिला भीति घाला, मग गोड बोला, काही करून तिचा अहंकार दूर करा व तिला वश करा. कोणत्याही मार्गाने सीता वश होत नाही हे दिसून आल्यावर त्याने अखेर सीतेला एक वर्षाची मुदत दिली व त्यानंतरहि ऐकले नाहीस तर खाऊन टाकीन असा धाक घातला.
रावणाने सीतेला एक वर्षाची दीर्घ मुदत दिली होती हा एक महत्वाचा उल्लेख आहे. त्यावरून रावणाचा खरा हेतु स्पष्ट होतो. राम सीतेला सोडवण्याचा निकराचा प्रयत्न करील हे उघड होते, मात्र तो अयोध्येच्या वा इतर कोणाच्याही मदतीने लंकेवर चाल करूं शकला तर होणारे युद्ध लंकेत, म्हणजे रावणाला अनुकूल अशा भूमीवर झाले असते. त्याला सीता हवी होती असे मला मुळीच वाटत नाही. तसे असते तर एक वर्ष थांबण्याची गरज नव्हती, ती हातांत आलीच होती! त्याचे ’कपटी, कामी, लंपट, राक्षस’ हे वर्णन निव्वळ तो रामाचा शत्रु म्हणून केलेले आहे. जनस्थानाऐवजी रामाबरोबरचे निर्णायक युद्ध त्याला लंकेत हवे होते हा त्याचा सीतेला पळवून आणण्यामागील खरा हेतु होता असे माझे मत आहे. प्रत्यक्षात राम लकेत पोचून युद्ध होईपर्यंत एक वर्षाहूनहि जास्त काळ गेला. सीताहरण माघ व. अष्टमीस झाले, हनुमान पुढील वर्षाच्या मार्गशीर्षात लंकेस पोचला व त्यानंतर राम ससैन्य लंकेस पोचून युद्ध होऊन फाल्गुन-अखेर / चैत्राच्या सुरवातीला रावणवध झाला (विजयादशमीला मुळीच नाहीं!). मात्र वर्ष संपले तरी रावणाने सीतेवर अत्याचार केला नाही यावरून त्याचा हेतु राजकीय व युद्धाच्या डावपेचांचा भाग होता हे उघड आहे.

Thursday, June 3, 2010

अरण्यकांड - भाग ९

सीतेच्या मागणीवरून राम हरणाच्या मागे गेला तेव्हां सीतेच्या रक्षणाचे काम त्याने लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोंपवले होते. पण जटायु जवळपास नव्हताच. लक्ष्मणानेहि रामाच्या मदतीला जाण्याआधी ’आपण त्यासाठी जटायुला पाठवूं’ असें सीतेला सुचवले नाहीं. सीतेने तें मानले नसतेच हे वेगळे. लक्ष्मणाने जाताना जटायूला ’तूं सावध रहा’ असेहि सुचवले नाहीं. कारण तो जवळ नव्हताच. रावणाने सीतेला उचलल्यावर तिचा विलाप झाडावर झोपलेल्या वृद्ध जटायूच्या कानीं पडला व तो खडबडून जागा झाला असें रामायण म्हणते. जटायूने स्वत:च ’मी तुमच्या आश्रयाने राहीन व सीतेच्या रक्षणात मदत करीन’ असे रामाला म्हटले होते. तेव्हां तो जवळपास पण स्वतंत्रच राहत असणार. सीतेने विलाप करतानाहि त्याला हाका मारल्या नव्हत्या. तो सरसावून आल्यावरहि ’तुला रावणाशी लढणे जमणार नाही, तूं फक्त घडालेली हकीगत रामाला सांग’ असे सीता त्याला म्हणाली. कारण तो वृद्ध होता. मात्र त्याने रावणाबरोबर निकराची झुंज दिली तीहि इतकी प्रखर कीं त्याने रावणाचा सारथी मारला, रथाला जोडलेलीं गाढवें मारलीं व रथाचाहि पूर्ण विध्वंस केला. रावणालाहि फार जखमी केले. मात्र त्याचे बळ अखेर कमी पडून प्राणांतिक जखमा होऊन तो पडला. सीतेने पुन्हा जोराने विलाप केला, हेतु हा कीं जवळपास कोणी असेल तर त्याला ऐकूं जावें. रावणाचा रथ वा विमान पूर्ण नष्ट झाले होते. मात्र तरीहि रावण सीतेला घेऊन आकाशमार्गाने लंकेला गेला असें रामायण म्हणते, हे आकाशमार्गाने जाणे म्हणजे काय याचा कांही उलगडा मला सुचलेला नाहीं. वाटेतील एका पर्वतावर काही वानर बसलेले (हनुमान, सुग्रीव वगैरे) सीतेला दिसले. त्यानाहि रावण सीतेला घेऊन चाललेला दिसला पण त्यांची रावणाशीं गाठ पडली नाहीं तेव्हां ते बसलेल्या शिखरापेक्षां उंचावरून जाणार्‍या वाटेने रावण गेला असे म्हणावे लागते. रावण घेऊन जात असताना सीतेने त्याची परोपरीने निर्भर्त्सना केली व ’तुझा मृत्यु अटळ आहे’ असें बजावले. सीतेने वस्त्रांत गुंडाललेले काही दागिने वानरांकडे टाकले हें रावणाच्या लक्षात आले नाही कारण त्याने ते थांबवले नाहीं. अखेर रावण सीतेला घेऊन लंकेला पोचला व सरळ अंत:पुरांत जाऊन सीतेला तेथे ठेवून पहारेकरणींना ताकीद दिली कीं ’तिला पाहिजे असेल तें द्या आणि त्रास देऊं नका. वैदेहीला अप्रिय लागेल असें बोलणार्‍या व्यक्तीला आपला जीव प्यारा नाही असे मी समजेन’ रावणाबद्दल आपल्या कल्पनांशी हें सुसंगत नाहीं पण रामायणच हे म्हणते! सीताहरण माघ व. अष्टमीला झाले असे पद्मपुराणात म्हटले आहे. मात्र रावण कोणत्या तिथीला लंकेला पोंचला ते सांगितलेले नाही त्यामुळे प्रवासात किती काल गेला ते कळत नाहीं.
Locations of visitors to this page