Monday, December 6, 2010

किष्किंधा कांड भाग ४

रामाने वालीला मारण्याचे वचन दिले खरे पण सुग्रीवाला खात्री पटली नाही कीं महाबली वालीचा राम बाणाने वध करूं शकेल कीं नाहीं? मग रामाने आपल्या धनुष्याची ताकद एका सालवृक्षावर बाण सोडून दाखवून दिली. एक बाण सात वृक्षांना भेदून गेला हे रामायणातील वर्णन मला अर्थातच अतिशयोक्त वाटते त्यामुळे भावार्थ लक्षात घ्यावयाचा. सुग्रीवाची खात्री पटल्यावर त्याने रामाच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्यावर विसंबून, किष्किंधेत जाऊन वालीला युद्धाचे आव्हान दिले. दोघांचे जोरदार द्वंद्व झाले. राम वालीला बाण मारील हा सुग्रीवाचा भरवसा फोल ठरला. शेवटी मार खाऊन सुग्रीवाला पळावे लागले. ’तुम्ही बाण कां मारला नाही आणि मारायचा नव्हता तर मला कशाला भरीला घातले’ असे सुग्रीवाने रामाला रागावून विचारले. रामाने सारवासारव केली कीं तुम्ही दोघे इतके सारखे दिसत होतां कीं मला ओळखूं येईना व उगीच तुला इजा होऊं नये म्हणून मी हात उचलला नाही. मला वाटते कीं रामाचे मन द्विधा झाले असावे कीं आपण असें लपून राहून बाण मारावा कीं नाहीं?
मग रामाने पुन्हा सुग्रीवाला खात्री दिली कीं पुन्हा वालीला आव्हान दे, यावेळी मी नक्की बाण सोडीन. मग हनुमानाने सुग्रीवाच्या गळ्य़ात एक फुललेली वेल हारासारखी खुणेसाठी घातली! सुग्रीवाने पुन्हा धीर धरून वालीला आव्हान दिले. वाली त्याच्या गर्जना ऐकून संतापला व द्वंद्वाला निघाला. पत्नी तारेने त्याला सावध केले कीं हल्लीच तुमच्याकडून मार खाऊन पळालेला सुग्रीव लगेच पुन्हा आव्हान देतो आहे तेव्हां त्याला कोणीतरी जबरदस्त मदतनीस मिळाला असावा तेव्हां एकट्यानेच द्वंद्वाला जाऊं नये. मात्र सल्ला न जुमानतां वाली युद्धाला गेलाच. रामायण म्हणते कीं वालीच्या अंगावर आभूषणे होतीं व गळ्यात सुवर्णमाला होती व सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ होती त्यामुळे यावेळी रामाला ओळख पटण्याला अडचण पडली नाही! नवल वाटते कीं पहिल्या वेळी हीं आभूषणे वालीच्या अंगावर नव्हतीं काय? दुसरी गोष्ट म्हणजे वालीचा पुत्र अंगद चांगला जाणता झालेला होता व सुग्रीवाला अद्याप अपत्य नव्हतें तेव्हां दोघे जुळे तर नव्हतेच पण वयांतही पुष्कळ फरक असावा. (चंद्रकांत व सूर्यकांत हे मराठी सिनेनट खूप सारखे दिसत खरे पण वयाचा फरक लपत नसे.) तेव्हा पहिल्या वेळी रामाला ओळख पटली नाही हे खरे नव्हे! द्विधा मनस्थिति हे कारण! यावेळी अर्थात रामाचा बाण वर्मीं लागून वाली कोसळला.

Monday, November 29, 2010

किष्किंधा कांड भाग ३

वाली व सुग्रीव यांचेमधील कलहाबद्दल रामाला पूर्वीची काहीहि माहिती नव्हती. वानर हा समुदाय पशूंचा खासच नव्हता कारण त्यांचा व मानवांचा खुलासेवार वाद आणि संवाद होऊं शकत होता. मात्र उत्तर भारतातील ज्या मानवसमूहातून राम आला होता त्यांचा व वानरकुळांचा संबंध आलेला नव्हता. उलट रावणाचा व वाली-सुग्रीवांच्या वानरसमाजाचा संबंध व विग्रह होता असे वर्णनावरून स्पष्ट दिसते. या समाजाचे रीतिरिवाज रामाला अपरिचित होते. वाली व सुग्रीवांचा कलह ही रामायणातील वर्णनावरून एक दुर्दैवी घटना होती. वालीचा सुग्रीवावर राग होण्यास त्याच्या दृष्टीने सबळ कारण घडले होते कारण वालीची वाट पहात न बसतां त्याने राज्य स्वीकारले होते. मात्र तरीहि वालीने सुग्रीवाला ठार मारले नव्हते तर राज्याबाहेर घालवले होते. राज्यावर वालीचाच अधिकार होता. सुग्रीवाची पत्नी वालीने बळकावली होती हा त्याच्यावर प्रमुख आरोप होता. मात्र पूर्वी वाली गुहेत अडकला असताना व (लोकाग्रहास्तव) राज्य चालवताना व वालीवधानंतर सर्वाधिकारी झाल्यावर सुग्रीवानेहि वालीची पत्नी तारा हिला (तिच्या इच्छेने कीं इच्छेविरुद्ध?) पत्नीपद दिलेच. अर्थ इतकाच घेतला पाहिजे कीं वानरसमाजात पतिपत्नी नाते काहीसे ढिलेच होते! त्यामुळे वालीचा अपराध वधाची शिक्षा देण्याएवढा घोर नक्कीच म्हणतां येत नाही आणि रामाला वालीला मारण्याचा काही खास नैतिक अधिकार होता असा दावा करता येत नाही. रामाने सुग्रीवाला वचन दिले त्याचे कारण वेगळे शोधले पाहिजे.
रामाला स्पष्ट दिसत होते कीं सीतेच्या शोधासाठी व रावणावर स्वारी करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार होते. ते अयोध्येहून मिळवतां आले असते पण फार वेळ गेला असता. त्यापेक्षा जवळचा मार्ग म्हणजे दक्षिण भारतातील या प्रबळ वानरसमाजाला आपल्याकडे वळवणे. वालीकडेच मदत मागितली असती तर कदाचित त्यानेहि दिली असती. पुढे वालीने मरणापूर्वी तसे रामाला म्हटले देखील. पण ’गरजू’ म्हणून वालीपुढे जाण्यापेक्षा ’उपकारकर्ता’ म्हणून सुग्रीवाचे साहाय्य घेणे जास्त सन्मानाचे! त्यामुळे वाली-सुग्रीवांच्या कलहाची कथा ऐकल्यावर, योग्यायोग्य, नैतिक-अनैतिकतेचा घोळ घालत न बसतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं ’मी तुझ्या वतीने वालीचा वध करीन’ व त्या बदल्यात सुग्रीवाकडून सीतेचा शोध व सुटका यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन मिळवले.

Wednesday, November 24, 2010

किष्किंधाकांड भाग २

राम-लक्ष्मण सुग्रीवाला भेटण्याच्या हेतूने मतंगवनाच्या परिसरात पोचले. ऋष्यमूक पर्वतावर आसरा घेतलेल्या सुग्रीव, हनुमान व इतरांनी त्याना पाहिले व हे कोण असतील हे त्याना कळेना. हे तरुण, सुदृढ व धनुष्यबाण धारण करणारे मानव आपल्याला मारण्यासाठी वालीकडून आले असावे अशी सुग्रीवाला भीती वाटली कारण तो सदैव वालीच्या भीतीने ग्रस्त होता व जीव मुठीत धरून या भागात वावरत होता. त्याने हनुमानाला सांगितले कीं तू नीट शोध घे कीं हे कोण व काय हेतूने येथे आले आहेत. त्याने हनुमानाला मार्मिक सूचना केली कीं त्यांच्याशी बोलताना अशी काळजी घे कीं तुझे मुख माझ्या दिशेला असेल म्हणजे मला लांबूनहि कळेल कीं हे मित्र कीं शत्रु! हनुमान राम-लक्ष्मणांपाशी आला. त्याने आपला व सुग्रीवाचा परिचय करून दिला व तुम्ही कोण अशी विचारणा केली. त्यावर रामाने खुलासा केला कीं आम्ही सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून त्याला भेटण्यास आलो आहोत. मग हनुमानाने सुग्रीवास आश्वासन देऊन राम-सुग्रीव भेट घडवून आणली. परस्परांनी आपली हकीगत व मदतीची अपेक्षा एकमेकांस सांगितली तेव्हां सहजच दिसून आले कीं दोघांनाहि एकमेकांची गरज आहे. सुग्रीव-वाली यांचेमधील कलहाची हकीगत ऐकल्यावर वालीची बाजू ऐकण्याची वाट न पाहतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं मी तुझ्यासाठी वालीला मारीन! सुग्रीवानेहि वचन दिले कीं सीतेच्या शोधामध्ये मी व माझे सर्व अनुचर संपूर्ण सहकार्य़ करूं सीतेने वानरांकडे फेकलेलीं वस्त्रे-आभूषणे समोर ठेवलीं गेलीं व तीं ओळखून रामाने अपार शोक केला. परस्परांनी वारंवार मदतीच्या आणाभाका घेतल्या. हनुमानाने मध्यस्थाचे काम उत्तम पार पाडले व येथून पुढे प्रत्येक प्रसंगात सुग्रीवाचे व रामाचे हित सारख्याच तत्परतेने सांभाळले. रामाने प्रथमच कळलेल्या वाली-सुग्रीव कलहात, न्याय-अन्याय ठरवण्यात वा वालीला भेटण्यात वेळ न घालवता, सरळ एकतर्फी सुग्रीवाची बाजू घेतली, असे कां केले याचा थोडा उहापोह पुढील भागात करूं.

Wednesday, November 3, 2010

किष्किंधा कांड - भाग १

अरण्यकांडावरील लेखन संपून बरेच दिवस झाले काही कारणामुळे पुढील लेखन थांबवले होते. वाचकांपैकी काहीनी उत्सुकता व्यक्त केलेली दिसून आली व तिला प्रतिसाद म्हणून पुढील किष्किंधाकांडाला सुरवात करीत आहें.
या कांडात वर्णिलेल्या कथाभागाचे दोन स्पष्ट भाग जाणवतात. राम-लक्ष्मण व सुग्रीव यांची भेट, मैत्री व परस्परांस मदतीचीं आश्वासने, रामाच्या हस्ते वालीचा मृत्यु, सुग्रीवाने किष्किंधेत व रामाने पर्वतगुहेत पर्जन्यकाळ काढणे व नंतर सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानराना सर्वत्र पाठवणे हा एक भाग आणि इतर दिशाना गेलेल्या वानराना अपयश पण दक्षिण दिशेला गेलेल्या हनुमान अंगदाना समुद्रकिनार्‍यापर्यंत पोचण्यात यश व मग हनुमानाने समुद्रपार होण्यासाठी सज्ज होणे हा दुसरा भाग. पहिला भाग सुस्पष्ट आहे. वालीमृत्यु हा त्यातील प्रमुख प्रसंग आहे. (मी मुद्दामच वालीवध असा शब्दप्रयोग टाळला आहे.) दुसर्‍या भागांतील अनेक स्थलवर्णने काव्यमय असलीं तरी न उलगडणारीं आहेत. मी त्याबद्दल काही लिहिणार नाही. पुढील लेखापासून पहिल्या भागाची सुरवात करणार आहें.

Tuesday, June 22, 2010

अरण्यकांड - भाग १२

रामाचा शोक, संताप व विरहदु:ख यांचे अतिशय सुरस वर्णन रामायणात केले आहे. त्याने लक्ष्मणाला म्हटले कीं ’सीता नाही, आता मी अयोध्येला परत येतच नाहीं तेव्हां तूं परत जा.’ लक्ष्मणाने कशीबशी त्याची समजूत घातली. असे सुचेल त्या दिशेला दोघे भटकत असताना त्यांची अचानक कबंध नावाच्या राक्षसाशी गाठ पडली. हा महाबलवान, पण विकृत शरीराचा होता असे त्याचे वर्णन केलेले आहे. त्याने दोघानाही अचानक पकडले पण प्रसंगावधान राखून दोघांनी तलवारीने त्याचे दोन्ही हात तोडून टाकले. मरण्यापूर्वी त्याने सांगितले कीं रावण लंकेला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत मिळवावी लागेल. त्यासाठी तुम्ही वानरराज सुग्रीवाला भेटा. तोही राज्यभ्रष्ट व पत्नीभ्रष्ट आहे तेव्हां एकमेकांना मदत करा.’ तो पांपासरोवरानजीक मतंगवनापाशी ऋष्यमूक पर्वतावर भेटेल अशी माहितीहि दिली. हा वेळ पर्यंत रामायणात वानर या समाजाचा उल्लेख केलेला नाहीं त्याअर्थी ते दक्षिण भारतातच असावे असें म्हणतां येईल. हा एक शाकाहारी व अन्न गोळा करणारा पण शेती करण्यापर्यंत प्रगति न झालेला, आर्यांपासून वेगळा, पण ’राक्षसां’प्रमाणे नरमांसभक्षक व यज्ञविरोधक नव्हे, असा बराचसा सुधारलेला मानवसमाज दिसून येतो. पुढे महाभारतकाळापर्यंत हा समाज बदलत जाऊन, आर्याच्यांत मिसळून गेलेला असावा त्यामुळे कोणाही वानरराजाचा उल्लेख महाभारतांत अजिबात दिसत नाहीं.
रामलक्ष्मण दक्षिण दिशेला गेले व पुष्कळ प्रवासानंतर मतंगवनापाशी पोंचले. पंपासरोवर, किष्किंधा वगैरे परिसर आज कर्णाटकांत असल्याचे मानले जाते. पंचवटीपासून येथपर्यंतचा प्रवास करण्यास राम-लक्ष्मणांना, दोन-अडीच महिने लागले असे दिसते. प्रवासांतील सर्व निसर्गवर्णनात वसंतऋतूचा उल्लेख जागोजागीं येतो. सीतेचे हरण माघ व. अष्ट्मीला झाले व सुग्रीवाची भेट होऊन पुढे वालीचा वध ग्रीष्मऋतूच्या शेवटी असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे रामसुग्रीव भेट ग्रीष्म अर्धापाउण संपल्यावर झाली असणार हे उघड आहे. तेव्हा फाल्गुन व चैत्र हे दोन महिने तरी नक्कीच प्रवासात गेले असे दिसून येते. कदाचित रावणहि याच सुमारास लंकेला पोंचला असेल!
मतंगवनात मतंग ऋषींच्या वेळेपासून रहाणारी शबरी यावेळी रामाला भेटली. तिने केलेल्या साध्या-सुध्या सत्काराचा रामलक्ष्मणांनी स्वीकार केला व मग ते पंपासरोवराकडे गेले. मतंगऋषींच्या शापामुळे वाली त्याच्या जवळपासहि फिरकत नव्हता म्हणून सुग्रीव व त्याचे सहकारी, हनुमान व इतर, तेथेच आसरा घेऊन रहात होते. त्याना भेटण्याचा रामाचा बेत होता.
येथे अरण्यकांडातील कथाभाग संपला. पुढील किष्किंधाकांडाची सुरवात राम-सुग्रीवांच्या भेटीपासून होते. ती पुढे पाहूं.

Monday, June 14, 2010

अरण्यकांड - भाग ११

विजयादशमीला रावणवध झाला अशी समजूत आहे. उत्तरभारतात विजयादशमीला रामलीला व रावणवधाची दृश्ये दाखवली जातात. पण खुद्द रामायणातील वर्णनांवरून अशा समजुतीला मुळीच आधार दिसत नाही. हनुमान व सीता यांची भेट मार्गशीर्ष शु. नवमीला झाली असा उल्लेख आहे. त्यानंतर वानरसैन्य समुद्र ओलांडून लंकेत पोचले, आणि युद्ध उभे राहिले. प्रमुख युद्धप्रसंगांच्या भाषांतरकारांनी ज्या तिथि दिल्या आहेत त्याप्रमाणे फाल्गुन वद्य ३० पर्यंत कुंभकर्ण, इंद्रजित वगैरे सर्व प्रमुख वीरांचा वध होऊन रावण स्वत: युद्धाला आला असे म्हटले आहे. तेथून पुढे रावणवधापर्यंत आश्विन शु. दशमी म्हणजे विजयादशमी खासच उजाडली नव्हती. रावणवध विजयादशमीला नव्हे तर चैत्राच्या पहिल्या १०-१२ दिवसांतच झाला असला पाहिजे. रावणवधानंतर राम लगेच अयोध्येला परत गेला. रामाचा वनवास चैत्रांत सुरू झाला होता तेव्हां तो चैत्रांत संपला हे सयुक्तिकच आहे. रावणवध व विजयादशमी यांची सांगड कां घातली जाते याचा मात्र उलगडा होत नाहीं.
(विजयादशमीला अर्जुनाने शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून कौरवांशी सामना केला अशीहि एक समजूत आहे, तीहि सपशेल चुकीची आहे कारण कौरवांचा विराटावरील हल्ला झाला व अर्जुनाने त्यांचा सामना केला तेव्हां ’हा ग्रीष्म चालू आहे’ असा स्पष्ट उल्लेख भीष्माचे तोंडी आहे!)
राम मारीचाला मारून घाईघाईने कुटीकडे परत येत असताना वाटेतच लक्ष्मण भेटला. सीतेला एकटी सोडून आपल्या मदतीला आल्याबद्दल रामाने लक्ष्मणालाच दोष दिला. दोघे कुटीकडे परत आले तर सीता दिसेना. दोघे भयभीत झाले. रामतर वेडापिसाच झाला. त्याच्या शोकाचे व संतापाचे सुंदर वर्णन रामायणात आहे. लक्ष्मणाने त्याला कसेबसे समजावले व दोघांनी सीतेचा शोध सुरू केला. काही वेळाने रावण-जटायु संग्रामस्थळापाशी आले. तेथील रक्तपात पाहून रामाने समजूत करून घेतली कीं सीतेला बहुधा राक्षसांनी खाल्ले. लक्ष्मणाने पुन्हा समजावले कीं येथे दिसणार्‍या खुणांवरून येथे एका वीराचे व एका रथीचे युद्ध झाले आहे. रथ मोडून पडला आहे, गाढवे मरून पडलीं आहेत सारथी मेला आहे व छत्र मोडले आहे. जवळपास शोधल्यावर आसन्नमरण जटायु दिसला. त्याने खेद व्यक्त केला कीं मी रावणाला थोपवूं शकलों नाहीं, तो सीतेला घेऊन गेला. दु:ख बाजूला ठेवून राम-लक्ष्मणांनी जटायूचे दहन केले. रावण सीतेला घेऊन लंकेला गेला एवढे कळले पण लंका कोठे आहे हे रामाला माहीत नव्हते. काय करावे सुचेना.

Monday, June 7, 2010

अरण्यकांड भाग १०

सीतेची व्यवस्था लावून रावण लगेच आपल्या सहाय्यकांना भेटला व खराच्या सैन्याचा नाश झाल्याचे सांगून त्यांना म्हणाला कीं तुम्ही जनस्थानाला जा. रामाने खराला मारल्यामुळे मला फार राग आला आहे व रामाला मारूनच तो शांत होईल. जनस्थानात राहून रामाची खबर तुम्ही मला कळवा. सीतेला पळवून आणल्याचे मात्र त्याना सांगितले नाही. रामाशी युद्ध आता अटळ आहे हे रावणाने जाणले होते व तो तयारीला लागला होता.
रावणाने लंकेचे वैभव सीतेला अनेक प्रकारे ऐकवले व राम लंकेला येऊच शकणार नाही तेव्हां तूं आतां मला वश हो असे विनवले. सीतेने त्याला साफ झिडकारले. रावणाने अखेर तिला अशोकवनात ’राक्षसिणींच्या’ पहार्‍यात ठेवले. त्याना आज्ञा दिली कीं तिला भीति घाला, मग गोड बोला, काही करून तिचा अहंकार दूर करा व तिला वश करा. कोणत्याही मार्गाने सीता वश होत नाही हे दिसून आल्यावर त्याने अखेर सीतेला एक वर्षाची मुदत दिली व त्यानंतरहि ऐकले नाहीस तर खाऊन टाकीन असा धाक घातला.
रावणाने सीतेला एक वर्षाची दीर्घ मुदत दिली होती हा एक महत्वाचा उल्लेख आहे. त्यावरून रावणाचा खरा हेतु स्पष्ट होतो. राम सीतेला सोडवण्याचा निकराचा प्रयत्न करील हे उघड होते, मात्र तो अयोध्येच्या वा इतर कोणाच्याही मदतीने लंकेवर चाल करूं शकला तर होणारे युद्ध लंकेत, म्हणजे रावणाला अनुकूल अशा भूमीवर झाले असते. त्याला सीता हवी होती असे मला मुळीच वाटत नाही. तसे असते तर एक वर्ष थांबण्याची गरज नव्हती, ती हातांत आलीच होती! त्याचे ’कपटी, कामी, लंपट, राक्षस’ हे वर्णन निव्वळ तो रामाचा शत्रु म्हणून केलेले आहे. जनस्थानाऐवजी रामाबरोबरचे निर्णायक युद्ध त्याला लंकेत हवे होते हा त्याचा सीतेला पळवून आणण्यामागील खरा हेतु होता असे माझे मत आहे. प्रत्यक्षात राम लकेत पोचून युद्ध होईपर्यंत एक वर्षाहूनहि जास्त काळ गेला. सीताहरण माघ व. अष्टमीस झाले, हनुमान पुढील वर्षाच्या मार्गशीर्षात लंकेस पोचला व त्यानंतर राम ससैन्य लंकेस पोचून युद्ध होऊन फाल्गुन-अखेर / चैत्राच्या सुरवातीला रावणवध झाला (विजयादशमीला मुळीच नाहीं!). मात्र वर्ष संपले तरी रावणाने सीतेवर अत्याचार केला नाही यावरून त्याचा हेतु राजकीय व युद्धाच्या डावपेचांचा भाग होता हे उघड आहे.

Thursday, June 3, 2010

अरण्यकांड - भाग ९

सीतेच्या मागणीवरून राम हरणाच्या मागे गेला तेव्हां सीतेच्या रक्षणाचे काम त्याने लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोंपवले होते. पण जटायु जवळपास नव्हताच. लक्ष्मणानेहि रामाच्या मदतीला जाण्याआधी ’आपण त्यासाठी जटायुला पाठवूं’ असें सीतेला सुचवले नाहीं. सीतेने तें मानले नसतेच हे वेगळे. लक्ष्मणाने जाताना जटायूला ’तूं सावध रहा’ असेहि सुचवले नाहीं. कारण तो जवळ नव्हताच. रावणाने सीतेला उचलल्यावर तिचा विलाप झाडावर झोपलेल्या वृद्ध जटायूच्या कानीं पडला व तो खडबडून जागा झाला असें रामायण म्हणते. जटायूने स्वत:च ’मी तुमच्या आश्रयाने राहीन व सीतेच्या रक्षणात मदत करीन’ असे रामाला म्हटले होते. तेव्हां तो जवळपास पण स्वतंत्रच राहत असणार. सीतेने विलाप करतानाहि त्याला हाका मारल्या नव्हत्या. तो सरसावून आल्यावरहि ’तुला रावणाशी लढणे जमणार नाही, तूं फक्त घडालेली हकीगत रामाला सांग’ असे सीता त्याला म्हणाली. कारण तो वृद्ध होता. मात्र त्याने रावणाबरोबर निकराची झुंज दिली तीहि इतकी प्रखर कीं त्याने रावणाचा सारथी मारला, रथाला जोडलेलीं गाढवें मारलीं व रथाचाहि पूर्ण विध्वंस केला. रावणालाहि फार जखमी केले. मात्र त्याचे बळ अखेर कमी पडून प्राणांतिक जखमा होऊन तो पडला. सीतेने पुन्हा जोराने विलाप केला, हेतु हा कीं जवळपास कोणी असेल तर त्याला ऐकूं जावें. रावणाचा रथ वा विमान पूर्ण नष्ट झाले होते. मात्र तरीहि रावण सीतेला घेऊन आकाशमार्गाने लंकेला गेला असें रामायण म्हणते, हे आकाशमार्गाने जाणे म्हणजे काय याचा कांही उलगडा मला सुचलेला नाहीं. वाटेतील एका पर्वतावर काही वानर बसलेले (हनुमान, सुग्रीव वगैरे) सीतेला दिसले. त्यानाहि रावण सीतेला घेऊन चाललेला दिसला पण त्यांची रावणाशीं गाठ पडली नाहीं तेव्हां ते बसलेल्या शिखरापेक्षां उंचावरून जाणार्‍या वाटेने रावण गेला असे म्हणावे लागते. रावण घेऊन जात असताना सीतेने त्याची परोपरीने निर्भर्त्सना केली व ’तुझा मृत्यु अटळ आहे’ असें बजावले. सीतेने वस्त्रांत गुंडाललेले काही दागिने वानरांकडे टाकले हें रावणाच्या लक्षात आले नाही कारण त्याने ते थांबवले नाहीं. अखेर रावण सीतेला घेऊन लंकेला पोचला व सरळ अंत:पुरांत जाऊन सीतेला तेथे ठेवून पहारेकरणींना ताकीद दिली कीं ’तिला पाहिजे असेल तें द्या आणि त्रास देऊं नका. वैदेहीला अप्रिय लागेल असें बोलणार्‍या व्यक्तीला आपला जीव प्यारा नाही असे मी समजेन’ रावणाबद्दल आपल्या कल्पनांशी हें सुसंगत नाहीं पण रामायणच हे म्हणते! सीताहरण माघ व. अष्टमीला झाले असे पद्मपुराणात म्हटले आहे. मात्र रावण कोणत्या तिथीला लंकेला पोंचला ते सांगितलेले नाही त्यामुळे प्रवासात किती काल गेला ते कळत नाहीं.

Wednesday, May 26, 2010

अरण्यकांड - भाग ८

मारीचाने मरताना मारलेल्या आर्त हाका लक्ष्मण व सीता यांना ऐकूं आल्या त्याअर्थी मारीच व राम फार दूर गेलेले नव्हते. मारीच मेल्यावर रामाला शंका आली व म्हणून तो घाईघाईने परत फिरला. हाका ऐकू आल्यावर लक्ष्मण व सीता यांच्यात बराच वादविवाद झाला व अखेर नाइलाजाने लक्ष्मण निघाला यांत काही काळ गेलाच. लक्ष्मणाला राम वाटेतच भेटला व दोघे घाईने परतले. लक्ष्मण निघून परत येईपर्यंत थोडाच वेळ गेला असणार. परत येतात तोंवर रावणाने सीतेला नेलीच होती.
लक्ष्मण कुटी सोडून गेलेला पाहिल्यावर रावण कुटीपाशी आला. सीतेने त्याचे स्वागत केले. रामायण म्हणते दोघांमध्ये लांबलचक संभाषण झाले. रावणाने प्रथम ब्राह्मणवेषाला साजेसे वेदमंत्र म्हतले. मग तिच्या सौंदर्याचे वर्णन करून तूं कोण व या धोकादायक वनात काय करीत अहेस असे विचारले. सीतेने आपला इतिहास विस्ताराने सांगितला. मग रावणाने स्वत:ची ओळख विस्ताराने सांगून तिला वश होण्यास विनविले. सीतेने त्याला झिडकारल्यावर अखेर त्याने तिला पकडले व उचलून घेऊन तो निघाला. हे सर्व होईपर्यंत राम-लक्ष्मण परत कसे आले नाहीत? याचा अर्थ असा घ्यावा लागतो कीं लक्ष्मण बाहेर पडलेला दिसल्याबरोबर अजिबात वेळ फुकट न घालवतां रावणाने सरळ सीतेला उचलले! संभाषणात वेळ घालवला नाही. सीता वश होईल अशी भाबडी कल्पना तो कशाला बाळगील?
रामायण म्हणते , सीतेने या प्रसंगी रावणाला आपली माहिती विस्ताराने सांगितली. तिने म्हटले, ’आमचा विवाह झाल्यावर आम्ही बारा वर्षे अयोध्येत सुखात राहिलो. मग कैकेयीच्या मागणीमुळे आम्हाला वनात यावे लागले, यावेळी रामाचे वय २५ व माझे १८ होते.’ तर मग म्हणावे लागते विवाहाचे वेळी राम १३ वर्षांचा व सीता ६ वर्षांची होती. हे अतिशयोक्त वाटते. रामाची मागणी विश्वामित्राने केली तेव्हां ’राम फक्त सोळा वर्षांचा आहे’ असे दशरथ म्हणाला होता. दुसरें म्हणजे विवाहानंतर बारा वर्षे अयोध्येत गेलीं तर एवढा दीर्घ काळ भरत-शत्रुघ्न कैकय देशालाच होते काय़? ते परत आल्याचा मुळीच उल्लेख नाही! यांत थोडीफार विसंगति आहे. रामायण एकहातीं वाल्मिकीचे मग त्याने अशी विसंगति कां येऊं दिली असेल? मारीच रावणाला म्हणाला होता कीं ताटकावधाचे वेळीं राम फक्त बारा वर्षांचा होता तरी त्यावे बाण मला सोसवले नाहींत. रामाला अवतारस्वरूप मिळाल्यावर त्याचे माहात्म्य वाढवण्याचा हा प्रकार वाटतो.

Friday, May 21, 2010

अरण्यकांड - भाग ७

रावणाने मारीचाला म्हटले ’मी तुझा सल्ला फक्त माझ्या बेतात काय कमीजास्त करावे एवढ्यापुरताच विचारला व मदत मागितली, तुझी परवानगी मागितली नाही. बुद्धिमान मंत्री राजाने विचारल्यावरच आपला विचार नम्रपणे, हात जोडून सांगतो! तूं मृगरूपाने राम-लक्ष्मणाना दूर ने, मग मी सीतेला पळवून नेईन. मग तूं कुठेही जाऊं शकतोस. तुला अर्धे राज्य देईन पण तू विरोध केलास तर जबरदस्तीने तुझ्याकडून हे करून घेईनच नाहीतर तुला मारून टाकीन.’ मारीचाने प्रतिकूल विचार पुन्हापुन्हा ऐकवले पण रावण मानेचना तेव्हां नाइलाजाने ’तुझ्या हातून मरण्यापेक्षां रामाचे हातून मरण आलेले बरे’ असे म्हणून कबुली दिली. मारीचाबद्दलच्या आपल्या पूर्वकल्पनांपेक्षां त्याचे वर्तन वेगळे वर्णिले आहे.
बेत ठरल्यावर दोघेहि लगेच आकाशमार्गाने जाणार्‍या रथाने निघाले. त्यालाच पुढे ’विमानाकार रथ’ असेहि म्हटले आहे. त्यामुळे खूप वेगाने प्रवास करूं शकणारा रथ एवढाच ’विमाना’चा अर्थ अभिप्रेत असावा असे वाटते. हे विमान सीताहरणाच्या वेळी जटायुकडून नष्ट झाले असे पुढे वर्णन आहे. त्या अर्थी हे ’पुष्पक’ विमान नव्हे. तें लंकेत सुखरूप होते. पंचवटीला पोंचल्यावर मारीचाने लगेच मृगरूप धारण केले. पुढचा कथाभाग आपणास परिचित आहे तसाच जवळपास रामायणात आहे. लक्ष्मणाने ’हा मृग म्हणजे मारीच असावा’ असा संशय व्यक्त केला तेव्हां रामाने म्हटले, ’हा मृग असेल तर सीतेला हवे असलेले सोन्याचे कातडे मिळेल आणि हा मारीच असेल तर याला मारलेच पाहिजे कारण याने असेच फसवून इतर शिकार करण्यासाठी रानात आलेल्या राजांना मारले आहे.’ तेव्हां एकटी सीताच फसली होती, रामलक्ष्मणांना सोन्याच्या कातड्याचा लोभ पडला नव्हता! सीतेच्या रक्षणाचे काम लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोपवून राम मारीचाच्या पाठीवर गेला. खूप दूर गेल्यावर रामाचा बाण लागून मरताना मारीचाने रामाच्या आवाजात ’हा सीते, हा लक्ष्मण’ अशा आर्त हाका मारल्या. सीतेने निष्कारण संशय व्यक्त केला म्हणून नाइलाजाने लक्ष्मण रामाच्या मदतीला गेला. त्याने सीतेला सावध रहाण्यास सांगितले मात्र ’लक्ष्मणरेषा’ असा काहीहि प्रकार रामायणात मुळीच नाही. ती निव्वळ हरदासी कथाच! लक्ष्मणावर नाहक संशय घेताना सीतेने विवेकाची लक्ष्मणरेषा आधीच ओलांडली होती.

Sunday, May 16, 2010

अरण्यकांड - भाग ६

यानंतर खराचा ससैन्य नाश झाल्यामुळे फार उद्विग्न झालेली शूर्पणखा स्वत:च रावणाकडे गेली. स्वत:चा झालेला अपमान तिने रावणाला सांगितला व त्याला फटकारले कीं ’जनस्थानातील तुझी सत्ता रामाने उखडून टाकली याचा तुला पत्ता नाही काय?’ तिच्याकडून सर्व हकीगत ऐकून रावण चिंतातुर झाला. शूर्पणखेने राम-लक्ष्मण-सीता यांचे बळ व सौंदर्य याचे वर्णन रावणाला ऐकवले. मी सीतेला तुझ्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मला लक्ष्मणाने विरूप केले असे खोटेच सांगितले. ’सीतेला तूं पळवून आण’ असे तिने सुचवले नाही. रावणाने स्वत:च मंत्रिगणांशी बोलणे करून सीतेचे हरण करण्याचा बेत नक्की केला.
रावण रथातून समुद्रकिनार्‍यापर्यंत आला व मग विमानाने भारतात येऊन पुन्हा मारीचाला भेटला. विमानाचा उल्लेख आहे पण वर्णन नाही. विमान म्हणजे काय हे गूढच आहे. रावणाने पुन्हा मारीचाला खर-दूषणांचा ससैन्य नाश झाल्याचे सांगून रामाने दंडकारण्याचे अभयारण्य केले आहे असे म्हटले. रामाला त्याच्या पित्याने क्रोधाने पत्नीसह घराबाहेर काढले आहे असेहि म्हटले व सीतेला पळवून आणण्याचा बेत सांगून मारीचाचे सहाय्य मागितले. ते ऐकून मारीचाचा भयाने थरकाप झाला. त्याला रामाच्या पराक्रमाचे दर्शन घडलेले होते. त्याने रावणाला पुन्हापुन्हा विनवले कीं ’तूं हा बेत मनात आणू नको, रामाने पितृवचनाचा मान राखण्यासाठी वनवास पत्करला आहे. त्याच्याशी वैर धरू नको. तुला ते झेपणार नाही. तूं बिभीषणाचा सल्ला घे. विश्वामित्राच्या सांगण्यावरून राम बालवयातच आमच्या पारिपत्यासाठी आला तेव्हा आमचा सर्वनाश झाला. माझा जीव कसाबसा वांचला. हल्लीच पुन्हा मृगरूपाने दोन मित्रांबरोबर दंडकारण्यात गेलो असतां रामाच्या बाणाने मरतांमरतां वांचलों, माझे मित्र मेले. त्यामुळे मला रामाची फार भीति वाटते. एकतर तूं सरळ रामाशीं युद्ध कर किंवा सर्व विसरून लंकेत सुखाने रहा. खराने रामावर आक्रमण केले व रामाने त्याला युद्धात मारले यांत त्याचा काय दोष? त्याच्याशी वैर धरू नको’. मारीचाने पुन्हापुन्हा हिताचा सल्ला दिला पण रावणाने तो मानला नाही.

Thursday, May 13, 2010

अरण्यकांड - भाग ५

शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी खर, दूषण, त्रिशिरा हे तीन वीर व जनस्थानातील त्यांची मोठी सेना चालून आली. त्या सैन्यात हे तीन वीरच धनुष्य-बाणाने लढणारे होते, इतर सर्व हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्राने लढणारे होते. हे जनस्थान पंचवटीच्या जवळपासच होते व स्थानिक नरभक्षक लोकांच्या सहायाने येथे रावणाने आपले ठाणे वसवले होते असे म्हणावे लागते. अद्याप त्यांचा आर्यावर्तातील कोणा राजाशी संघर्ष झालेला वर्णिलेला नाही. पण संभाव्य संघर्षाची ही रावणाची पूर्वतयारी दिसते.
लक्ष्मणाला सीतेच्या संरक्षणासाठी ठेवून रामाने एकट्यानेच त्याना तोंड दिले. युद्धाचे खुलासेवार वर्णन वाचावयास मिळते. सर्व सैन्य मारले जाऊन एकटा खर उरला व तोही अखेर मारला गेला. रामाने एकहि ’अस्त्र’ वापरल्याचा उल्लेख नाही. फक्त धनुष्यबाण वापरून कितीहि पराक्रमी धनुर्धर असला तरी किती सैन्य मारू शकेल? महाभारतात सर्व धनुर्धर मोठ्या सैन्याविरुद्ध अस्त्रांचा सर्रास वापर करतात. तेव्हा खराचे सैन्य १४,००० होते ही अतिशयोक्ति म्हटली पाहिजे. युद्ध संपल्यावर लक्ष्मण व सीता गुहेतून बाहेर आलीं व रामाला फारशा जखमा झालेल्या नाहीत असे पाहून आनंदित झालीं.
खराचा ससैन्य नाश झाल्याचे वृत्त अकंपन नावाच्या वांचलेल्या सैनिकाने रावणाला सांगितले. रामाच्या बळाचे व युद्धकौशल्याचे त्याने वर्णन केले. ’रामाला युद्धात हरवणे सोपे नाही तेव्हा सीतेला पळवून आणलीस तर राम विरहानेच मरेल’ असे त्याने रावणाला सुचवले. हा सीताहरणाबाबत पहिला उल्लेख आहे. हा रावणाचा स्वत:चा मूळ बेत नाही. मात्र रावणाला हा सल्ला पटला व तो एकटाच निघाला व मारीचाच्या आश्रमात जाऊन त्याला भेटला. जनस्थानातून रावणाचे ठाणे उठल्यामुळे काहीतरी केले पाहिजे असे त्याला जाणवले. ही रावण-मारीच यांची पहिली भेट. तिच्याबद्दल आपण वाचलेले नसते! मारीच हा ताटकेचा पुत्र असल्यामुळे मदत करील अशी रावणाची साहजिकच अपेक्षा होती. हा मारीचाचा आश्रम कोठे होता याचा काही खुलासा नाही.
मात्र यावेळी मारीचाने रावणाला म्हटले, ’सीतेच्या हरणाचा सल्ला तुला देणारा तुझा शत्रूच म्हटला पाहिजे. रामाच्या तूं वाटेस जाऊं नको ते तुला झेपणार नाहीं. तूं लंकेत सुखाने राज्य कर व रामाला पंचवटीत सुखाने राहूंदे!’ नवल म्हणजे रावणाने हा सल्ला मानला व तो लंकेला परत गेला!

Saturday, May 8, 2010

अरण्यकांड - भाग ४

राम-लक्ष्मण-सीता पंचवटीत राहू लागल्यावर घडलेला महत्वाचा प्रसंग म्हणजे शूर्पणखेच्या भेटीचा. हा वेळपर्यंत विराध सोडून इतर कोणाही नरभक्षक राक्षसाशी वा रावणाच्या अनुयायाशी रामाची भेट वा झगडा झालेला नव्हता. रावणपक्षाचा एक खर नावाचा प्रमुख वीर, शूर्पणखेचा भाऊ व रावणाचाहि भाउबंद, मोठ्या सैन्यबळासह पंचवटीजवळच जनस्थानात राहत होता. त्याला राम-लक्ष्मण पंचवटीत आल्याचे माहीत नव्हते, पण सान्निध्यामुळे संघर्ष केव्हातरी अटळ होता. खराच्या सैन्यात धनुष्यबाणाने लढणारे वीर थोडेसेच होते. इतर सर्व सैन्य हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्रांनी लढणारे होते असे पुढील समरप्रसंगाच्या वर्णनावरून दिसते. हे सर्व स्थायिक नरभक्षक जमातींची असावे.
राम दिसल्यावर शूर्पणखेने त्याची अभिलाषा व्यक्त केली. राम-लक्ष्मणांनी तिची टवाळी केली. तिला राक्षसी म्हटले आहे व विद्रूप असे वर्णन केले आहे तसेच ’सुंदर’ असेहि म्हटले आहे. ती रावणाची बहीण, म्हणजे नरभक्षक जमातीची खासच नव्हती. त्यामुळे तिचे विद्रूप असे वर्णन तिला राक्षसी म्हणण्याशी निगडित आहे. रावण व त्याचे कुटुंब व प्रमुख मंत्री, हे यज्ञसंस्कृति मानणारे होते. यज्ञांचा विध्वंस करणार्‍यांपैकी नव्हते. त्यांचा राम प्रतिनिधित्व करणार्‍या आर्यकुळांशी दीर्घकाळाचा वैरभाव कां होता? सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय? आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय? हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते! जणू राम-लक्ष्मणाना आता, रावणाबरोबर अद्याप न घडलेला, संघर्ष हवाच होता.

Tuesday, May 4, 2010

अरण्यकांड - भाग ३

पंचवटीत रामाचे वास्तव्य फारसे झाले नाही. पंचवटीत रहावयास आले तेव्हां शरद ऋतु चालू होता असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर हेमंत व शिशिर हे दोनच ऋतु राम-लक्ष्मण-सीता यांचे पंचवटीत वास्तव्य झाले. रावणाने सीतेचे हरण केले तेव्हां शिशिर संपत आला होता कारण नंतर राम-लक्ष्मण वनात भटकत असताना हा वसंत ऋतु चालू आहे असे राम वारंवार म्हणतो व वसंताच्या शोभेचे वर्णन करतो. पद्मपुराणात सीताहरणाची तिथि माघ व. अष्टमी अशी दिली आहे. हा उल्लेख रामायणाच्या भाषांतरातहि आहे. तेव्हा शिशिर अर्धा संपला होता याला दुजोरा मिळतो.
चित्रकूट व पंचवटी दोन्ही ठिकाणी रामाचे वास्तव्य अल्पकाळच झाले हे स्वच्छ असूनहि चित्रकूटात समजूत आहे कीं रामाचे चित्रकूटात दीर्घकाळ वास्तव्य झाले व महाराष्ट्रात समजूत आहे की पंचवटी हे रामाचे वनवासातील प्रमुख वास्तव्यस्थळ! चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत रामाचा प्रवास दीर्घकाळ व अज्ञात मार्गाने झाला. अनेक नद्या, विंध्य व सातपुडा ओलांडावे लागले असणार. अजूनहि हा भाग दुर्गम आहे व आदिवासी वसतीचा आहे. या आदिवासी समाजांमध्ये रामाच्या प्रवासमार्ग व वास्तव्याबाबत असलेल्या समजुतींचे संकलन व अभ्यास केला तर कदाचित रामाच्या प्रवासमार्गावर काही प्रकाश पडेल. असा कांही अभ्यास वा संशोधन झाले असल्यास माहीत नाही. या संदर्भात, डॉ. सांकलिया नावाच्या पुरातत्त्ववेत्याच्या मते राम विंध्य ओलांडून दक्षिणेत आलाच नाही व रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच असे वाचलेले स्मरते. याला मुख्य आधार म्हणजे, सालवृक्ष दक्षिण भारतात तुंगभद्रा परिसरात, जेथे किष्किंधा होती असे वर्णनावरून दिसते, तेथे आढळत नाहीत, याउलट, मध्यभारतात, सातपुड्याच्या उत्तरेला मुबलक होते. नेपानगरची न्यूजप्रिंट फॅक्टरी सालाइ झाडांपासून कागद बनवण्यासाठी बांधली गेली. (गेल्या काही वर्षात मात्र या सलाई वृक्षांची वारेमाप तोड झाली आहे.) डॉ. सांकलियांपाशी इतरहि अनेक आधार असतीलच. त्यांचे मत खरे असेल तर मग पंचवटी (गोदावरी तीरी म्हटलेली)व जनस्थान महाराष्ट्रात नव्हे तर कोठे होतीं? खरे खोटे ’राम जाणे!’

Monday, April 26, 2010

अरण्यकांड - भाग २

रामाने मुनींना राक्षसांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले होते,पण सीतेने नवव्या सर्गात असे म्हटले कीं ’आपण वनात असताना मुनिवृत्तीने रहावे, क्षात्रधर्माने वागूं नये, प्राण्यांची हिंसा करू नये व राक्षसांशीहि अकारण वैर धरूं नये. अयोध्येस परत गेल्यावर मग क्षात्रधर्माचे पालन करावे!’ मात्र रामाने हा सल्ला मानला नाही व राक्षसांचे पारिपत्य करणे हे माझे काम आहे असे बजावले. प्रत्यक्षात मात्र विराध सोडून इतर कोणाही राक्षसाशी रामाचे युद्ध झालेले नाही! विराधाने स्वत:च राम-लक्ष्मणांवर हल्ला केला होता, मुनीना त्रास दिला म्हणून त्याचे पारिपत्य केले नव्हतेच.
रामाचा प्रवास चालूच होता. वाटेत लागलेल्या पंचाप्सर नावाच्या सरोवराचे वर्णन सर्ग ११ मध्ये येते पण स्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत त्यामुळे राम कोठवर पोचला होता याचा उलगडा होत नाही. यानंतर रामाने निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत निवास करीत दहा वर्षे काढली असा स्पष्ट उल्लेख आहे. चित्रकूट सोडल्यापासून आतापर्यंत रामाने कुटी बांधून कोठेहि वास्तव्य केलेलेच नाही! चौदा वर्षांपैकी ३-४ महिने चित्रकूटावर राहून त्यानंतर दीर्घकाळ प्रवासात व निरनिराळ्या मुनींच्या आश्रमांत व्यतीत झाला. विराध सोडून एकाही राक्षसाशी युद्ध झाले नाही. निव्वळ रामाच्या वावरामुळे राक्षसांचा उपद्रव शमला होता असे म्हणावे लागते. या दीर्घ प्रवासानंतर राम पुन्हा सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला व त्यांचा सुतीक्ष्णाने सन्मान केला.
मग रामाला अगस्त्य ऋषींना भटण्याची इच्छा झाली व सुतीक्ष्णानेहि दुजोरा देऊन जवळच चार योजनांवरील अगस्त्याच्या आश्रमाचा रस्ता सांगितला. वाटेतील अगस्त्याच्या भावालाहि भेट देऊन राम अगस्त्य मुनीना भेटला. अगस्त्यांनी रामाला अनेक आयुधे दिलीं. रामाने अगस्त्यांना विचारले कीं मी कोठे कुटी बांधावी? अगस्त्यांच्या आश्रमस्थळाचे भौगोलिक संदर्भ नाहीत पण त्याने रामाला सुचवले कीं दोन योजनांवरील पंचवटी हे स्थळ तुमच्या निवासासाठी योग्य. येथे मात्र ’गोदावरीतीराजवळील’ असा स्पष्ट भौगोलिक संदर्भ प्रथमच मिळतो. सध्याच्या पंचवटीचे गोदासान्निध्य पाहतां तीच रामायणातील पंचवटी मानतां येते. चित्रकूट ते पंचवटी एवढे दीर्घ अंतर रामाने ११-१२ वर्षे प्रवासात काटले असे दिसते मात्र प्रवास मार्ग कळत नाही. पुढे इतिहासकाळात उत्तरेकडून दक्षिणेत येण्याचा मार्ग बर्‍हाणपुरावरून खानदेशातून (मोगलकाळी) वा राजस्थान, सौराष्ट्र गुजरात असा असे. राम मध्य्भारतातून विंध्य-सातपुडा ओलांडून आला असावा.
पंचवटीच्या वाटेवर जटायु भेटला, मनुष्यवाणीने बोलला व मीहि तुमच्या आश्रयाने राहीन असे म्हणाला. तेव्हा ही एक आर्य़ांशी मैत्रीने वागणारी मानवांचीच जमात म्हटली पाहिजे.
पंचवटीवर लक्ष्मणाने कुटी बांधली. चित्रकूटावरहि त्यानेच बांधली होती. सेतू बांधायला राम इंजिनिअर होता का असा प्रश्न हल्ली केला गेला. कुटी बांधणारा लक्ष्मण बहुधा इंजिनिअर असावा ! पंचवटीवरहि रामाचे वास्तव्य ३-४ महिनेच झाले. कसे ते पुढच्या भागात पाहूं.

Saturday, April 24, 2010

अरण्यकांड - भाग १

अत्रिऋषींच्या भेटीपाशी अयोघ्याकांड संपले होते. अरण्यकांडामध्ये रामाचा तेथून पुढला वनातील प्रवास वर्णिला असून सीताहरणापर्यंत त्याचा विस्तार आहे. अत्रिऋषींच्या भेटीनंतर राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात गेले. राक्षसांचा उपद्रव असलेल्या प्रदेशात ते बराच काळ फिरत राहिले असे म्हटले आहे. अनेक मुनींना भेटले सर्वांनी राक्षसांच्या उपद्रवाबद्दल तक्रारी करून तूं आमचे रक्षण कर असे म्हटले. रामाने ते मान्य केले. हे मुनीना सतावणारे, नरभक्षक, यज्ञाचा विध्वंस करणारे (मानव)समाज म्हणजे राक्षस ही एक वेगळीच जमात म्हटली पाहिजे. रावणालाहि राक्षस म्हटले आहे पण रावण स्वत: सुसंस्कृत, यज्ञप्रेमी व विद्वान, त्याचे अनेक मंत्री व प्रजाजनहि यज्ञ करणारे असे पुढे वर्णन केले आहे त्यांचे या जमातीशी काही नाते मानता येणार नाही. मात्र ही नरभक्षक जमात रावणाच्या अंकित होती असे दिसते व त्यांची लंकेतहि वसती असावी कारण रावणाच्या सैन्यात त्यांचा समावेश होता.
रामाची गाठ विराध नावाच्या राक्षसाशी पडली. कोणत्याही शस्त्राने न मरण्याचा वर त्याला ब्रह्मदेवाने दिला होता! तो रामाशी बोलला! कोणत्या भाषेत ते सांगितलेले नाही. आपल्या वराची माहिती त्यानेच रामाला दिली. महत्प्रयासाने राम-लक्ष्मणांनी त्याला मारले, कसे तर, एक मोठा खड्डा करून, अर्धमेला झाल्यावर त्याला गाडून टाकले. अनपेक्षित अडचणीवर युक्तीने मात केली. नरभक्षक राक्षस व राम यांचा प्रत्यक्ष संग्राम मात्र, दुसरा एकहि, पंचवटीला जाईपर्यंत वर्णिलेला नाही. विराधवधानंतर राम शरभंग मुनीच्या आश्रमास गेला. त्यानंतर पुन्हा अनेक मुनींनी राक्षसांपासून रक्षण करण्याची विनंति केली व रामाने ती मान्य केली. मुनीनी केलेल्या राक्षसांच्या अत्याचारांच्या वर्णनात तुंगभद्रा नदी व जवळचे पंपासरोवर, तसेच मंदाकिनी नदी व चित्रकूट या दोन्हीचा उल्लेख आहे. म्हणजे हा सर्वच मुलूख राक्षसांच्या उपद्रवाने ग्रस्त होता. राम मुनीना म्हणाला कीं राक्षसांच्या शासनासाठीच पित्याच्या आज्ञेने मी वनात आलो आहे. मात्र दशरथाने रामाला असा काही आदेश दिलेला नव्हता!
यानंतर हे मुनिगण व राम-लक्ष्मण सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमाला ’दुथडी वाहणार्‍या नद्या’ पार करून गेले. कोणत्या नद्या हे सांगितलेले नसल्याने सुतीक्ष्णाचा हा आश्रम कोठे होता व राम चित्रकूटापासून किती दूर वा किती दक्षिणेला आला होता हे कळत नाही. ’माझ्या निवासासाठी मी कोठे कुटी बांधावी’ असे रामाने सुतीक्ष्णाला विचारले. चित्रकूट सोडल्यापासून हा वेळपर्यंत रामाने कोठेच कुटी बांधलेली नव्हती. सुतीक्ष्णाने म्हटले कीं हा माझा आश्रमच तुमच्या निवासाला योग्य आहे. पण रामाने ते मानले नाही. एक रात्रच मुक्काम करून राम निघाला तेव्हा सुतीक्ष्णाने म्हटले कीं दंडकारण्यातील मुनींचे आश्रम पहात फिरा व नंतर पुन्हा येथे या.

Thursday, April 22, 2010

पुन्हा सुरवात

मित्रहो,
गेले दहा महिने अमेरिकेत वास्तव्य असल्यामुळे या ब्लॉगवरचे लेखन थांबले होते. आता भारतात परत आलो आहे व पुन्हा अरण्यकांडापासून नवीन लेखन सुरू करणार आहे. माझ्या पूर्वीच्या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळत होता. नवीन लेखनालाहि तो मिळत राहील अशी आशा आहे. लेखनाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच राहील. धन्यवाद.
प्र. के. फडणीस
Locations of visitors to this page