Monday, November 29, 2010

किष्किंधा कांड भाग ३

वाली व सुग्रीव यांचेमधील कलहाबद्दल रामाला पूर्वीची काहीहि माहिती नव्हती. वानर हा समुदाय पशूंचा खासच नव्हता कारण त्यांचा व मानवांचा खुलासेवार वाद आणि संवाद होऊं शकत होता. मात्र उत्तर भारतातील ज्या मानवसमूहातून राम आला होता त्यांचा व वानरकुळांचा संबंध आलेला नव्हता. उलट रावणाचा व वाली-सुग्रीवांच्या वानरसमाजाचा संबंध व विग्रह होता असे वर्णनावरून स्पष्ट दिसते. या समाजाचे रीतिरिवाज रामाला अपरिचित होते. वाली व सुग्रीवांचा कलह ही रामायणातील वर्णनावरून एक दुर्दैवी घटना होती. वालीचा सुग्रीवावर राग होण्यास त्याच्या दृष्टीने सबळ कारण घडले होते कारण वालीची वाट पहात न बसतां त्याने राज्य स्वीकारले होते. मात्र तरीहि वालीने सुग्रीवाला ठार मारले नव्हते तर राज्याबाहेर घालवले होते. राज्यावर वालीचाच अधिकार होता. सुग्रीवाची पत्नी वालीने बळकावली होती हा त्याच्यावर प्रमुख आरोप होता. मात्र पूर्वी वाली गुहेत अडकला असताना व (लोकाग्रहास्तव) राज्य चालवताना व वालीवधानंतर सर्वाधिकारी झाल्यावर सुग्रीवानेहि वालीची पत्नी तारा हिला (तिच्या इच्छेने कीं इच्छेविरुद्ध?) पत्नीपद दिलेच. अर्थ इतकाच घेतला पाहिजे कीं वानरसमाजात पतिपत्नी नाते काहीसे ढिलेच होते! त्यामुळे वालीचा अपराध वधाची शिक्षा देण्याएवढा घोर नक्कीच म्हणतां येत नाही आणि रामाला वालीला मारण्याचा काही खास नैतिक अधिकार होता असा दावा करता येत नाही. रामाने सुग्रीवाला वचन दिले त्याचे कारण वेगळे शोधले पाहिजे.
रामाला स्पष्ट दिसत होते कीं सीतेच्या शोधासाठी व रावणावर स्वारी करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार होते. ते अयोध्येहून मिळवतां आले असते पण फार वेळ गेला असता. त्यापेक्षा जवळचा मार्ग म्हणजे दक्षिण भारतातील या प्रबळ वानरसमाजाला आपल्याकडे वळवणे. वालीकडेच मदत मागितली असती तर कदाचित त्यानेहि दिली असती. पुढे वालीने मरणापूर्वी तसे रामाला म्हटले देखील. पण ’गरजू’ म्हणून वालीपुढे जाण्यापेक्षा ’उपकारकर्ता’ म्हणून सुग्रीवाचे साहाय्य घेणे जास्त सन्मानाचे! त्यामुळे वाली-सुग्रीवांच्या कलहाची कथा ऐकल्यावर, योग्यायोग्य, नैतिक-अनैतिकतेचा घोळ घालत न बसतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं ’मी तुझ्या वतीने वालीचा वध करीन’ व त्या बदल्यात सुग्रीवाकडून सीतेचा शोध व सुटका यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन मिळवले.

Wednesday, November 24, 2010

किष्किंधाकांड भाग २

राम-लक्ष्मण सुग्रीवाला भेटण्याच्या हेतूने मतंगवनाच्या परिसरात पोचले. ऋष्यमूक पर्वतावर आसरा घेतलेल्या सुग्रीव, हनुमान व इतरांनी त्याना पाहिले व हे कोण असतील हे त्याना कळेना. हे तरुण, सुदृढ व धनुष्यबाण धारण करणारे मानव आपल्याला मारण्यासाठी वालीकडून आले असावे अशी सुग्रीवाला भीती वाटली कारण तो सदैव वालीच्या भीतीने ग्रस्त होता व जीव मुठीत धरून या भागात वावरत होता. त्याने हनुमानाला सांगितले कीं तू नीट शोध घे कीं हे कोण व काय हेतूने येथे आले आहेत. त्याने हनुमानाला मार्मिक सूचना केली कीं त्यांच्याशी बोलताना अशी काळजी घे कीं तुझे मुख माझ्या दिशेला असेल म्हणजे मला लांबूनहि कळेल कीं हे मित्र कीं शत्रु! हनुमान राम-लक्ष्मणांपाशी आला. त्याने आपला व सुग्रीवाचा परिचय करून दिला व तुम्ही कोण अशी विचारणा केली. त्यावर रामाने खुलासा केला कीं आम्ही सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून त्याला भेटण्यास आलो आहोत. मग हनुमानाने सुग्रीवास आश्वासन देऊन राम-सुग्रीव भेट घडवून आणली. परस्परांनी आपली हकीगत व मदतीची अपेक्षा एकमेकांस सांगितली तेव्हां सहजच दिसून आले कीं दोघांनाहि एकमेकांची गरज आहे. सुग्रीव-वाली यांचेमधील कलहाची हकीगत ऐकल्यावर वालीची बाजू ऐकण्याची वाट न पाहतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं मी तुझ्यासाठी वालीला मारीन! सुग्रीवानेहि वचन दिले कीं सीतेच्या शोधामध्ये मी व माझे सर्व अनुचर संपूर्ण सहकार्य़ करूं सीतेने वानरांकडे फेकलेलीं वस्त्रे-आभूषणे समोर ठेवलीं गेलीं व तीं ओळखून रामाने अपार शोक केला. परस्परांनी वारंवार मदतीच्या आणाभाका घेतल्या. हनुमानाने मध्यस्थाचे काम उत्तम पार पाडले व येथून पुढे प्रत्येक प्रसंगात सुग्रीवाचे व रामाचे हित सारख्याच तत्परतेने सांभाळले. रामाने प्रथमच कळलेल्या वाली-सुग्रीव कलहात, न्याय-अन्याय ठरवण्यात वा वालीला भेटण्यात वेळ न घालवता, सरळ एकतर्फी सुग्रीवाची बाजू घेतली, असे कां केले याचा थोडा उहापोह पुढील भागात करूं.

Wednesday, November 3, 2010

किष्किंधा कांड - भाग १

अरण्यकांडावरील लेखन संपून बरेच दिवस झाले काही कारणामुळे पुढील लेखन थांबवले होते. वाचकांपैकी काहीनी उत्सुकता व्यक्त केलेली दिसून आली व तिला प्रतिसाद म्हणून पुढील किष्किंधाकांडाला सुरवात करीत आहें.
या कांडात वर्णिलेल्या कथाभागाचे दोन स्पष्ट भाग जाणवतात. राम-लक्ष्मण व सुग्रीव यांची भेट, मैत्री व परस्परांस मदतीचीं आश्वासने, रामाच्या हस्ते वालीचा मृत्यु, सुग्रीवाने किष्किंधेत व रामाने पर्वतगुहेत पर्जन्यकाळ काढणे व नंतर सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानराना सर्वत्र पाठवणे हा एक भाग आणि इतर दिशाना गेलेल्या वानराना अपयश पण दक्षिण दिशेला गेलेल्या हनुमान अंगदाना समुद्रकिनार्‍यापर्यंत पोचण्यात यश व मग हनुमानाने समुद्रपार होण्यासाठी सज्ज होणे हा दुसरा भाग. पहिला भाग सुस्पष्ट आहे. वालीमृत्यु हा त्यातील प्रमुख प्रसंग आहे. (मी मुद्दामच वालीवध असा शब्दप्रयोग टाळला आहे.) दुसर्‍या भागांतील अनेक स्थलवर्णने काव्यमय असलीं तरी न उलगडणारीं आहेत. मी त्याबद्दल काही लिहिणार नाही. पुढील लेखापासून पहिल्या भागाची सुरवात करणार आहें.
Locations of visitors to this page