Thursday, August 6, 2009

अयोध्याकांड - भाग १०

चित्रकूटावर रामलक्ष्मणांना भरताच्या सैन्याची चाहूल लागली तेव्हा रामाच्या सूचनेवरून लक्ष्मणाने झाडावर चढून पाहिले व अयोध्येचे सैन्य असे ओळ्खून, ’हा भरत आला आहे.त्याचा हेतु काय?’ असा संशय व्यक्त करून त्याने रामाला सावध केले. रामाने मात्र, ’भरत मला प्रिय आहे, त्याला उगाच कठोर बोलू नको’ असे त्याला बजावले. सैन्य व इतरांना मागे ठेवून भरत एकटाच रामाचा आश्रम शोधत पुढे आला. वनात फिरताना वाट चुकू नये म्हणून लक्ष्मणाने झाडांना खुणेसाठी बांधलेली वस्त्रे त्याला दिसली, त्यांच्या सहाय्याने तो रामाच्या पर्णशालेत पोचला. तेथे त्याला अनेक शस्त्रे व धनुष्ये दिसली.
राम-भरतभेटीबद्दल आपणाला सविस्तर माहिती आहे. ’तूं वनांत कां आला आहेस’ असे विचारल्यावर भरताने दशरथ मृत्यु पावल्याचे सांगितले. भरताने रामाला अयोध्येला परतून राज्य स्वीकारण्यासाठी परोपरीने विनवले. वसिष्ठानेहि कुलपरंपरा सांगितली मात्र ’मला वनवास व भरताला राज्य या पित्याच्या स्वच्छ आज्ञा आहेत व त्या मी मोडणार नाही, आता पित्याच्या मृत्यूनंतर तर वनवास आटोपल्यावरहि अयोध्येस येण्यास माझे मन घेणार नाही’ असे राम म्हणाला. भरताने ’पित्याची चूक तूं दुरुस्त कर, त्याला अंतकाळीं भ्रम झाला, मी ज्येष्ठ पुत्र नसताना राज्य कसे स्वीकारूं?’ असे अनेक युक्तिवाद केल्यावर येथे प्रथमच रामाने, दशरथाने कैकेयीच्या पित्याला विवाहसमयीं दिलेल्या वचनाचा उल्लेख केला. ही गोष्ट राम सोडून इतर कोणाला, वसिष्ठालाहि माहीत नव्हती. रामाला कशी माहीत होती? कधीतरी दशरथाच्या तोंडूनच रामाला ही गोष्ट कळली असली पाहिजे. पण मग सत्यवचनी म्हटला जाणारा राम, पित्याच्या इच्छेप्रमाणे अभिषेक करून घेण्यास कसा तयार झाला होता? त्याने पित्याला विरोध केला नाही वा त्याच्याच वचनाची आठवणही करून दिली नाही. ’माझे मन बदलत नाही व भरत दूर आहे तोवरच तू अभिषेक करून घे, सांभाळून रहा, तुला धोका आहे’ असें दशरथ म्हणाला तेव्हांही रामाने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सत्यवचनी व भरतप्रेमी या रामाच्या लौकिकाशी मुळीच सुसंगत नाही.
रामाने भरताची समजूत घातली. ’१४ वर्षे संपेपर्यंत मी परत येणार नाही व राज्य तुलाच संभाळावे लागणार आहे, कौसल्या सुमित्रा यांची काळजी घे, कैकेयीलाही शासन करूं नको’ वगैरे उपदेश केला. राम ऐकत नाही असे पाहून ऋषींनी भरताला परत फिरण्यास सांगितले. नाइलाजाने रामाच्या पादुका घेऊन भरत परत निघाला. ’मीहि १४ वर्षे राजधानी बाहेरच राहीन व पादुकांच्या आधारे राज्य सांभाळीन, १४ वर्षे पूर्ण होतांच तुम्ही दिसलां नाहीं तर प्राणत्याग करीन’ असे रामाला म्हणाला.
या सर्व प्रसंगांत भरताचे थोर मन फारच उठून दिसते. आपल्याला राज्य मिळण्यात मोठा अन्याय झालेला नाही हे दिसल्यावरही त्याने राज्याचा लोभ केला नाही. रामाने भरताला वडील भाऊ या नात्याने उपदेश करणे वगैरे ठीक आहे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही कीं राम भरतापेक्षां कांही तासांनीच मोठा होता! तेव्हां तारतम्य सोडून चालणार नाही. मुळात रामाने पित्याच्या इच्छेप्रमाणे राज्य स्वीकारण्याचे ठरवले होते पण कैकेयीने दशरथाला कोंडींत पकडल्याचे दिसल्यावर त्याने पित्याची सुटका केली व एकदां आपला राज्यावर हक्क नाही हे मान्य केल्यावर मात्र तो ठाम राहिला हे खरे.
पुढील भागामध्ये अयोध्याकांडाची अखेर गांठावयाची आहे.
Locations of visitors to this page