Thursday, April 22, 2010

पुन्हा सुरवात

मित्रहो,
गेले दहा महिने अमेरिकेत वास्तव्य असल्यामुळे या ब्लॉगवरचे लेखन थांबले होते. आता भारतात परत आलो आहे व पुन्हा अरण्यकांडापासून नवीन लेखन सुरू करणार आहे. माझ्या पूर्वीच्या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळत होता. नवीन लेखनालाहि तो मिळत राहील अशी आशा आहे. लेखनाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच राहील. धन्यवाद.
प्र. के. फडणीस

Tuesday, September 8, 2009

अयोध्याकांड - भाग ११

भरत निराश होऊन अयोध्येला परत निघाला. त्याच्या परतीच्या प्रवासाच्या वर्णनांत मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख आहे पण यमुना ओलांडल्याचा मात्र नाहीं! त्याशिवाय तो भरद्वाजाच्या आश्रमात पोचला (कसा?) येथे नद्या ओलांडण्याच्या वर्णनात थोडी विसंगति दिसते. तेथून पुढे अयोध्येच्या वाटेवर गंगा ओलांडल्याचा मात्र उल्लेख आहे! भरताला अयोध्या भकास दिसली आणि तेथे न थांबतां तो पूर्वेकडे नंदिग्रामाला पोचला. हे अर्थातच हल्ली ममता बानर्जीमुळे गाजलेले नंदिग्राम नव्हे. ते दूर गंगेच्या मुखाशी आहे. रामायणातील नंदिग्राम अयोध्येच्या जवळच होते. त्यामुळे थेथे राहून भरताने १४ वर्षे राज्य चालवले. यानंतर रामायणाच्या जवळजवळ अखेरीपर्यंत भरताचा उल्लेख येत नाही. सीताहरणाच्या वृत्तान्त त्याचेपर्यंत पोचलाच नाही त्यामुळे रामाच्या मदतीला अयोध्येचे सैन्य धावून गेले नाहीं.
यानंतर राम चित्रकूट सोडून पुढे गेला. मात्र चित्रकूटावर किती काळ राहिला याचा स्पष्ट उल्लेख नाहीं पण दीर्घकाळ राहिला असेहि म्हटलेले नाही. खुद्द चित्रकूट तीर्थात मात्र रामाने वनवासाचा बराचसा काळ तेथे काढला अशी ठाम समजूत आहे, ती खरी दिसत नाही. भरत गेल्यानंतर अनेक ऋषि चित्रकूट सोडून चालले असे रामाला दिसले. रामाच्या चित्रकूटावर राहण्य़ामुळे आपल्यामागे राक्षसांचा ससेमिरा लागेल अशी त्यांना बहुधा धास्ती वाटत असावी. रावणाचा भाऊ खर राक्षस याने ’जनस्थाना’तून सर्व तापसांना घालवून लावले होते असे म्हटले आहे पण हे जनस्थान कोठे होते याचा उल्लेख नाही. पत्नीसह राम चित्रकूटावरच राहिला तर धोका असल्यामुळे मुख्य तापसी निघून गेले त्याना राम थोपवू शकला नाही. ज्यांचा रामावर विश्वास होता ते राहिले. रामानेहि विचार केला कीं येथेच राहिलो तर माता, भरत, अयोध्यावासी यांच्या आठवणी येतच राहतील. भरताच्या ससैन्य मुक्कामामुळे या मुलखाचीहि फार हानि झाली आहे तेव्हां आपणही चित्रकूट सोडून जावे. हे रामायणातील स्पष्ट उल्लेख असे निश्चितच दर्शवतात कीं भरत गेल्यावर पावसाळ्यापूर्वीच राम चित्रकूट सोडून गेला. अकरा वर्षे खासच राहिला नाही जसे चित्रकूटात मानले जाते!
रामायण पुढे म्हणते कीं चित्रकूटावरून राम निघाला तो अत्रि ऋषींच्या आश्रमाला पोचला. कोणत्या मार्गाने वा किती प्रवास करून पोचला हे काहीच सांगितलेले नाहीं. अत्रिऋषीनीं रामाचा सत्कार केला उपदेश केला. अनुसूयेने सीतेकडून सर्व हकीगत समजावून घेतली. येथे सीतेने तिला सांगितलेल्या पूर्वेतिहासांतहि कांही विसंगति दिसतात. सीता म्हणाली ’मी विवाहयोग्य झाले म्हणून पित्याने माझे स्वयंवर मांडले. शिवधनुष्य सज्ज करण्याचा पण होता. कोणाही राजाला धनुष्य पेलले नाही व ते सारे परत गेले. त्यानंतर दीर्घ काळाने रामलक्ष्मण मिथिलेला आले.’ राम मिथिलेला आला तेव्हां जेमतेम १६ वर्षांचा होता. व लगेच त्याचा व सीतेचा विवाह झाला तेव्हां त्यावेळी सीताहि फारतर १२-१३ वर्षांची असणार! मग तिचे पूर्वीचे स्वयंवर दीर्घ काळापूर्वी जनकाने कसे योजले असेल? तेव्हां तर ती अगदींच बालिका असणार, विवाहयोग्य खासच नसणार!
अत्रिऋषींचा निरोप घेऊन राम निघाला तो पुढे गेला तो मुलूख ’राक्षसांचा उपद्रव होणारा’ असा वर्णिला आहे. मात्र पुढील प्रवासाचे वर्णन वा भौगोलिक संदर्भ मुळीच सांगितलेले नाहीत.
येथे अयोध्याकांड संपले. रामाच्या यापुढील प्रवासाचा विचार पुढील कांडांच्या संदर्भांत करावयाचा आहे. भौगोलिक संदर्भांच्या बाबत आणखी एका गोष्टीचा उल्लेख करून विषय संपवूं. जिला सध्या अयोध्या म्हणतात तीच रामायणातील अयोध्या काय? अशीहि एक शंका घेतली जाते! वाचनात आलेल्या एका अभ्यासपूर्ण पुस्तकांत उत्तरकांडातील एका श्लोकाचा संदर्भ देऊन लेखकाने म्हटले आहे कीं अयोध्येपाशीं शरयू नदी ही पश्चिमवाहिनी असल्याचे रामाने सीतेला (पुष्पकविमानातून) दाखवले. प्रत्यक्षात अयोध्येपाशी शरयू दक्षिणवाहिनी व अयोध्येच्या पश्चिमेस आहे! लेखकाने असे दाखवून दिले आहे कीं शरयू हिमालयभागात प्रथम पश्चिमवाहिनी असून मग ती एका खिंडीतून खाली मैदानी भागात उतरते. मग रामायणातील अयोध्या हिमालयात शरयूच्या पश्चिमवाहिनी भागाच्या काठावर होती कीं काय?
अयोध्याकांडातील रामकथा मुख्यत्वे आपल्या मनातील रामकथेशी जवळपास जुळणारी आहे. मात्र काही घटनांवर, भौगोलिक व कालवाचक संदर्भांवर व व्यक्तिमत्त्वांवर मूळ रामाय़ण चिकित्सकपणे वाचले असतां कांही नवीन प्रकाश जरूर पडतो व शंकास्थळे नजरेला येतात. त्यांचे थोडेफार दर्शन घडवण्याचा माझा हेतु साध्य झाला असावा असे वाटते.

Thursday, August 6, 2009

अयोध्याकांड - भाग १०

चित्रकूटावर रामलक्ष्मणांना भरताच्या सैन्याची चाहूल लागली तेव्हा रामाच्या सूचनेवरून लक्ष्मणाने झाडावर चढून पाहिले व अयोध्येचे सैन्य असे ओळ्खून, ’हा भरत आला आहे.त्याचा हेतु काय?’ असा संशय व्यक्त करून त्याने रामाला सावध केले. रामाने मात्र, ’भरत मला प्रिय आहे, त्याला उगाच कठोर बोलू नको’ असे त्याला बजावले. सैन्य व इतरांना मागे ठेवून भरत एकटाच रामाचा आश्रम शोधत पुढे आला. वनात फिरताना वाट चुकू नये म्हणून लक्ष्मणाने झाडांना खुणेसाठी बांधलेली वस्त्रे त्याला दिसली, त्यांच्या सहाय्याने तो रामाच्या पर्णशालेत पोचला. तेथे त्याला अनेक शस्त्रे व धनुष्ये दिसली.
राम-भरतभेटीबद्दल आपणाला सविस्तर माहिती आहे. ’तूं वनांत कां आला आहेस’ असे विचारल्यावर भरताने दशरथ मृत्यु पावल्याचे सांगितले. भरताने रामाला अयोध्येला परतून राज्य स्वीकारण्यासाठी परोपरीने विनवले. वसिष्ठानेहि कुलपरंपरा सांगितली मात्र ’मला वनवास व भरताला राज्य या पित्याच्या स्वच्छ आज्ञा आहेत व त्या मी मोडणार नाही, आता पित्याच्या मृत्यूनंतर तर वनवास आटोपल्यावरहि अयोध्येस येण्यास माझे मन घेणार नाही’ असे राम म्हणाला. भरताने ’पित्याची चूक तूं दुरुस्त कर, त्याला अंतकाळीं भ्रम झाला, मी ज्येष्ठ पुत्र नसताना राज्य कसे स्वीकारूं?’ असे अनेक युक्तिवाद केल्यावर येथे प्रथमच रामाने, दशरथाने कैकेयीच्या पित्याला विवाहसमयीं दिलेल्या वचनाचा उल्लेख केला. ही गोष्ट राम सोडून इतर कोणाला, वसिष्ठालाहि माहीत नव्हती. रामाला कशी माहीत होती? कधीतरी दशरथाच्या तोंडूनच रामाला ही गोष्ट कळली असली पाहिजे. पण मग सत्यवचनी म्हटला जाणारा राम, पित्याच्या इच्छेप्रमाणे अभिषेक करून घेण्यास कसा तयार झाला होता? त्याने पित्याला विरोध केला नाही वा त्याच्याच वचनाची आठवणही करून दिली नाही. ’माझे मन बदलत नाही व भरत दूर आहे तोवरच तू अभिषेक करून घे, सांभाळून रहा, तुला धोका आहे’ असें दशरथ म्हणाला तेव्हांही रामाने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सत्यवचनी व भरतप्रेमी या रामाच्या लौकिकाशी मुळीच सुसंगत नाही.
रामाने भरताची समजूत घातली. ’१४ वर्षे संपेपर्यंत मी परत येणार नाही व राज्य तुलाच संभाळावे लागणार आहे, कौसल्या सुमित्रा यांची काळजी घे, कैकेयीलाही शासन करूं नको’ वगैरे उपदेश केला. राम ऐकत नाही असे पाहून ऋषींनी भरताला परत फिरण्यास सांगितले. नाइलाजाने रामाच्या पादुका घेऊन भरत परत निघाला. ’मीहि १४ वर्षे राजधानी बाहेरच राहीन व पादुकांच्या आधारे राज्य सांभाळीन, १४ वर्षे पूर्ण होतांच तुम्ही दिसलां नाहीं तर प्राणत्याग करीन’ असे रामाला म्हणाला.
या सर्व प्रसंगांत भरताचे थोर मन फारच उठून दिसते. आपल्याला राज्य मिळण्यात मोठा अन्याय झालेला नाही हे दिसल्यावरही त्याने राज्याचा लोभ केला नाही. रामाने भरताला वडील भाऊ या नात्याने उपदेश करणे वगैरे ठीक आहे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही कीं राम भरतापेक्षां कांही तासांनीच मोठा होता! तेव्हां तारतम्य सोडून चालणार नाही. मुळात रामाने पित्याच्या इच्छेप्रमाणे राज्य स्वीकारण्याचे ठरवले होते पण कैकेयीने दशरथाला कोंडींत पकडल्याचे दिसल्यावर त्याने पित्याची सुटका केली व एकदां आपला राज्यावर हक्क नाही हे मान्य केल्यावर मात्र तो ठाम राहिला हे खरे.
पुढील भागामध्ये अयोध्याकांडाची अखेर गांठावयाची आहे.

Thursday, July 16, 2009

अयोध्याकांड - भाग ९

आईचा धि:कार करून भरत बाहेर पडला तो कौसल्येला भेटला. तिने झाल्या गोष्टीबद्दल भरताला दोष दिला तो मात्र नाकारून ’मला काहीच माहीत नाही’ असे त्याने म्हटले. रात्र होईपर्यंत इतर कोणीच भरताला भेटले नाही. त्यामुळे तो आल्याचेहि कोणाला कळले नाही. दुसर्‍या दिवशी दशरथाच्या प्रेताचे दहन होऊन मग तेरा दिवस सर्व उत्तरक्रिया झाली. दूत केकय देशाला जाऊन मग भरत आला त्यांत १२-१३ दिवस गेले होते. त्यामुळे दशरथाच्या मृत्यूनंतर २४-२५ दिवसांनी भरताला राज्य स्वीकारण्याचा आग्रह सुरू झाला. त्याने ठाम नकार दिला. रामाला परत बोलावण्यासाठी स्वत:च त्याच्या भेटीला जाण्याचा बेत त्याने केला. भरत ससैन्य व कुटुंबीय व मंत्र्यांसह जाणार असल्यामुळे अयोध्येपासून गंगाकाठापर्यंत नवा रस्ता बनवला गेला! त्याचे खुलासेवार वर्णन केले आहे. त्यासाठी किती दिवस लागले ते सांगितलेले नाही. रामाने गंगा ओलांडली त्यानंतर सुमंत्र परत जाणे, दशरथनिधन, दूतप्रवास, भरतप्रवास, उत्तरक्रिया, प्रवास तयारी व भरताचा गंगाकाठापर्यंत प्रवास यांत एक महिन्याहून जास्त काळ गेला असे दिसते. गंगाकिनार्‍यावर भरतही गुहकालाच भेटला. त्याला प्रथम भरताच्या हेतूबद्दल शंकाच आली. पण भरताने त्याची खात्री पटवली. मग त्याने ५०० नौका जमवून सर्व लवाजम्यासकट भरताला गंगापार केले. भरत प्रयागात भारद्वाज आश्रमात जाऊन त्याना भेटला. त्यानाहि प्रथम भरताच्या ससैन्य वनात येण्याच्या हेतूबद्दल शंकाच वाटली. (एकटा लक्ष्मणच शंकेखोर नव्हे!) मात्र नंतर भरताच्या बोलण्यावरून खात्री पटून ’राम-लक्ष्मण-सीता चित्रकूटावर आहेत’ अशी माहिती त्यानी भरताला दिली. एक रात्र गंगातीरावर मुक्काम करून मग सर्वजण चित्रकूटाकडे निघाले. चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला असताना, भरताने यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. चित्रकूटाच्या उत्तरेला मंदाकिनी नदी असल्याचे वर्णन आहे. पण रामाने वा भरताने मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख नाही. ही मंदाकिनी कोणती? हिमालयामध्ये अलकनंदा व मंदाकिनी या नद्या आहेत ती मंदाकिनी अर्थातच ही नव्हे. इतरत्र वाचावयास मिळाले व विकिमॅपियावर एक नकाशा पहावयास मिळाला त्यावरून मध्यप्रदेशात एक मंदाकिनी नावाची नदी आहे व ती अलाहाबादच्या वरच्या बाजूला काही अंतरावर यमुनेला मिळते. तिच्या आग्नेयेला चित्रकूट हे तीर्थक्षेत्र आहे व ते मंदाकिनीच्या किनारी आहे. त्यामुळे यमुना प्रयागपाशी ओलांडली तर चित्रकूटाच्या वाटेवर मंदाकिनी ओलांडावी लागणार नाही. रामायणात चित्रकूट प्रयागापासून दहा कोस दूर असल्याचे भरद्वाजानी रामाला म्हटले आहे. प्रत्यक्षात चित्रकूट प्रयागपासून १०० पेक्षा जास्त मैल, जबलपूर-अलाहाबाद रेल्वे मार्गापासून बांद्याकडे जाणार्‍या रेल्वेफाट्यावर कारवी नावाच्या स्टेशनच्या जवळ आहे. तेच रामाच्या वस्तीने पावन झालेले रामायणातील चित्रकूट असे मानले जाते. तेव्हां भरद्वाजाने रामाला सांगितलेले अंतर सपशेल चुकलेले होते असे म्हणावे लागते.
या चित्रकूटाबद्दल थोडी ऐतिहासिक माहिती सांगण्याचा मोह आवरत नाही. रघुनाथराव पेशव्याला बारभाईनी पदच्युत केले. त्याचा बाजीराव हा औरस पुत्र व अमृतराव हा आधीचा दत्तक पुत्र. सवाईमाधवरावाच्या मृत्यूनंतर यांतील कोणालाच पेशवाई मिळू नये यासाठी नाना फडणिसाने नाना प्रयत्न केले. तरी अखेर बाजीरावच पेशवा झाला. अमृतराव त्याचा कारभारी झाला व तो फार कर्तबगार आहे असे इंग्रजांचे मत होते. पण बेबनाव होऊन अखेर सालिना आठ लाखाची जहागीर देऊन त्याला इंग्रजानी वाराणसीला पाठवले. तेथेच त्याची अखेर झाली. त्याचा पुत्र विनायकराव जहागीर संभाळून होता. तो नंतर चित्रकूटाला गेला. त्याच्या संस्थानाला कारवी संस्थान म्हणत. १८५३ मध्ये तो वारला. १८५७ पर्यंत संस्थान चालले. बंडात सामील असल्याचा खोटा आळ घेऊन इंग्रजांनी संस्थान खालसा केले व कारवीची प्रचंड प्रमाणावर लूट केली.

Wednesday, July 1, 2009

अयोध्याकांड - भाग ८

अयोध्येहून निघालेले दूत ४-५ दिवसांत कैकय देशाच्या राजधानीला पोंचले. त्यांच्या प्रवासमार्गाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. प्रथम मालिनी नदी व नंतर हस्तिनापुरापाशी गंगा ओलांडली, पांचाल व कुरुजांगल देश ओलांडला असे म्हटले आहे. यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. यानंतर इतरहि नद्या, इक्षुमती व विपाशा ओलांडल्याचे वर्णन आहे व मग ते राजधानीला पोचले तिचे नाव गिरिव्रज असे दिले आहे. महाभारतातहि एक गिरिव्रज आहे. ती जरासंधाची राजधानी होती. डोंगरांनी वेष्टिलेली म्हणून तिचे नाव गिरिव्रज. पण महाभारतातील गिरिव्रज म्हणजे पाटणा अशी माझी समजूत आहे. तें हें नव्हे. गंगा सोडून इतर नद्यांचीं जुनी नावे परिचित नसल्याने हे केकय देशातील गिरिव्रज कोठे होते त्याचा नीट उलगडा होत नाही.
दूतांना आज्ञा होती कीं भरताला दशरथ मृत्यु पावल्याचें कळूं द्यावयाचे नाहीं, लगेच अयोध्येला बोलावले आहे एवढेच सांगावयाचे. निरोप मिळाल्यावर पितामहांची परवानगी घेऊन भरत लगेच मंत्र्यांसह अयोध्येस निघाला. त्याचेबरोबर अनेक भेटी, संपत्ति व सैन्य असल्यामुळे त्याला प्रवासाला वेळ लागला. शत्रुघ्न व या दोघांच्या बायका बरोबर होत्या काय? खुलासा नाही. मुळात त्या केकय देशाला गेल्याचाच कोठे उल्लेख नाही पण कित्येक वर्षे भरत आणि शत्रुघ्न केकय देशालाच होते तेव्हां सुरवातीला ते दोघे गेले तेव्हां त्या कदाचित वयाने लहान असल्याने गेल्या नसल्या तरी पुढे केव्हां तरी गेल्याच असणार. एकूण रामायणात त्या नगण्यच आहेत. या परतीच्या प्रवासाचेहि विस्तृत वर्णन आहे. मात्र त्यावरूनहि कैकेय देश कोठे होता त्याचा उलगडा होत नाही. अनेक नद्या ओलांडून भरत यमुनेपाशी आला पण यमुना ओलांडल्याचा उल्लेख नाही. नंतर तो गंगा व गोमती ओलांडून अयोध्येला आला. केकय देश यमुनेच्या पश्चिमेला, दक्षिणेला कीं गंगायमुनांच्या मधल्या अंतर्वेदीत हे कळत नाही, कारण यमुना दोन्ही वेळा ओलांडलेली नाही! तेव्हां यमुनेच्या पूर्वेलाच पण बराच उत्तर भागांत असावा एवढेच म्हणतां येईल. अयोध्येजवळ आल्यावर सर्वांना मागे ठेवून भरत एकटाच अयोध्येत शिरला. या प्रवासाला आठ दिवस लागले असे म्हटले आहे. भरत सरळ पित्याच्या भवनात गेला व तेथे पिता नसल्यामुळे कैकेयीमातेच्या भवनात शिरला.
दशरथाचा मृत्यु झाला व एकहि पुत्र जवळ नसल्यामुळे त्याची उत्तरक्रियाही झाली नव्हती आणि त्यामुळे भरताला तातडीने बोलावले होते. पण त्याच्या येण्याची खबर मंत्र्यांना वा वसिष्ठाला लगेच मिळण्याची कोणतीच व्यवस्था केलेली नव्हती असे दिसते. हे जरा चमत्कारिकच वाटते. कोणालाही भरत आल्याची बातमी कळण्याआधी तो सरळ कैकेयीलाच भेटला. राम-लक्ष्मण-सीता वनात गेल्याची व पिता दशरथ मृत्यु पावल्याची हकीगत भरताला मातेकडून कळली. कैकेयी-भरत संवादाबद्दल आपणाला माहीतच आहे.त्यामुळे लिहिण्याची गरज नाही. यावेळीहि, ’दशरथाने पूर्वीच केकयनरेशाला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझाच राज्यावर हक्क होता व तोच मी मागितला’ असे कैकेयी भरताला म्हणत नाही. तिला त्या वचनाबद्दल माहितीच नसावी असे स्पष्ट दिसते.

Thursday, June 11, 2009

अयोध्याकांड - भाग ७

रामाने निरोप दिल्यावर सुमंत्र गुहकाजवळ, राम कदाचित बोलावील या आशेने काही दिवस थांबून राहिला होता. राम भरद्वाज आश्रमाला पोचल्याची बातमी गुहकाच्या हेरांनी सांगितल्यावर निराश होऊन तो अयोध्येला परत गेला. तो रामाशिवायच परत आलेला पाहून राम खरेच वनात गेला अशी खात्री होऊन दशरथ मूर्च्छित झाला. मग ’मला रामाकडे ने’ असे सुमंत्राला विनवू लागला. राम वनात जाऊन पांच रात्री उलटल्या असे यावेळी कौसल्या म्हणाली यावरून सुमंत्र गुहकापाशी एखददुसराच दिवस राहिला असावा. दशरथ, कौसल्या शोकमग्न झालीं. दशरथाने यावेळी श्रावणाची कथा सांगून त्याच्या पित्याचा शाप मला भोवतो आहे असे म्हटले. मात्र श्रावणाचा जन्म वैश्य पिता व शूद्र माता यांचेपासून असल्याचे दशरथ म्हणाला. हा खुलासा मुद्दाम करण्याचे कारण दशरथाला ब्रह्महत्येचे पातक लागलेले नव्हते हे स्पष्ट करणे हेच असावे. त्यामुळे दशरथाचा गुन्हा थोडा सौम्य ठरला! विलाप करीतच मध्यरात्री दशरथ मरण पावला. हा प्रसंग कौसल्येच्या महालात घडला व सुमित्राही तेथेच होती पण कैकेयीचा उल्लेख नाही. कौसल्या, सुमित्रा अर्धवट शुद्धीत होत्या त्याना दशरथ मेल्याचे कळलेहि नाही. जणू तो बेवारशासारखा मरण पावला! कैकेयीला काहीच कळले नव्हते. दुसरे दिवशी राण्या, मंत्री, वसिष्ठमुनि, प्रजाजन सर्व शोकमग्न झाले. एकहि पुत्र जवळ नसल्याने दशरथाचे शव तेलाने भरलेल्या द्रोणीत ठेवले. (आजकाल मॉर्गमध्ये ठेवतात तसे!). मार्कंडेय ऋषीनी वसिष्ठाना म्हटले की कोणाही राजवंशातील व्यक्तीला अभिषेक करा. तें न मानून वसिष्ठाने पांच दूत भरताकडे शीघ्र पाठवले. यापुढील हकिगत पुढील भागात पाहूं.

Tuesday, May 12, 2009

अयोध्याकांड - भाग ६

सुमंत्र रथात राम-लक्ष्मण-सीता यांना घालून निघाला तो संध्याकाळी तमसातीरावर पोंचला. पाठोपाठ आलेल्या नगरवासीयांचा रामाला परत येण्याचा आग्रह चालूच होता. पहाटे रामाने सुमंत्राला एकट्याला रथ घेऊन उत्तर दिशेला पाठवले व काही वेळाने दुसर्‍या वाटेने परत येण्यास सांगितले. प्रजाजनांचा गैरसमज होऊन ते रथामागोमाग गेले व रथ परत आल्यावर त्यांत बसून राम, लक्ष्मण, सीता दक्षिण दिशेला वनाकडे निघाले. दुसर्‍या रात्रीपर्यंत रथ गंगातीराला पोंचला. गुहकाची भेट होऊन पुढील दिवशीं त्याने रामाला गंगापार केले. सुमंत्राची रथासह रामाबरोबर राहण्याची इच्छा होती पण ’तूं परत गेल्याशिवाय कैकेयीची खात्री पटणार नाही’ असे समजावून रामाने त्याला गंगातीरावरूनच परत पाठवले. आतां तिघेंच वनांत राहिलीं. या वेळी प्रथमच रामाने कैकेयीबद्दल कडवट शब्द उचारले व ’कैकेयी तुझ्या-माझ्या मातेला विषही देईल’ अशी भीति लक्ष्मणापाशी व्यक्त केली. लक्ष्मणाने त्याला समजावले.
रामाने गंगा कोठे ओलांडली? गंगा ओलांडून तो गंगा-यमुनांच्या संगमाजवळ भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोचला असे म्हटले आहे. तेव्हा हा आश्रम (प्रयाग)अलाहाबादजवळ संगमापाशी यमुनेच्या उत्तरेला असला पाहिजे कारण यमुना ओलांडलेली नव्हती. आश्रम संगमाजवळ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. भरद्वाजांनी स्वागत करून येथेच रहा असे म्हटले पण हा प्रदेश अयोध्येच्या जवळच तेव्हां तें न मानतां भरद्वाजांच्याच सल्ल्याने तेथून दहा कोस अंतरावर चित्रकूट पर्वतावर जाण्याचे ठरले. दुसरे दिवशी भरद्वाजानी चित्रकूटाला जाण्याचा मार्ग समजावून सांगितला त्यांत यमुना ओलांडण्यास सांगितले. त्यावरून चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला पण जवळपासच होता असा समज होतो. येथपर्यंत रामाचा प्रवासमार्ग रामायणावरून बराचसा कळतो. यांनंतरचे प्रवासवर्णन भौगोलिक दृष्ट्या धूसरच आहे. यमुना ओलांडण्यासाठी सुकलेल्या बांबूंची नौका वा तराफा लक्ष्मणाने बनवला. त्या रात्री यमुनेच्या तीरावर राहून दुसर्‍या दिवशी चित्रकूटाला पोचले. तेथे वाल्मिकीचा आश्रम होता. त्याचे जवळच लक्ष्मणाने कुटी बनवली. येवढ्या प्रवासामध्ये ४-५ दिवस गेले. भरत येऊन भेटेपर्यंत राम येथेच राहिला. चित्रकूट प्रयागपासून जवळच असावा अशी समजूत होते. त्याबद्दल प्रत्यक्ष परिस्थिती पुढे पाहूं.
Locations of visitors to this page