Tuesday, September 8, 2009

अयोध्याकांड - भाग ११

भरत निराश होऊन अयोध्येला परत निघाला. त्याच्या परतीच्या प्रवासाच्या वर्णनांत मंदाकिनी ओलांडल्याचा उल्लेख आहे पण यमुना ओलांडल्याचा मात्र नाहीं! त्याशिवाय तो भरद्वाजाच्या आश्रमात पोचला (कसा?) येथे नद्या ओलांडण्याच्या वर्णनात थोडी विसंगति दिसते. तेथून पुढे अयोध्येच्या वाटेवर गंगा ओलांडल्याचा मात्र उल्लेख आहे! भरताला अयोध्या भकास दिसली आणि तेथे न थांबतां तो पूर्वेकडे नंदिग्रामाला पोचला. हे अर्थातच हल्ली ममता बानर्जीमुळे गाजलेले नंदिग्राम नव्हे. ते दूर गंगेच्या मुखाशी आहे. रामायणातील नंदिग्राम अयोध्येच्या जवळच होते. त्यामुळे थेथे राहून भरताने १४ वर्षे राज्य चालवले. यानंतर रामायणाच्या जवळजवळ अखेरीपर्यंत भरताचा उल्लेख येत नाही. सीताहरणाच्या वृत्तान्त त्याचेपर्यंत पोचलाच नाही त्यामुळे रामाच्या मदतीला अयोध्येचे सैन्य धावून गेले नाहीं.
यानंतर राम चित्रकूट सोडून पुढे गेला. मात्र चित्रकूटावर किती काळ राहिला याचा स्पष्ट उल्लेख नाहीं पण दीर्घकाळ राहिला असेहि म्हटलेले नाही. खुद्द चित्रकूट तीर्थात मात्र रामाने वनवासाचा बराचसा काळ तेथे काढला अशी ठाम समजूत आहे, ती खरी दिसत नाही. भरत गेल्यानंतर अनेक ऋषि चित्रकूट सोडून चालले असे रामाला दिसले. रामाच्या चित्रकूटावर राहण्य़ामुळे आपल्यामागे राक्षसांचा ससेमिरा लागेल अशी त्यांना बहुधा धास्ती वाटत असावी. रावणाचा भाऊ खर राक्षस याने ’जनस्थाना’तून सर्व तापसांना घालवून लावले होते असे म्हटले आहे पण हे जनस्थान कोठे होते याचा उल्लेख नाही. पत्नीसह राम चित्रकूटावरच राहिला तर धोका असल्यामुळे मुख्य तापसी निघून गेले त्याना राम थोपवू शकला नाही. ज्यांचा रामावर विश्वास होता ते राहिले. रामानेहि विचार केला कीं येथेच राहिलो तर माता, भरत, अयोध्यावासी यांच्या आठवणी येतच राहतील. भरताच्या ससैन्य मुक्कामामुळे या मुलखाचीहि फार हानि झाली आहे तेव्हां आपणही चित्रकूट सोडून जावे. हे रामायणातील स्पष्ट उल्लेख असे निश्चितच दर्शवतात कीं भरत गेल्यावर पावसाळ्यापूर्वीच राम चित्रकूट सोडून गेला. अकरा वर्षे खासच राहिला नाही जसे चित्रकूटात मानले जाते!
रामायण पुढे म्हणते कीं चित्रकूटावरून राम निघाला तो अत्रि ऋषींच्या आश्रमाला पोचला. कोणत्या मार्गाने वा किती प्रवास करून पोचला हे काहीच सांगितलेले नाहीं. अत्रिऋषीनीं रामाचा सत्कार केला उपदेश केला. अनुसूयेने सीतेकडून सर्व हकीगत समजावून घेतली. येथे सीतेने तिला सांगितलेल्या पूर्वेतिहासांतहि कांही विसंगति दिसतात. सीता म्हणाली ’मी विवाहयोग्य झाले म्हणून पित्याने माझे स्वयंवर मांडले. शिवधनुष्य सज्ज करण्याचा पण होता. कोणाही राजाला धनुष्य पेलले नाही व ते सारे परत गेले. त्यानंतर दीर्घ काळाने रामलक्ष्मण मिथिलेला आले.’ राम मिथिलेला आला तेव्हां जेमतेम १६ वर्षांचा होता. व लगेच त्याचा व सीतेचा विवाह झाला तेव्हां त्यावेळी सीताहि फारतर १२-१३ वर्षांची असणार! मग तिचे पूर्वीचे स्वयंवर दीर्घ काळापूर्वी जनकाने कसे योजले असेल? तेव्हां तर ती अगदींच बालिका असणार, विवाहयोग्य खासच नसणार!
अत्रिऋषींचा निरोप घेऊन राम निघाला तो पुढे गेला तो मुलूख ’राक्षसांचा उपद्रव होणारा’ असा वर्णिला आहे. मात्र पुढील प्रवासाचे वर्णन वा भौगोलिक संदर्भ मुळीच सांगितलेले नाहीत.
येथे अयोध्याकांड संपले. रामाच्या यापुढील प्रवासाचा विचार पुढील कांडांच्या संदर्भांत करावयाचा आहे. भौगोलिक संदर्भांच्या बाबत आणखी एका गोष्टीचा उल्लेख करून विषय संपवूं. जिला सध्या अयोध्या म्हणतात तीच रामायणातील अयोध्या काय? अशीहि एक शंका घेतली जाते! वाचनात आलेल्या एका अभ्यासपूर्ण पुस्तकांत उत्तरकांडातील एका श्लोकाचा संदर्भ देऊन लेखकाने म्हटले आहे कीं अयोध्येपाशीं शरयू नदी ही पश्चिमवाहिनी असल्याचे रामाने सीतेला (पुष्पकविमानातून) दाखवले. प्रत्यक्षात अयोध्येपाशी शरयू दक्षिणवाहिनी व अयोध्येच्या पश्चिमेस आहे! लेखकाने असे दाखवून दिले आहे कीं शरयू हिमालयभागात प्रथम पश्चिमवाहिनी असून मग ती एका खिंडीतून खाली मैदानी भागात उतरते. मग रामायणातील अयोध्या हिमालयात शरयूच्या पश्चिमवाहिनी भागाच्या काठावर होती कीं काय?
अयोध्याकांडातील रामकथा मुख्यत्वे आपल्या मनातील रामकथेशी जवळपास जुळणारी आहे. मात्र काही घटनांवर, भौगोलिक व कालवाचक संदर्भांवर व व्यक्तिमत्त्वांवर मूळ रामाय़ण चिकित्सकपणे वाचले असतां कांही नवीन प्रकाश जरूर पडतो व शंकास्थळे नजरेला येतात. त्यांचे थोडेफार दर्शन घडवण्याचा माझा हेतु साध्य झाला असावा असे वाटते.

1 comment:

  1. Ramaayanatali wisangati tumhi dakhwali nasatee tar sahaj lakshat hee aali nasati . Eka wegalya uddeshyane lihilele he aapale Ramayan chanach aahe.

    ReplyDelete

Locations of visitors to this page