Thursday, January 6, 2011

किष्किंधा कांड - भाग ५

वालीचा वध ग्रीष्म ऋतूच्या शेवटी झाला असा स्पष्ट कालनिर्देश केलेला आढळतो. मात्र महिना, तिथि सांगितलेली नाही. सीताहरण माघ वद्य अष्टमीला झाले होते, त्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा काळ लोटला होता.
वाली घायाळ होऊन कोसळल्यावर त्याला दिसले कीं आपल्याला रामाचा बाण लागला आहे. त्याने अनेक प्रकारे रामाला वाक्ताडन केले. ’माझे तुमचे काहीहि भांडण वा वैर नसतां, मी तुमच्या राज्याला उपद्रव दिलेला नसतां व मी दुसर्‍याशी युद्ध करण्यात गुंतलो असतां, लपून राहून मला मारण्याचे तुम्हाला काय कारण? जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां? त्याचे कारण विचार करून मला सांगा’ असा स्पष्ट जाब विचारला.
यावर रामाने दिलेले उत्तर पूर्णपणे गोलमाल स्वरूपाचे आहे. वालीवर ठेवलेल्या अनेक निरर्थक आरोपांपैकी ’तूं सुग्रीवाच्या पत्नीशीं, जी तुला पुत्रवधूसारखी आहे, कामभोग घेतोस’ हा एकच आरोप खरा होता. मात्र एकीकडे तूं शाखामृग आहेस म्हणून तुझी शिकार करण्याचा क्षत्रिय या नात्याने माझा धर्म आहे’ असे म्हणावयाचे तर दुसरीकडे त्याच्या वर्तनाला सुसंस्कृत मानवसमाजाची नीतिमूल्ये लावावयाची हा प्रकार अशोभनीय होता. ’मी लपून कां मारले कारण तूं शाखामृग म्हणून तुझी शिकार केली’ असे समर्थन केले कारण लपून लढण्याचे दुसरे योग्य कारण देतांच येत नव्हतें! जो आरोप खरा होता तो नंतर सुग्रीवालाहि लागू झाला होता पण त्याला रामाने दोषहि दिला नाही वा शासनहि केले नाहीं. खरे कारण एकच होते कीं वालीला मारून सुग्रीवाला आपलेसे करून घेणे.
रामाचे समर्थन पटो वा न पटो, वालीचा मृत्यु अटळच होता. त्याच्या मृत्यूनंतर तारेने अपार शोक केला. तिनेहि रामाची निंदा केली. हनुमानाने अखेर तिची कशीतरी समजून घातली. आता सुग्रीवाला पश्चात्ताप झाला. ’वालीच्या मनात मला मारून टाकण्याचे कधीहि आले नाही’ अशी त्याने स्पष्ट कबुली दिली. ’मलाहि मारून टाका’ असे तारेने रामाला विनवले. राम व सुग्रीवाने तिचे सांत्वन केले.
वालीची उत्तरक्रिया झाली. (हा वानरसमाज आर्यांच्या चालीरीती पाळणारा कसा काय?) त्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. मात्र वनवासाचे बंधन असल्याचे कारण सांगून रामाने किष्किंधेत जाण्याचे नाकारले. या सर्वामध्ये आणखी काही काळ गेला. ’आता श्रावण महिना सुरू झाल्या’चा रामाचे तोंडी उल्लेख येतो. ’आता वर्षाकाळ असल्यामुळे कार्तिकमासापासून तूं युद्धप्रयत्नाना लाग’ असे रामाने सुग्रीवाला म्हटले. तुंगभद्रेच्या जवळील प्रस्रवण पर्वताच्या गुहेत राम-लक्ष्मण जाऊन राहिले.

4 comments:

 1. namskar kaka,

  ramayanacha n pahilela pailu ughadalya baddal dhanyawad.

  kharach tumache nirikshan barech achuk ahe.

  pan as watat ahe ki tumhi bhag far lawkar sampat ahet thodi ajun mahiti dilyas uttam.

  ReplyDelete
 2. शीर्षकामध्ये लिहिल्याप्रमाणे काही वेगळे वा विसंगत आढळले तर तेवढेच वाचकांसमोर ठेवावे असा माझा हेतु आहे. रामायणकथा सर्वाना सुपरिचितच आहे तिची उजळणी करण्याचा माझा हेतु नाही. तेव्हा क्षमस्व.

  ReplyDelete
 3. गेल्या महिन्याभरात, वेळ मिळेल तसे मी आपण लिहिलेले दोन्ही ब्लोग वाचत गेलो, आणि मला ते आवडलेही. भक्तीरस मध्ये न आणता, ह्या सर्व थोर व्यक्तींचा माणूस म्हणून केलेला विचार मनःपूर्वक आवडून गेला. तुम्ही असेच लिहित राहा, मी आणि माझ्यासारखे अनेक वाचत राहूच.
  महाभारत आणि रामायणाकडे एक वास्तववादी आणि तर्कशुद्ध दृष्टीकोनातून पाहण्याचा माझा स्वतःचाही प्रयत्न होता, त्या साठी मी माझ्या आज्जी कडून महाभारताचे प्रथम दोन खंड (तुमच्या चित्रात आहेत तेच) आणले हि होते, मात्र कामाच्या व्यापात कधी जमलेच नाही. आपण लिहित असलेल्या लेखांमुळे त्यामुळेच विशेष आनंद मिळत आहे.

  रामायणावरील 'वास्तव रामायण' हे प. वि. वर्तक ह्यांनी लिहिलेले पुस्तक आपण वाचले आहे काय ? मला ते वाचण्याचा योग आला होता, मी सुरुवातही केली होती, मात्र ते ज्यांचे होते त्यांना परत द्यावे लागले. मात्र, उल्लेखनीय बाब अशी कि त्यांनीही रामायणावर चमत्काराच्या पलीकडे जाऊन लिखाण केले आहे असे वाटते.

  विस्तारभयाने थांबतो. मात्र, आपण लिहित राहावे, तुमच्या अभ्यासासाठी आणि लेखनासाठी खूप शुभेच्छा !

  ReplyDelete
 4. रामायण-महाभारतावर अनेकांनी ललित-ललितेतर लेखन मराठीत केले आहे. काही थोडे मी वाचलेले आहे व अजूनहि वाचतो. माझे स्वत:चे विचार मी येथे मांडतो. वाचकाना आवडतात याचा आनंद आहे. आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete

Locations of visitors to this page