Tuesday, May 4, 2010

अरण्यकांड - भाग ३

पंचवटीत रामाचे वास्तव्य फारसे झाले नाही. पंचवटीत रहावयास आले तेव्हां शरद ऋतु चालू होता असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर हेमंत व शिशिर हे दोनच ऋतु राम-लक्ष्मण-सीता यांचे पंचवटीत वास्तव्य झाले. रावणाने सीतेचे हरण केले तेव्हां शिशिर संपत आला होता कारण नंतर राम-लक्ष्मण वनात भटकत असताना हा वसंत ऋतु चालू आहे असे राम वारंवार म्हणतो व वसंताच्या शोभेचे वर्णन करतो. पद्मपुराणात सीताहरणाची तिथि माघ व. अष्टमी अशी दिली आहे. हा उल्लेख रामायणाच्या भाषांतरातहि आहे. तेव्हा शिशिर अर्धा संपला होता याला दुजोरा मिळतो.
चित्रकूट व पंचवटी दोन्ही ठिकाणी रामाचे वास्तव्य अल्पकाळच झाले हे स्वच्छ असूनहि चित्रकूटात समजूत आहे कीं रामाचे चित्रकूटात दीर्घकाळ वास्तव्य झाले व महाराष्ट्रात समजूत आहे की पंचवटी हे रामाचे वनवासातील प्रमुख वास्तव्यस्थळ! चित्रकूटापासून पंचवटीपर्यंत रामाचा प्रवास दीर्घकाळ व अज्ञात मार्गाने झाला. अनेक नद्या, विंध्य व सातपुडा ओलांडावे लागले असणार. अजूनहि हा भाग दुर्गम आहे व आदिवासी वसतीचा आहे. या आदिवासी समाजांमध्ये रामाच्या प्रवासमार्ग व वास्तव्याबाबत असलेल्या समजुतींचे संकलन व अभ्यास केला तर कदाचित रामाच्या प्रवासमार्गावर काही प्रकाश पडेल. असा कांही अभ्यास वा संशोधन झाले असल्यास माहीत नाही. या संदर्भात, डॉ. सांकलिया नावाच्या पुरातत्त्ववेत्याच्या मते राम विंध्य ओलांडून दक्षिणेत आलाच नाही व रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच असे वाचलेले स्मरते. याला मुख्य आधार म्हणजे, सालवृक्ष दक्षिण भारतात तुंगभद्रा परिसरात, जेथे किष्किंधा होती असे वर्णनावरून दिसते, तेथे आढळत नाहीत, याउलट, मध्यभारतात, सातपुड्याच्या उत्तरेला मुबलक होते. नेपानगरची न्यूजप्रिंट फॅक्टरी सालाइ झाडांपासून कागद बनवण्यासाठी बांधली गेली. (गेल्या काही वर्षात मात्र या सलाई वृक्षांची वारेमाप तोड झाली आहे.) डॉ. सांकलियांपाशी इतरहि अनेक आधार असतीलच. त्यांचे मत खरे असेल तर मग पंचवटी (गोदावरी तीरी म्हटलेली)व जनस्थान महाराष्ट्रात नव्हे तर कोठे होतीं? खरे खोटे ’राम जाणे!’

No comments:

Post a Comment

Locations of visitors to this page