Wednesday, April 1, 2009

अयोध्याकांड - भाग ३

रामाच्या अभिषेकाची बातमी मंथरेकडून कळल्यावर कैकेयीला प्रथम आनंदच वाटला. त्याअर्थी ती बहुधा भोळी-भाबडी असावी. मात्र मंथरेने तिला फटकारून समजावले कीं ’तूं राणी असून तुला राजधर्मातील उग्रता समजत कशी नाही? तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही? सवतीचा पुत्र हा शत्रू असतो. भरत व राम यांचा राज्यावर सारखाच अधिकार आहे त्यामुळे रामाला भरतापासूनच भय आहे. लक्ष्मण रामभक्त तर शत्रुघ्न शेवटचा त्यामुळे त्याचा राज्यावर मुळीच अधिकार नाही. उत्पत्तिक्रमाने रामापाठोपाठ भरताचाच राज्यावर अधिकार आहे तेव्हा रामाला त्याचेच भय वाटणार आणि त्यामुळे तो तुझ्या पुत्राला क्रूरतापूर्वक वागवील. भरताला त्याची गुलामी करावी लागेल.’
कैकेयीला हे ऐकूनहि धोका कळला नाही व ती पुन्हा भाबडेपणाने मंथरेला म्हणाली ’रामानंतर १०० वर्षांनी कां होईना, भरत राजा होईलच. तूं कशाला संतापतेस? मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते!’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही? रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील! भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार? राम लक्ष्मणावर प्रेम करतो पण भरताचा तो तिरस्कार आणि द्वेष करील. तुं भरताच्या हिताचे रक्षन केले पाहिजे. ज्या कौसल्येचा तूं अनादर करतेस ती राम राजा झाला तर तुझा सूड घेईल.’
या संवादावरून दोघीच्या स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या पूर्वग्रहांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीं. कैकेयी भोळी दिसते तर मंथराही ’अकारण’ रामाचा द्वेष करणारी नसून कैकेयी-भरताचें हितरक्षण हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून तिला जाणवणारा धोका तिने कैकेयीला स्पष्टपणे दाखवून दिला आहे. राजवाड्यातील राजकारणात तिची बाजू कोणती याबाबत तिला संदेह नाही!
आता कैकेयीचे मन पालटले. दशरथाने, पूर्वी एका युद्धप्रसंगात कैकेयीने कौशल्याने व धैर्याने त्याचे सारथ्य करून त्याचा जीव वाचवला तेव्हां तिला वर दिले होते व ते कैकेयीने लगेच न मागतां राखून ठेवले होते. त्या वरांची मंथरेनेच कैकेयीला आठवण करून दिली व ’त्या वरांचा वापर करून, भरताला राज्य व रामाला चौदा वर्षे वनवास मागून घे व भरताला निष्कंटक राज्य मिळवून दे’ असे सुचवले. ’चौदा वर्षांच्या काळात भरत जनतेचे प्रेम मिळवून स्थिर होईल व रामाचा सध्याचा प्रभाव राहणार नाही’ असा दूरदृष्टीचा व रास्त सल्ला तिला दिला. दुर्योधनाने पांडवांना वनवासाला धाडताना हाच हेतु बाळगला होता याची आठवण सहजच होते. सल्ला पटला व कैकेयीचा बेत पक्का झाला. मंथरेची तिने स्तुति केली.
पुढे एका ठिकाणी उल्लेख आहे कीं दशरथाने कैकेयीशी विवाह करताना तिच्या पित्याला वचन दिले होते कीं तिच्या पुत्राला राज्य मिळेल. तोंपर्यंत कौसल्या-सुमित्रेला पुत्र नसल्यामुळे दशरथाने तसे वचन दिले होते. (महाभारतात, सत्यवतीच्या बापाने असे वचन शंतनूपाशी मागितले पण ते शंतनु देऊ शकत नव्हता कारण पुत्र देवव्रत भीष्म वयात आला होता, त्याला कसे डावलणार?) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते! ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते!)
यापुढील कथा पुढील भागात.

2 comments:

  1. मी आपल्या दोन्ही blogs चा नियमित वाचक आहे तसेच मी रामायण व महाभारताचे भाषांतर लहानपणी वाचले आहे . आपल्या सर्वांच्या मनात या सर्व व्यक्तिरेखांच्या काही विशिष्ट प्रतिमा तयार झालेल्या असतात ज्या सामान्यत:black & white अशा असतात. त्यातून बाहेर पडून चिकित्सक दृष्टीने केलेले रामायण व महाभारताचे आपले विश्लेषण फारच सुंदर आहे. असेच लिहित रहा ही सदिच्छा.

    ReplyDelete
  2. आपल्या प्रतिक्रियेबाबत धन्यवाद. रामायण - महाभारत वाचताना मला हेच जाणवले होते. खुद्द मूळ ग्रंथांतच असलेले स्पष्ट उल्लेख लक्ष देऊन वाचले तर आपल्या, तुमच्या वर्णनाप्रमाणे black and white व्यक्तिप्रतिमांना वेगळे वळण लावतात. आपण राम आणि कृष्ण यांना देवाचे अवतार मानायला सुरवात केल्यापासून त्यांचे मनुष्यत्व हरवून गेले व मग ठाम झालेल्या प्रतिमांना प्रतिकूल वा विसंगत उल्लेखांकडे दुर्लक्ष होऊं लागले असे मला वाटते. मी कोणी विद्वान वा व्यासंगी नाही पण कुतूहल कायम ठेवून वाचलें व लिहिलें. आपल्यासारख्या पुष्कळांना, विशेषत: तरुण पिढीला, माझा दृष्टिकोन आवडतो याचा मला आनंद वाटतो.

    ReplyDelete

Locations of visitors to this page