Thursday, February 12, 2009

बालकांड - भाग १०

आता धनुर्भंगाची कथा पाहूं.
दुसर्‍या दिवशी जनकाने पुन्हा विश्वामित्र, राम व लक्ष्मण यांचे दरबारात स्वागत केले. विश्वामित्राने म्हटले कीं या दोघाना तुझे प्रख्यात धनुष्य पहावयाचे आहे. जनकाने धनुष्याचा इतिहास सांगितला कीं हें प्रत्यक्ष शिवाचे धनुष्य आहे व तें माझे पूर्वज देवरात यांना ठेव म्हणून देवांनी दिले तेव्हांपासून ते आमचेपाशी आहे. येथे फक्त एका वाक्यात, यज्ञासाठी भूमिशोधन करताना नांगराने उकरल्या जात असलेल्या जमिनीतून कन्या प्रगत झाली ती सीता, एवढाच सीतेच्या जन्माचा इतिहास जनकाने सांगितला आहे. प्रत्यक्षात, एक तर सीता ही जनकाचीच शेतकरी स्त्रीपासून झालेली कन्या असावी वा शेतांत कोणीतरी ठेवून दिलेली नवजात कन्या जनकाने स्वत:ची कन्या म्हणून वाढवली असावी यांपैकी एखादा तर्क स्वीकारावा लागतो. जनकाला त्या वेळेपर्यंत अपत्य नव्हते. जनकाला पुत्र असल्याचा कोठेच उल्लेख नाही. उर्मिळा ही पण जनकाची कन्या खरी पण ती सीतेपेक्षां लहान असली पाहिजे कारण ती लक्ष्मणाची पत्नी झाली. यामुळे जनकाने सीतेला अपत्यस्नेहापोटी स्वत:ची कन्या मानणे योग्य वाटते. रामायणाचे अनेक पाठभेद जगभर अनेक भाषांतून प्रचलित आहेत. त्यांतल्या एकांत ती रावणाची कन्या होती असाही तर्क केलेला आहे असे वाचलेले आठवते. अशा भरमसाठ तर्कापेक्षा मी वर व्यक्त केलेला तर्क कदाचित जास्त उचित म्हणतां येईल.
जनक पुढे म्हणाला कीं जो आपल्या पराक्रमाने हे शिवधनुष्य सज्ज करील त्यालाच ही माझी कन्या द्यावयाची असा माझा निश्चय आहे. पूर्वी एकदा सीतेच्या प्राप्तीसाठी सर्व राजे एकत्र जमून माझ्याकडे आले व कोणता पण लावला आहे असे त्यानी मला विचारले तेव्हा हाच पण मी त्यांना सांगितला. कोणालाही हे धनुष्य उचलता आले नाही. अपयशामुले रागावून त्या सर्वांनी माझ्याविरुद्ध युद्ध पुकारले व एक वर्षभर त्यांनी मिथिलेला वेढा घातला. शेवटीं मी देवांची प्रार्थना केली व त्यांनी प्रसन्न होहून मला चतुरंग सेना दिली व मग मी सर्व राजांना हरवून पिटाळून लावले. ( सीतेच्या प्राप्तीसाठी रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता व त्यांत तो धनुष्य उरावर घेऊन उताणा पडला अशी एक हरदासी कथा आहे मात्र तिला रामायणात कोणताही आधार नाही!) आता रामाने हे धनुष्य सज्ज केले तर मी ही माझी कन्या त्याला देईन असे जनक अखेरीस म्हणाला. ( राम यावेळी जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता फारतर १३-१४ वर्षांची असेल. तेव्हां यापूर्वीच काही काळ अनेक राजांनी तिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला हे जरासे अविश्वसनीयच वाटते!)
या सर्व प्रसंगात सीता अजिबात उपस्थित नाही. तिने रामाला अद्याप पाहिलेलेहि नाही. स्वयंवर वगैरे काही समारंभ योजलेलाच नव्हता. विश्वामित्र व राम-लक्ष्मण अचानक व अनाहूतच आलेले होते. मग ’लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले? हे गाणे लिहिणाराने सीता व द्रौपदी या दोघींच्यात मोठी गफलत केलेली दिसते!
धनुष्य राजा जनक विश्वामित्र राम व लक्ष्मण यांचेसमोर आले. संदूक उघडून रामाने ते सहजच उचलले व त्याला प्रत्यंचा लावली. त्यावर बाण न ठेवतांच त्याने ते खेचले तो तें तुटलेच.! धनुष्य कां तुटले असेल? यापूर्वी वेळोवेळी युद्धात ते त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत अनेकवार खेचले गेले असणार त्यामुळे त्याचे engineering शास्त्राप्रमाणे ’work hardening’ झाले असेल. त्यामुळे रामाने ते झटक्याने खेचले तेव्हा ते तुटले. रामाने धनुष्य सज्ज केले त्यामुळे जनकाने प्रतिज्ञेप्रमाणे सीता रामाला अर्पण केल्याचे जाहीर केले. विश्वामित्राच्या संमतीने लगेच जनकाने आपले मंत्री दशरथाकडे पाठवून, सर्व हकीगत कळवून विवाहासाठी सर्वांनी येण्याचे आमंत्रण केले. एवढेच सीता स्वयंवर! प्रत्यक्षात सीतेला कोणी कांही विचारलेच नाही! तेव्हा या प्रकाराला स्वयंवर कां म्हणावे हा प्रश्नच आहे!

1 comment:

  1. ’लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा’ कोठून आले? हे गाणे लिहिणाराने सीता व द्रौपदी या दोघींच्यात मोठी गफलत केलेली दिसते!
    ithe asaha tika nakot.... karan kal wel aand garaj ya sarwanurup sahityanirmiti hote....

    ReplyDelete

Locations of visitors to this page