विजयादशमीला रावणवध झाला अशी समजूत आहे. उत्तरभारतात विजयादशमीला रामलीला व रावणवधाची दृश्ये दाखवली जातात. पण खुद्द रामायणातील वर्णनांवरून अशा समजुतीला मुळीच आधार दिसत नाही. हनुमान व सीता यांची भेट मार्गशीर्ष शु. नवमीला झाली असा उल्लेख आहे. त्यानंतर वानरसैन्य समुद्र ओलांडून लंकेत पोचले, आणि युद्ध उभे राहिले. प्रमुख युद्धप्रसंगांच्या भाषांतरकारांनी ज्या तिथि दिल्या आहेत त्याप्रमाणे फाल्गुन वद्य ३० पर्यंत कुंभकर्ण, इंद्रजित वगैरे सर्व प्रमुख वीरांचा वध होऊन रावण स्वत: युद्धाला आला असे म्हटले आहे. तेथून पुढे रावणवधापर्यंत आश्विन शु. दशमी म्हणजे विजयादशमी खासच उजाडली नव्हती. रावणवध विजयादशमीला नव्हे तर चैत्राच्या पहिल्या १०-१२ दिवसांतच झाला असला पाहिजे. रावणवधानंतर राम लगेच अयोध्येला परत गेला. रामाचा वनवास चैत्रांत सुरू झाला होता तेव्हां तो चैत्रांत संपला हे सयुक्तिकच आहे. रावणवध व विजयादशमी यांची सांगड कां घातली जाते याचा मात्र उलगडा होत नाहीं.
(विजयादशमीला अर्जुनाने शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून कौरवांशी सामना केला अशीहि एक समजूत आहे, तीहि सपशेल चुकीची आहे कारण कौरवांचा विराटावरील हल्ला झाला व अर्जुनाने त्यांचा सामना केला तेव्हां ’हा ग्रीष्म चालू आहे’ असा स्पष्ट उल्लेख भीष्माचे तोंडी आहे!)
राम मारीचाला मारून घाईघाईने कुटीकडे परत येत असताना वाटेतच लक्ष्मण भेटला. सीतेला एकटी सोडून आपल्या मदतीला आल्याबद्दल रामाने लक्ष्मणालाच दोष दिला. दोघे कुटीकडे परत आले तर सीता दिसेना. दोघे भयभीत झाले. रामतर वेडापिसाच झाला. त्याच्या शोकाचे व संतापाचे सुंदर वर्णन रामायणात आहे. लक्ष्मणाने त्याला कसेबसे समजावले व दोघांनी सीतेचा शोध सुरू केला. काही वेळाने रावण-जटायु संग्रामस्थळापाशी आले. तेथील रक्तपात पाहून रामाने समजूत करून घेतली कीं सीतेला बहुधा राक्षसांनी खाल्ले. लक्ष्मणाने पुन्हा समजावले कीं येथे दिसणार्या खुणांवरून येथे एका वीराचे व एका रथीचे युद्ध झाले आहे. रथ मोडून पडला आहे, गाढवे मरून पडलीं आहेत सारथी मेला आहे व छत्र मोडले आहे. जवळपास शोधल्यावर आसन्नमरण जटायु दिसला. त्याने खेद व्यक्त केला कीं मी रावणाला थोपवूं शकलों नाहीं, तो सीतेला घेऊन गेला. दु:ख बाजूला ठेवून राम-लक्ष्मणांनी जटायूचे दहन केले. रावण सीतेला घेऊन लंकेला गेला एवढे कळले पण लंका कोठे आहे हे रामाला माहीत नव्हते. काय करावे सुचेना.
Monday, June 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
काका, अतिशय सुरेख आणि ओघवते लिखाण
ReplyDelete