Thursday, June 3, 2010
अरण्यकांड - भाग ९
सीतेच्या मागणीवरून राम हरणाच्या मागे गेला तेव्हां सीतेच्या रक्षणाचे काम त्याने लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोंपवले होते. पण जटायु जवळपास नव्हताच. लक्ष्मणानेहि रामाच्या मदतीला जाण्याआधी ’आपण त्यासाठी जटायुला पाठवूं’ असें सीतेला सुचवले नाहीं. सीतेने तें मानले नसतेच हे वेगळे. लक्ष्मणाने जाताना जटायूला ’तूं सावध रहा’ असेहि सुचवले नाहीं. कारण तो जवळ नव्हताच. रावणाने सीतेला उचलल्यावर तिचा विलाप झाडावर झोपलेल्या वृद्ध जटायूच्या कानीं पडला व तो खडबडून जागा झाला असें रामायण म्हणते. जटायूने स्वत:च ’मी तुमच्या आश्रयाने राहीन व सीतेच्या रक्षणात मदत करीन’ असे रामाला म्हटले होते. तेव्हां तो जवळपास पण स्वतंत्रच राहत असणार. सीतेने विलाप करतानाहि त्याला हाका मारल्या नव्हत्या. तो सरसावून आल्यावरहि ’तुला रावणाशी लढणे जमणार नाही, तूं फक्त घडालेली हकीगत रामाला सांग’ असे सीता त्याला म्हणाली. कारण तो वृद्ध होता. मात्र त्याने रावणाबरोबर निकराची झुंज दिली तीहि इतकी प्रखर कीं त्याने रावणाचा सारथी मारला, रथाला जोडलेलीं गाढवें मारलीं व रथाचाहि पूर्ण विध्वंस केला. रावणालाहि फार जखमी केले. मात्र त्याचे बळ अखेर कमी पडून प्राणांतिक जखमा होऊन तो पडला. सीतेने पुन्हा जोराने विलाप केला, हेतु हा कीं जवळपास कोणी असेल तर त्याला ऐकूं जावें. रावणाचा रथ वा विमान पूर्ण नष्ट झाले होते. मात्र तरीहि रावण सीतेला घेऊन आकाशमार्गाने लंकेला गेला असें रामायण म्हणते, हे आकाशमार्गाने जाणे म्हणजे काय याचा कांही उलगडा मला सुचलेला नाहीं. वाटेतील एका पर्वतावर काही वानर बसलेले (हनुमान, सुग्रीव वगैरे) सीतेला दिसले. त्यानाहि रावण सीतेला घेऊन चाललेला दिसला पण त्यांची रावणाशीं गाठ पडली नाहीं तेव्हां ते बसलेल्या शिखरापेक्षां उंचावरून जाणार्या वाटेने रावण गेला असे म्हणावे लागते. रावण घेऊन जात असताना सीतेने त्याची परोपरीने निर्भर्त्सना केली व ’तुझा मृत्यु अटळ आहे’ असें बजावले. सीतेने वस्त्रांत गुंडाललेले काही दागिने वानरांकडे टाकले हें रावणाच्या लक्षात आले नाही कारण त्याने ते थांबवले नाहीं. अखेर रावण सीतेला घेऊन लंकेला पोचला व सरळ अंत:पुरांत जाऊन सीतेला तेथे ठेवून पहारेकरणींना ताकीद दिली कीं ’तिला पाहिजे असेल तें द्या आणि त्रास देऊं नका. वैदेहीला अप्रिय लागेल असें बोलणार्या व्यक्तीला आपला जीव प्यारा नाही असे मी समजेन’ रावणाबद्दल आपल्या कल्पनांशी हें सुसंगत नाहीं पण रामायणच हे म्हणते! सीताहरण माघ व. अष्टमीला झाले असे पद्मपुराणात म्हटले आहे. मात्र रावण कोणत्या तिथीला लंकेला पोंचला ते सांगितलेले नाही त्यामुळे प्रवासात किती काल गेला ते कळत नाहीं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment