Monday, June 7, 2010

अरण्यकांड भाग १०

सीतेची व्यवस्था लावून रावण लगेच आपल्या सहाय्यकांना भेटला व खराच्या सैन्याचा नाश झाल्याचे सांगून त्यांना म्हणाला कीं तुम्ही जनस्थानाला जा. रामाने खराला मारल्यामुळे मला फार राग आला आहे व रामाला मारूनच तो शांत होईल. जनस्थानात राहून रामाची खबर तुम्ही मला कळवा. सीतेला पळवून आणल्याचे मात्र त्याना सांगितले नाही. रामाशी युद्ध आता अटळ आहे हे रावणाने जाणले होते व तो तयारीला लागला होता.
रावणाने लंकेचे वैभव सीतेला अनेक प्रकारे ऐकवले व राम लंकेला येऊच शकणार नाही तेव्हां तूं आतां मला वश हो असे विनवले. सीतेने त्याला साफ झिडकारले. रावणाने अखेर तिला अशोकवनात ’राक्षसिणींच्या’ पहार्‍यात ठेवले. त्याना आज्ञा दिली कीं तिला भीति घाला, मग गोड बोला, काही करून तिचा अहंकार दूर करा व तिला वश करा. कोणत्याही मार्गाने सीता वश होत नाही हे दिसून आल्यावर त्याने अखेर सीतेला एक वर्षाची मुदत दिली व त्यानंतरहि ऐकले नाहीस तर खाऊन टाकीन असा धाक घातला.
रावणाने सीतेला एक वर्षाची दीर्घ मुदत दिली होती हा एक महत्वाचा उल्लेख आहे. त्यावरून रावणाचा खरा हेतु स्पष्ट होतो. राम सीतेला सोडवण्याचा निकराचा प्रयत्न करील हे उघड होते, मात्र तो अयोध्येच्या वा इतर कोणाच्याही मदतीने लंकेवर चाल करूं शकला तर होणारे युद्ध लंकेत, म्हणजे रावणाला अनुकूल अशा भूमीवर झाले असते. त्याला सीता हवी होती असे मला मुळीच वाटत नाही. तसे असते तर एक वर्ष थांबण्याची गरज नव्हती, ती हातांत आलीच होती! त्याचे ’कपटी, कामी, लंपट, राक्षस’ हे वर्णन निव्वळ तो रामाचा शत्रु म्हणून केलेले आहे. जनस्थानाऐवजी रामाबरोबरचे निर्णायक युद्ध त्याला लंकेत हवे होते हा त्याचा सीतेला पळवून आणण्यामागील खरा हेतु होता असे माझे मत आहे. प्रत्यक्षात राम लकेत पोचून युद्ध होईपर्यंत एक वर्षाहूनहि जास्त काळ गेला. सीताहरण माघ व. अष्टमीस झाले, हनुमान पुढील वर्षाच्या मार्गशीर्षात लंकेस पोचला व त्यानंतर राम ससैन्य लंकेस पोचून युद्ध होऊन फाल्गुन-अखेर / चैत्राच्या सुरवातीला रावणवध झाला (विजयादशमीला मुळीच नाहीं!). मात्र वर्ष संपले तरी रावणाने सीतेवर अत्याचार केला नाही यावरून त्याचा हेतु राजकीय व युद्धाच्या डावपेचांचा भाग होता हे उघड आहे.

3 comments:

  1. फडणीस काका,
    युद्ध नेहमीच परकीय भूमीवर करावे. स्वतःच्या भूमीवर करू नये हा युद्धशास्त्रातील महत्त्वाचा नियम महाभारतात बरेचदा उल्लेखलेला आहे त्याअर्थी तो अगोदरच्या रामायणातही प्रचलित असणारच. पण रावणाने यास अपवाद का केलेला असावा? आणि अर्थातच या त्याच्या चुकीमुळेच रामालाही (वानर)सैन्य जमवण्यास पुरेसा वेळ मिळून व पूर्ण शक्तीशाली बनून रावणाचा नाश करता आला असावा.

    ReplyDelete
  2. पौराणिक काळातली युद्धे विध्वंसक नसत, म्हणजे मुलुखाची हानि करणारीं नसत. त्यामुळे दुसर्‍याच्या भूमीवर युद्ध करणे विशेष फायद्याचे नव्हते. लंकेमध्ये रावणाचे सर्व बळ एकवटले होते तेव्हां राम चालून आला तरी संख्याबळ रावणाला अनुकूल राहण्याची शक्यताच जास्त होती. रामाला वानरांचे एवढे मोठे सैन्य मदतीला येईल अशी त्याची कल्पना नसावी. रावणाचे व वानरांचे पूर्वीचे मोठे संघर्ष नव्हते. स्वत:ला अनुकूल अशा भूमीवर युद्ध ओढून आणण्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे शिवाजी-अफझलखान युद्ध किंवा नेपोलिअन-रशिया युद्ध होय.
    युद्ध परकीय भूमीवरच करावे असा महाभारतात कोठे उल्लेख आहे तो कृपया कळवावा. माझा ई-मेल पत्ता pkphadnis@yahoo.com असा आहे त्याचा वापर करण्यास हरकत नाही>

    ReplyDelete
  3. नमस्कार प्रभाकरराव,

    आपली ही अनुदिनी (ब्लॉग) अप्रतिम आहे. आपली वरील प्रतिक्रिया वाचून एक गोष्ट फक्त आपल्या नजरेस आणून द्यावीशी वाटली. ती म्हणजे रावणाचे वानरांसोबत किमान एक युद्ध झाले होते. वानरराज वालीने रावणाला पार पराभूत केले होते. पण रावणाने त्याच्याशीच तह केला. त्यामुळे सीतेने वानारांकडे फेकलेल्या दागिन्यांची रावणाला फारशी चिंता पडली नसावी. अधिक माहीतीसाठी प्रा. लीना रसतोगी यांचा इथला लेख (तरुण भारत २३ मार्च २०१३ पान ५) कृपया पहावा :
    http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012/2012-03-23/mpage5_20120323.htm

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete

Locations of visitors to this page