सुमंत्र रथात राम-लक्ष्मण-सीता यांना घालून निघाला तो संध्याकाळी तमसातीरावर पोंचला. पाठोपाठ आलेल्या नगरवासीयांचा रामाला परत येण्याचा आग्रह चालूच होता. पहाटे रामाने सुमंत्राला एकट्याला रथ घेऊन उत्तर दिशेला पाठवले व काही वेळाने दुसर्या वाटेने परत येण्यास सांगितले. प्रजाजनांचा गैरसमज होऊन ते रथामागोमाग गेले व रथ परत आल्यावर त्यांत बसून राम, लक्ष्मण, सीता दक्षिण दिशेला वनाकडे निघाले. दुसर्या रात्रीपर्यंत रथ गंगातीराला पोंचला. गुहकाची भेट होऊन पुढील दिवशीं त्याने रामाला गंगापार केले. सुमंत्राची रथासह रामाबरोबर राहण्याची इच्छा होती पण ’तूं परत गेल्याशिवाय कैकेयीची खात्री पटणार नाही’ असे समजावून रामाने त्याला गंगातीरावरूनच परत पाठवले. आतां तिघेंच वनांत राहिलीं. या वेळी प्रथमच रामाने कैकेयीबद्दल कडवट शब्द उचारले व ’कैकेयी तुझ्या-माझ्या मातेला विषही देईल’ अशी भीति लक्ष्मणापाशी व्यक्त केली. लक्ष्मणाने त्याला समजावले.
रामाने गंगा कोठे ओलांडली? गंगा ओलांडून तो गंगा-यमुनांच्या संगमाजवळ भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोचला असे म्हटले आहे. तेव्हा हा आश्रम (प्रयाग)अलाहाबादजवळ संगमापाशी यमुनेच्या उत्तरेला असला पाहिजे कारण यमुना ओलांडलेली नव्हती. आश्रम संगमाजवळ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. भरद्वाजांनी स्वागत करून येथेच रहा असे म्हटले पण हा प्रदेश अयोध्येच्या जवळच तेव्हां तें न मानतां भरद्वाजांच्याच सल्ल्याने तेथून दहा कोस अंतरावर चित्रकूट पर्वतावर जाण्याचे ठरले. दुसरे दिवशी भरद्वाजानी चित्रकूटाला जाण्याचा मार्ग समजावून सांगितला त्यांत यमुना ओलांडण्यास सांगितले. त्यावरून चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला पण जवळपासच होता असा समज होतो. येथपर्यंत रामाचा प्रवासमार्ग रामायणावरून बराचसा कळतो. यांनंतरचे प्रवासवर्णन भौगोलिक दृष्ट्या धूसरच आहे. यमुना ओलांडण्यासाठी सुकलेल्या बांबूंची नौका वा तराफा लक्ष्मणाने बनवला. त्या रात्री यमुनेच्या तीरावर राहून दुसर्या दिवशी चित्रकूटाला पोचले. तेथे वाल्मिकीचा आश्रम होता. त्याचे जवळच लक्ष्मणाने कुटी बनवली. येवढ्या प्रवासामध्ये ४-५ दिवस गेले. भरत येऊन भेटेपर्यंत राम येथेच राहिला. चित्रकूट प्रयागपासून जवळच असावा अशी समजूत होते. त्याबद्दल प्रत्यक्ष परिस्थिती पुढे पाहूं.
Tuesday, May 12, 2009
Wednesday, April 15, 2009
अयोध्याकांड - भाग ५
सर्व रात्र कैकेयीच्या विनवण्या करण्यात गेली पण कैकेयीने आपल्या मागण्या मागे घेतल्या नाहीत. संपूर्ण नाइलाज झाल्यामुळे रात्र संपल्यावर दशरथाने रामाला बोलावण्याचे ठरवले. सुमंत्र आल्यावर कैकेयीनेच त्याला पाठवून रामाला बोलावून घेतले. तो आल्यावर दशरथाला काहीच बोलवेना तेव्हां कैकेयीनेच रामाला सांगितले कीं ’ते तुला स्वत: सांगणार नाहीत पण तू ताबडतोब १४ वर्षांसाठी वनात जायचे आहेस व राज्य भरताला मिळायचे आहे.’ रामाने ताबडतोब मान्य केले व म्हटले ’मी तुझ्या आज्ञेनेच सर्वस्व त्यागीन मग राजाला कशाला त्रास दिलास?’ कैकेयीने त्यावर म्हटले कीं ’तूं खुषीने राज्य सोडून वनात गेल्याशिवाय महाराज स्नान वा भोजन करणार नाहीत.’
यापुढील प्रसंग आपणाला परिचित आहेत. सीता व लक्ष्मण रामाबरोबर वनात जाण्याचा आग्रह धरतात व राम तें मान्य करतो. कौसल्या व सुमित्रा विलाप करतात. उर्मिळेचा अजिबात उल्लेख कोठेच नाही! कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले! भरत-शत्रुघ्नांच्या बायका यावेळी नवर्यांबरोबर कैकय देशालाच असणार.
सुमंत्राने कैकेयीला समजावले कीं ’भरत राजा झाला तर आम्ही सर्व रामाकडे वनात जाऊं’ कैकेयीवर परिणाम शून्य. (सुमंत्र खरेतर राजाचा व राज्याचा सेवक, त्याला नवीन राजा भरत याची सेवा करणे हेच उचित!) दशरथाने सुमंत्राला म्हटले ’रामाबरोबर मोठी सेना व धनवैभव पाठवा.’ कैकेयीने ठाम विरोध केला. सुने सुने वैभवहीन राज्य तिला भरतासाठी नको होते. तिने आग्रह धरला कीं ’पूर्वी इक्ष्वाकु घराण्यातील असमंज नावाच्या राजपुत्राला दुर्गुणी निघाल्यामुळे राज्याबाहेर घालवून दिले होते तसे रामाला घालवा.’
’ही तुझी मूळची अट नव्हती’ असे दशरथ म्हणाला पण कैकेयीने तेहि मानले नाही. तिने राम व असमंज यांना एकाच पायरीला बसवले याचा वसिष्ठासकट सर्वांनाच फार राग आला. सीतेने वल्कले नेसण्याची वेळ आली तेव्हा मात्र वसिष्ठाने व दशरथाने ठाम विरोध केला. दशरथ म्हणाला कीं ’सीता माझ्या आज्ञेमुळे नव्हे तर स्वखुषीने वनात जाते आहे. तेव्हां ती सर्व वस्त्रालंकारांसकटच वनात जाईल’. (सीतेला रामाने वल्कले नेसावयास शिकविले अशी एक थाप आपले हरदास-पुराणिक मारतात, त्यांत तथ्य नाहीं!) लक्ष्मणाने वल्कले नेसल्य़ाचा उल्लेख नाही. आपल्या आईला संभाळण्याची पित्याला विनंति करून राम वनांत जाण्यास निघाला. दशरथाने सुमंत्राला त्या तिघांना वनांत सोडून येण्यास सांगितले.
या सर्व प्रसंगांत, एकदां मंथरेचा सल्ला पटल्यावर, कैकेयीने दाखवलेला मनाचा खंबीरपणा लक्षणीय आहे.

Wednesday, April 8, 2009
अयोध्याकांड - भाग ४
कैकेयीने भरताला राज्य व रामाला वनवास मागण्याचे ठरवले. इकडे अभिषेकाची तयारी करण्यास सांगून दिवस संपल्यामुळे दशरथ नेहेमीप्रमाणे कैकेयीच्या महालीं आला. रामायण म्हणते कीं राजा म्हातारा असल्यामुळे त्याला तरुण कैकेयी फार प्रिय होती! कैकेयी बेताप्रमाने रुसून बसलेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ’काय हवे ते माग’ असे दशरथ म्हणाला. पूर्वी दिलेल्या वरांची आठवण देऊन कैकेयीने भरताला राज्य व रामाला १४ वर्षे वनवास, व तोही ताबडतोब, अशा मागण्या केल्या. भरताला राज्य देण्याचे दशरथाने ताबडतोब व बेलाशक मान्य केले! कैकेयीच्या पित्याला दिलेले वचन त्याच्या स्मरणात असणारच! तेव्हां ठरवल्या बेताप्रमाणे ते डावलता येत नाही असे दिसल्यावर त्याने रामाला बाजूस सारण्याचे लगेच मान्य केले. मात्र रामाबद्दल कोणतीही तक्रार नसताना वा त्याचा काही अपराध नसताना त्याला वनवासाला पाठवणे त्याने मान्य केले नाही. त्याने अनेक युक्तिवाद केले, कैकेयीच्या विनवण्या केल्या पण कैकेयीला मंथरेने दाखवून दिलेला धोका पक्का पटला होता. ती ठाम राहिली. दशरथाचे युक्तिवाद असे –
१. रामाशिवाय भरत राज्य स्वीकारणारच नाही.
२. जमलेल्या राजे लोकांना, मंत्र्यांना, जनतेला कसे सांगूं कीं कैकेयीच्या दबावामुळे मी रामाला वनवासाला पाठवतो आहे?
३. कौसल्या, सुमित्रा, सीता सर्व दु:खित होतील. मी जिवंत राहणार नाही.
४. तुला वरताना मला कळले नाहीं कीं तूंच माझ्या मृत्यूला कारण होशील.
५. रामाने वनवासाला जाण्याची आज्ञा मानली नाही तर मला आनंदच होईल पण तसे होणार नाही.
६. रामाला राज्य देण्याची घोषणा मी भर राज्यसभेत केली आहे ती कशी मोडूं?
कैकेयीने फक्त येवढेच म्हटले कीं ’तुम्ही मोठे सत्यवादी व दृढप्रतिज्ञ म्हणवता मग मी मागत असलेले वर कां देत नाही?’ रामाला वनवासाला पाठवण्याचे कारण कैकेयीने सांगितले नाही पण दशरथानेहि विचारले नाही! त्याला ते कळलेच असणार. त्याबद्दल कैकेयीचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्नहि दशरथाने केला नाही. दशरथ काकुळतीला येऊन ’मी तुझे पाय धरतों’ असेहि म्हणाला पण अखेर कैकेयीने म्हटले कीं ’सत्याचे अनुकरण करा. मी माझे मागणे त्रिवार मागत आहे आणि ते मानले नाही तर मी प्राणत्याग करीन’ बोलणेच खुंटल्यामुळे दशरथाने अखेर त्राग्याने म्हटले कीं ’विवाहाचे वेळी धरलेला तुझा हात मी सोडून देतो आहे. तूं माझी कोणी नव्हेस. तूं वा भरत मला तिलांजलिही देऊं नका!’
दशरथ येवढ्या टोकाला जाऊन कठोर बोलल्यावरही कैकेयीने आपली मागणी सोडली नाही.

Wednesday, April 1, 2009
अयोध्याकांड - भाग ३
रामाच्या अभिषेकाची बातमी मंथरेकडून कळल्यावर कैकेयीला प्रथम आनंदच वाटला. त्याअर्थी ती बहुधा भोळी-भाबडी असावी. मात्र मंथरेने तिला फटकारून समजावले कीं ’तूं राणी असून तुला राजधर्मातील उग्रता समजत कशी नाही? तुझा पति समाधानासाठी तुझ्याकडे येतो पण आता कौसल्येचे हित करतो आहे. तुला कळत कसे नाही? सवतीचा पुत्र हा शत्रू असतो. भरत व राम यांचा राज्यावर सारखाच अधिकार आहे त्यामुळे रामाला भरतापासूनच भय आहे. लक्ष्मण रामभक्त तर शत्रुघ्न शेवटचा त्यामुळे त्याचा राज्यावर मुळीच अधिकार नाही. उत्पत्तिक्रमाने रामापाठोपाठ भरताचाच राज्यावर अधिकार आहे तेव्हा रामाला त्याचेच भय वाटणार आणि त्यामुळे तो तुझ्या पुत्राला क्रूरतापूर्वक वागवील. भरताला त्याची गुलामी करावी लागेल.’
कैकेयीला हे ऐकूनहि धोका कळला नाही व ती पुन्हा भाबडेपणाने मंथरेला म्हणाली ’रामानंतर १०० वर्षांनी कां होईना, भरत राजा होईलच. तूं कशाला संतापतेस? मला भरताइतकाच रामहि प्रिय आहे. रामाला राज्य मिळणार म्हणजे भरतालाच मिळाल्यासारखे मला वाटते!’ मंथरेने तिला पुन्हा समजाविले कीं ’मूर्खे, रामानंतर त्याचा पुत्रच राजा होईल आणि भरत कायमचाच बाजूला पडेल. तुला काहीच कसे कळत नाही? रामाला राज्य मिळाले तर तो भरताला बाहेरच घालवील! भरताला तू दीर्घकाळ आजोळी राहूं दिलेस त्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे. तो येथेच असता तर राजाला त्याचेहि रामासारखेच प्रेम वाटले असते व त्याला अर्धे राज्य तरी मिळाले असते. शत्रुघ्नहि येथे नाही मग भरताचे हितरक्षण तुझ्याशिवाय कोण करणार? राम लक्ष्मणावर प्रेम करतो पण भरताचा तो तिरस्कार आणि द्वेष करील. तुं भरताच्या हिताचे रक्षन केले पाहिजे. ज्या कौसल्येचा तूं अनादर करतेस ती राम राजा झाला तर तुझा सूड घेईल.’
या संवादावरून दोघीच्या स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या पूर्वग्रहांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीं. कैकेयी भोळी दिसते तर मंथराही ’अकारण’ रामाचा द्वेष करणारी नसून कैकेयी-भरताचें हितरक्षण हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून तिला जाणवणारा धोका तिने कैकेयीला स्पष्टपणे दाखवून दिला आहे. राजवाड्यातील राजकारणात तिची बाजू कोणती याबाबत तिला संदेह नाही!
आता कैकेयीचे मन पालटले. दशरथाने, पूर्वी एका युद्धप्रसंगात कैकेयीने कौशल्याने व धैर्याने त्याचे सारथ्य करून त्याचा जीव वाचवला तेव्हां तिला वर दिले होते व ते कैकेयीने लगेच न मागतां राखून ठेवले होते. त्या वरांची मंथरेनेच कैकेयीला आठवण करून दिली व ’त्या वरांचा वापर करून, भरताला राज्य व रामाला चौदा वर्षे वनवास मागून घे व भरताला निष्कंटक राज्य मिळवून दे’ असे सुचवले. ’चौदा वर्षांच्या काळात भरत जनतेचे प्रेम मिळवून स्थिर होईल व रामाचा सध्याचा प्रभाव राहणार नाही’ असा दूरदृष्टीचा व रास्त सल्ला तिला दिला. दुर्योधनाने पांडवांना वनवासाला धाडताना हाच हेतु बाळगला होता याची आठवण सहजच होते. सल्ला पटला व कैकेयीचा बेत पक्का झाला. मंथरेची तिने स्तुति केली.
पुढे एका ठिकाणी उल्लेख आहे कीं दशरथाने कैकेयीशी विवाह करताना तिच्या पित्याला वचन दिले होते कीं तिच्या पुत्राला राज्य मिळेल. तोंपर्यंत कौसल्या-सुमित्रेला पुत्र नसल्यामुळे दशरथाने तसे वचन दिले होते. (महाभारतात, सत्यवतीच्या बापाने असे वचन शंतनूपाशी मागितले पण ते शंतनु देऊ शकत नव्हता कारण पुत्र देवव्रत भीष्म वयात आला होता, त्याला कसे डावलणार?) या वचनाची मंथरा वा कैकेयी दोघींनाहि माहिती नसावी कारण याप्रसंगी तसा काही उल्लेख नाही. भरताला राज्य देण्याचे वचन खरे तर जुनेच होते आणि वरांचा वापर करण्याची गरजच नव्हती. पण दशरथानेच आपले वचन पाळले नव्हते! ( रघुकुलकी रीत, जान जाय परि वचन न जाय हे खरे ठरले नव्हते!)
यापुढील कथा पुढील भागात.

Tuesday, March 17, 2009
अयोध्याकांड - भाग २
दशरथाने भरवलेल्या सभेत आपला विचार बोलून दाखवला. ’मी उद्याच रामाला युवराजपदावर नियुक्त करूं इच्छितों’ असे म्हटले. या विचाराला संमति न देण्यासारखे काही कारणच नसल्यामुळे सर्वांनी संमति दिली. दशरथाने लगेच रामाला बोलावून घेऊन त्याला सांगितले कीं ’हा चैत्र महिना आहे, उद्याच पुष्य नक्षत्रावर युवराजपद ग्रहण कर’. तिथीचा उल्लेख त्याने केलेला नाही. कौसल्येलाही हा बेत कळवण्यात आला. दशरथाने पुन्हा रामाला बोलावून व एकांतात भेटून म्हटले कीं ’नक्षत्रे, ग्रह मला प्रतिकूल आहेत व माझ्या मृत्यूची शक्यता आहे. मला मोह होत नाही तोवरच तुला अभिषेक करून घे कारण मनुष्याची बुद्धि चंचल असते.’ पुन्हा आणखी असेहि म्हटले कीं ’जोवर भरत नगराबाहेर मामाकडे आहे तोवरच तुझा अभिषेक होणे मला उचित वाटते. भरत सत्पुरुष आहे पण माणसाचे मन नेहमीच स्थिर असत नाही.’ यावर रामानेहि दशरथाला खोडून काढून भरतावर दृढ विश्वास व्यक्त केला नाही! असा संशय येतो कीं दोघांच्याही मनात भरताबद्दल वा ठरवलेल्या बेताबद्दल काही आशंका असावी.
बेत कळल्यावर साहजिकच कौसल्या, सुमित्रा व खुद्द राम यांच्या महालात आनंदाचे वातावरण पसरले. दशरथाच्या आज्ञेवरून वसिष्ठ रामाकडे येऊन त्याने रामाला व्रतस्थ राहण्यास सांगितले. जनतेतहि बातमी पसरून शहरात आनंदोत्सव सुरू झाला. कैकेयीला याबद्दल कोणीच कळवलेले नव्हते. शहरातल्या आनंदोत्सवावरून प्रथम मंथरेला अभिषेकाचा बेत कळला व ती उद्विग्न झाली. मंथरा कोण होती? ती कैकेयीची माहेराहून आलेली, वयाने मोठी असलेली, खास दासी होती. तिने साहजिकच कित्येक वर्षे अयोध्येत काढली होतीं. कैकेयीची ती अयोध्येतील (खुद्द दशरथ सोडून) एकुलली एक हितचिंतक होती. ती कुरूप होती असे अतिशयोक्त वर्णन केलेले आहे. पण ती मूर्ख किंवा दुष्ट खासच नव्हती! बातमी कळल्यावर ती उद्विग्न व क्रुद्ध झाली. येणार्या संकटाची यथोचित जाणीव तिने लगेचच कैकेयीला करून दिली. कैकेयी व मंथरा यांच्या संवादावरून दोघींच्याही स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या मनातल्या ठाम समजुतींना धक्का बसतो. त्याबद्दल सविस्तर पुढील भागात.

Saturday, March 14, 2009
अयोध्याकांड - भाग १
रामायणाच्या बालकांडातील कथाभागाबद्दल अद्यापपर्यंत लिहून झाले. या लेखापासून आता अयोध्याकांडाचा परामर्ष घ्यावयाचा आहे. बालकांडाचे अखेरीस, राम, त्याचे बंधू, त्यांच्या नवीन वधू व सर्व कुटूंब अयोध्येला परत आले व लगेचच भरत व शत्रुघ्न केकय देशाला गेले असे म्हटले आहे. अयोध्याकाडाचा कथाभाग येथून पुढे सुरू होतो. मध्यंतरी किती काळ गेला याचा स्पष्ट उल्लेख रामायणात नाही. ७-८ वर्षे तरी गेलीं असावीं असा तर्क करावा लागतो. या तर्काला आधार, पुढे एका ठिकाणी कौसल्येच्या तोंडी आलेला एक उल्लेख व नंतर अरण्यकांडात सीताहरण प्रसंगी रावण व सीता यांच्यातील संवाद हे आहेत. त्याबद्दल त्या त्या प्रसंगी पुन्हा खुलासा करणार आहे. भरत-शत्रुघ्न केकय देशाहून दीर्घकाळ परत आले नाहीत. स्पष्ट उल्लेख नसला तरी केव्हातरी त्यांच्या बायकांचीहि रवानगी तिकडे झाली असावी. हे दोघे केकय देशाला एवढा दीर्घकाळ कां राहिले असावे याचे काहीहि कारण रामायणात मिळत नाही.
राज्यकारभार संभाळण्याचा कंटाळा येऊन, आपण जिवंत असतानाच राम सत्तेवर यावा असे दशरथाला वाटू लागले व त्याने मंत्र्यांबरोबर सल्लामसलत करून रामाला युवराज बनवण्याचा निश्चय केला. वेगवेगळ्या देशांतील पुरुष व राजे यांना विचारविनिमयासाठी आमंत्रित केले. मात्र, घाईमुळे राजा जनकाला व केकयराजाला बोलावले नाहीं. अशी कोणती घाई होती बरें? कैकय्रराज्य बहुधा दूर असावे पण जनक तर जवळच होता. मग दोघांना कां टाळले? हें एक शंकास्थळ आहे. योजलेल्या बेतात विघ्न येण्याची तर दशरथाला शंका नव्हती ना? कोणाकडून विघ्न येणार होते? पुढील भागांत याचा विचार करूं.

Tuesday, February 17, 2009
बालकांड - भाग ११
बालकांडाच्या अखेरच्या भागांत राम व त्याचे बंधु यांच्या विवाहाची तपशीलवार हकीगत सांगितली आहे. जनकाच्या निमंत्रणाप्रमाणे दशरथ सर्व कुटुंबियांसमवेत मिथिलेला आला. वसिष्ठ व जनकाचा पुरोहित यांनी एकमेकांच्या कुळांचा इतिहास व महिमा एकमेकांस सांगितला. जनकाने आपली दुसरी कन्या लक्ष्मणाला दिली व भावाच्या दोन कन्या भरत शत्रुघ्नांना दिल्या. राम व त्याचे बंधु यावेळी सोळा वर्षांचे होते. सीता रामाला अनुरूप वयाची असे धरले तर ती १२-१३ वर्षांची व इतर बहिणी बहुधा त्याहून लहान म्हणजे बालिकाच होत्या. सीतेच्या प्राप्तीसाठी मागणी करणार्या व नाकारल्यामुळे युद्धाला उभे राहिलेल्या सुधन्वा नावाच्या राजाची कथा येथे येते. त्याचा पराभव करून व त्याला मारून त्याचे राज्य जनकाने आपल्या भावाला दिले. किती वर्षांपूर्वीची ही घटना ते सांगितलेले नाही. फार पूर्वीची असणे शक्यच नाही कारण सीतेचे वय यावेळी १२-१३च होते.
चारही भावांचे विवाह पार पडले. दशरथाबरोबर कैकयराजाचा पुत्र युधाजित, भरताचा मामा, उपस्थित होता. भरताला आजोबांच्या भेटीला नेण्यासाठी तो अयोध्येला आलेला होता. तो विवाहासाठी मिथिलेला आला. कौसल्या-सुमित्रा यांच्या कुळांपैकी कोणी आल्याचा उल्लेख नाही. कौसल्या नावावरून कोसल देशाची राजकन्या असावी. तिला माहेराहून संपत्ति, गावे, मिळालेली होतीं असा पुढे उल्लेख मिळतो. सुमित्र गरीब, नगण्य घराण्यातील असावी. जनकाने हुंडा म्हणून अमाप धन, गायी, वस्त्रे, हत्ती, घोडे, रथ व सैनिकही दिले. दासदासी, रत्नेहि दिली. सीतेबरोबर १०० मैत्रिणीहि दिल्या! देवयानीबरोबर आलेली तिची मैत्रिण शर्मिष्ठा अखेर ययातीकडे पोचली, तसे रामाचे बाबतीत झाले नाही! विवाहसमारंभ आटपल्यावर विश्वामित्र आपल्या वाटेने गेले व दशरथही पुत्र, सुना, सैनिक, सेवकांसह अयोध्येला निघाले. मात्र वाटेत त्याना परशुराम आडवे आले.
त्यानी पूर्वी केलेला क्षत्रिय संहार आठवून दशरथ भयभीत झाला. परशुरामाने शिवधनुष्य तुटणे ही अद्भुत व अचिंत्य अशी घटना आहे असे म्हणून स्वत:चे धनुष्य रामासमोर धरले व म्हटले की ’हे सज्ज करून दाखव व तसे करू शकलास तर माझ्याशी द्वंद्वयुद्ध कर’. दशरथाने गयावया करून ’तुम्ही इंद्राजवळ प्रतिज्ञा करून शस्त्रांचा परित्याग केलेला आहे’ याचे स्मरण दिले. परशुरामाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले! त्याने रामाला पुन्हा म्हटले की विश्व्कर्म्याने बनवलेल्या दोन खास धनुष्यांपैकी एक शिवाने त्रिपुरासुराशी युद्ध करताना वापरले व हे दुसरे विष्णूपाशी होते. पूर्वी एकेकाळी शिव व विष्णू ही धनुष्ये घेऊन युद्धाला सज्ज झाले होते. देवांनी त्यांना शांत केले. शिवावे धनुष्य शिथिल अवस्थेत जनकाच्या पूर्वजांकडे ठेव म्हणून दिले गेले व विष्णूचे हे धनुष्य भृगुवंशीय ऋचीक, नंतर माझा पिता जमदग्नि व नंतर माझ्याकडे आले. शिवधनुष्य तुटल्याचे ऐकून मी हे त्याच्या तोडीचे विष्णु धनुष्य घेऊन आलो आहे तर तू हे सज्ज करून दाखव व मग माझ्याशी द्वंद्व युद्ध कर.’ रामाने धनुष्य सज्ज केले, बाण लावला व म्हटले की ’मी हा बाण तुमच्यावर सोडत नाही पण या वैष्णव बाणाने तुमचे सर्व तपोबल किंवा तुमची द्रुतसंचारशक्ति यांतील एक काहीतरी नष्ट होईल’ परशुराम म्हणाला कीं ’मी सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली व त्याने रात्री कोठेहि निवास करण्याची मला बंदी केली आहे त्यामुळे मला रात्रीपूर्वी महेंद्रपर्वतावर पोंचण्यासाठी द्रुतसंचार शक्तीची गरज आहे तेव्हां ती राहूं दे.’ रामाने त्याचे सर्व तपोबल नष्ट केले. राम हाच आपल्यानंतरचा विष्णूचा अवतार आहे हे जाणून परशुराम तपश्चर्येला निघून गेला. महेंद्रपर्वत कश्यपाला पृथ्वी दान केल्यावर परशुरामाने निर्माण केलेल्या ( वसतीखाली आणलेल्या) नवीन प्रदेशामध्ये होता काय? परशुराम यानंतर रामकथेत कोठेहि नाही, तो थेट महाभारतात पुन्हा अवतरतो. भीष्म व कर्ण हे त्याचे शिष्य त्या कथेत महत्वाचे आहेत. रामायणातील या प्रसंगामध्ये परशुरामाला एवढा कमीपणा देण्याचे काय कारण? राममाहात्म्य वाढवणे एवढेच. असे दिसते की क्षत्रियांमध्ये बलवान व्यक्ति पुन्हा जन्माला आल्या आहेत व झाला एवढा क्षत्रियसंहार पुरे हे परशुरामाला मान्य करावे लागले एवढाच मथितार्थ खरा.
विष्णुधनुष्य नंतर वरुणाला देऊन राम व दशरथ अयोध्येला गेले. लगेचच भरत व बरोबर शत्रुघ्नहि युधाजिताबरोबर कैकयदेशाला गेले. त्यांच्या पत्नी त्यांचेबरोबर गेल्याचा उल्लेख नाही. त्या अल्पवयीन असाव्या. भरत-शत्रुघ्न दीर्घकाळ कैकयदेशाला राहिले असे दिसते कारण रामाला राज्य देण्याचा बेत पुढे आला तोवरही ते परत आलेले नव्हते. मध्यंतरी किती काळ गेला? त्याचा उल्लेख रामायणात तेथे स्पष्ट नाही. त्याबद्दल पुढे विस्ताराने लिहीन. बालकांडावरचे लेखन येथे संपले.

Subscribe to:
Posts (Atom)