Tuesday, May 12, 2009

अयोध्याकांड - भाग ६

सुमंत्र रथात राम-लक्ष्मण-सीता यांना घालून निघाला तो संध्याकाळी तमसातीरावर पोंचला. पाठोपाठ आलेल्या नगरवासीयांचा रामाला परत येण्याचा आग्रह चालूच होता. पहाटे रामाने सुमंत्राला एकट्याला रथ घेऊन उत्तर दिशेला पाठवले व काही वेळाने दुसर्‍या वाटेने परत येण्यास सांगितले. प्रजाजनांचा गैरसमज होऊन ते रथामागोमाग गेले व रथ परत आल्यावर त्यांत बसून राम, लक्ष्मण, सीता दक्षिण दिशेला वनाकडे निघाले. दुसर्‍या रात्रीपर्यंत रथ गंगातीराला पोंचला. गुहकाची भेट होऊन पुढील दिवशीं त्याने रामाला गंगापार केले. सुमंत्राची रथासह रामाबरोबर राहण्याची इच्छा होती पण ’तूं परत गेल्याशिवाय कैकेयीची खात्री पटणार नाही’ असे समजावून रामाने त्याला गंगातीरावरूनच परत पाठवले. आतां तिघेंच वनांत राहिलीं. या वेळी प्रथमच रामाने कैकेयीबद्दल कडवट शब्द उचारले व ’कैकेयी तुझ्या-माझ्या मातेला विषही देईल’ अशी भीति लक्ष्मणापाशी व्यक्त केली. लक्ष्मणाने त्याला समजावले.
रामाने गंगा कोठे ओलांडली? गंगा ओलांडून तो गंगा-यमुनांच्या संगमाजवळ भरद्वाज मुनींच्या आश्रमात पोचला असे म्हटले आहे. तेव्हा हा आश्रम (प्रयाग)अलाहाबादजवळ संगमापाशी यमुनेच्या उत्तरेला असला पाहिजे कारण यमुना ओलांडलेली नव्हती. आश्रम संगमाजवळ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. भरद्वाजांनी स्वागत करून येथेच रहा असे म्हटले पण हा प्रदेश अयोध्येच्या जवळच तेव्हां तें न मानतां भरद्वाजांच्याच सल्ल्याने तेथून दहा कोस अंतरावर चित्रकूट पर्वतावर जाण्याचे ठरले. दुसरे दिवशी भरद्वाजानी चित्रकूटाला जाण्याचा मार्ग समजावून सांगितला त्यांत यमुना ओलांडण्यास सांगितले. त्यावरून चित्रकूट यमुनेच्या दक्षिणेला पण जवळपासच होता असा समज होतो. येथपर्यंत रामाचा प्रवासमार्ग रामायणावरून बराचसा कळतो. यांनंतरचे प्रवासवर्णन भौगोलिक दृष्ट्या धूसरच आहे. यमुना ओलांडण्यासाठी सुकलेल्या बांबूंची नौका वा तराफा लक्ष्मणाने बनवला. त्या रात्री यमुनेच्या तीरावर राहून दुसर्‍या दिवशी चित्रकूटाला पोचले. तेथे वाल्मिकीचा आश्रम होता. त्याचे जवळच लक्ष्मणाने कुटी बनवली. येवढ्या प्रवासामध्ये ४-५ दिवस गेले. भरत येऊन भेटेपर्यंत राम येथेच राहिला. चित्रकूट प्रयागपासून जवळच असावा अशी समजूत होते. त्याबद्दल प्रत्यक्ष परिस्थिती पुढे पाहूं.

No comments:

Post a Comment

Locations of visitors to this page