दशरथाने भरवलेल्या सभेत आपला विचार बोलून दाखवला. ’मी उद्याच रामाला युवराजपदावर नियुक्त करूं इच्छितों’ असे म्हटले. या विचाराला संमति न देण्यासारखे काही कारणच नसल्यामुळे सर्वांनी संमति दिली. दशरथाने लगेच रामाला बोलावून घेऊन त्याला सांगितले कीं ’हा चैत्र महिना आहे, उद्याच पुष्य नक्षत्रावर युवराजपद ग्रहण कर’. तिथीचा उल्लेख त्याने केलेला नाही. कौसल्येलाही हा बेत कळवण्यात आला. दशरथाने पुन्हा रामाला बोलावून व एकांतात भेटून म्हटले कीं ’नक्षत्रे, ग्रह मला प्रतिकूल आहेत व माझ्या मृत्यूची शक्यता आहे. मला मोह होत नाही तोवरच तुला अभिषेक करून घे कारण मनुष्याची बुद्धि चंचल असते.’ पुन्हा आणखी असेहि म्हटले कीं ’जोवर भरत नगराबाहेर मामाकडे आहे तोवरच तुझा अभिषेक होणे मला उचित वाटते. भरत सत्पुरुष आहे पण माणसाचे मन नेहमीच स्थिर असत नाही.’ यावर रामानेहि दशरथाला खोडून काढून भरतावर दृढ विश्वास व्यक्त केला नाही! असा संशय येतो कीं दोघांच्याही मनात भरताबद्दल वा ठरवलेल्या बेताबद्दल काही आशंका असावी.
बेत कळल्यावर साहजिकच कौसल्या, सुमित्रा व खुद्द राम यांच्या महालात आनंदाचे वातावरण पसरले. दशरथाच्या आज्ञेवरून वसिष्ठ रामाकडे येऊन त्याने रामाला व्रतस्थ राहण्यास सांगितले. जनतेतहि बातमी पसरून शहरात आनंदोत्सव सुरू झाला. कैकेयीला याबद्दल कोणीच कळवलेले नव्हते. शहरातल्या आनंदोत्सवावरून प्रथम मंथरेला अभिषेकाचा बेत कळला व ती उद्विग्न झाली. मंथरा कोण होती? ती कैकेयीची माहेराहून आलेली, वयाने मोठी असलेली, खास दासी होती. तिने साहजिकच कित्येक वर्षे अयोध्येत काढली होतीं. कैकेयीची ती अयोध्येतील (खुद्द दशरथ सोडून) एकुलली एक हितचिंतक होती. ती कुरूप होती असे अतिशयोक्त वर्णन केलेले आहे. पण ती मूर्ख किंवा दुष्ट खासच नव्हती! बातमी कळल्यावर ती उद्विग्न व क्रुद्ध झाली. येणार्या संकटाची यथोचित जाणीव तिने लगेचच कैकेयीला करून दिली. कैकेयी व मंथरा यांच्या संवादावरून दोघींच्याही स्वभावावर प्रकाश पडतो व आपल्या मनातल्या ठाम समजुतींना धक्का बसतो. त्याबद्दल सविस्तर पुढील भागात.
Tuesday, March 17, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment