रावणाने मारीचाला म्हटले ’मी तुझा सल्ला फक्त माझ्या बेतात काय कमीजास्त करावे एवढ्यापुरताच विचारला व मदत मागितली, तुझी परवानगी मागितली नाही. बुद्धिमान मंत्री राजाने विचारल्यावरच आपला विचार नम्रपणे, हात जोडून सांगतो! तूं मृगरूपाने राम-लक्ष्मणाना दूर ने, मग मी सीतेला पळवून नेईन. मग तूं कुठेही जाऊं शकतोस. तुला अर्धे राज्य देईन पण तू विरोध केलास तर जबरदस्तीने तुझ्याकडून हे करून घेईनच नाहीतर तुला मारून टाकीन.’ मारीचाने प्रतिकूल विचार पुन्हापुन्हा ऐकवले पण रावण मानेचना तेव्हां नाइलाजाने ’तुझ्या हातून मरण्यापेक्षां रामाचे हातून मरण आलेले बरे’ असे म्हणून कबुली दिली. मारीचाबद्दलच्या आपल्या पूर्वकल्पनांपेक्षां त्याचे वर्तन वेगळे वर्णिले आहे.
बेत ठरल्यावर दोघेहि लगेच आकाशमार्गाने जाणार्या रथाने निघाले. त्यालाच पुढे ’विमानाकार रथ’ असेहि म्हटले आहे. त्यामुळे खूप वेगाने प्रवास करूं शकणारा रथ एवढाच ’विमाना’चा अर्थ अभिप्रेत असावा असे वाटते. हे विमान सीताहरणाच्या वेळी जटायुकडून नष्ट झाले असे पुढे वर्णन आहे. त्या अर्थी हे ’पुष्पक’ विमान नव्हे. तें लंकेत सुखरूप होते. पंचवटीला पोंचल्यावर मारीचाने लगेच मृगरूप धारण केले. पुढचा कथाभाग आपणास परिचित आहे तसाच जवळपास रामायणात आहे. लक्ष्मणाने ’हा मृग म्हणजे मारीच असावा’ असा संशय व्यक्त केला तेव्हां रामाने म्हटले, ’हा मृग असेल तर सीतेला हवे असलेले सोन्याचे कातडे मिळेल आणि हा मारीच असेल तर याला मारलेच पाहिजे कारण याने असेच फसवून इतर शिकार करण्यासाठी रानात आलेल्या राजांना मारले आहे.’ तेव्हां एकटी सीताच फसली होती, रामलक्ष्मणांना सोन्याच्या कातड्याचा लोभ पडला नव्हता! सीतेच्या रक्षणाचे काम लक्ष्मण व जटायु यांच्यावर सोपवून राम मारीचाच्या पाठीवर गेला. खूप दूर गेल्यावर रामाचा बाण लागून मरताना मारीचाने रामाच्या आवाजात ’हा सीते, हा लक्ष्मण’ अशा आर्त हाका मारल्या. सीतेने निष्कारण संशय व्यक्त केला म्हणून नाइलाजाने लक्ष्मण रामाच्या मदतीला गेला. त्याने सीतेला सावध रहाण्यास सांगितले मात्र ’लक्ष्मणरेषा’ असा काहीहि प्रकार रामायणात मुळीच नाही. ती निव्वळ हरदासी कथाच! लक्ष्मणावर नाहक संशय घेताना सीतेने विवेकाची लक्ष्मणरेषा आधीच ओलांडली होती.
Friday, May 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
काका,
ReplyDeleteअतिशय सुरेख आणि वाचनिय लिखाण. लिहित रहा. आम्ही वाचत राहतो. रामायण, महाभारतातील काही विषयांवर चर्चा करावयास आवडेल.
माझा ई-मेल पत्ता pkphadnis@yahoo.com आहे. आपण ई-मेल द्वारे चर्चा करूं शकूं.
ReplyDelete