Saturday, May 8, 2010

अरण्यकांड - भाग ४

राम-लक्ष्मण-सीता पंचवटीत राहू लागल्यावर घडलेला महत्वाचा प्रसंग म्हणजे शूर्पणखेच्या भेटीचा. हा वेळपर्यंत विराध सोडून इतर कोणाही नरभक्षक राक्षसाशी वा रावणाच्या अनुयायाशी रामाची भेट वा झगडा झालेला नव्हता. रावणपक्षाचा एक खर नावाचा प्रमुख वीर, शूर्पणखेचा भाऊ व रावणाचाहि भाउबंद, मोठ्या सैन्यबळासह पंचवटीजवळच जनस्थानात राहत होता. त्याला राम-लक्ष्मण पंचवटीत आल्याचे माहीत नव्हते, पण सान्निध्यामुळे संघर्ष केव्हातरी अटळ होता. खराच्या सैन्यात धनुष्यबाणाने लढणारे वीर थोडेसेच होते. इतर सर्व सैन्य हाताने चालवण्याच्या वा फेकून मारण्याच्या शस्त्रांनी लढणारे होते असे पुढील समरप्रसंगाच्या वर्णनावरून दिसते. हे सर्व स्थायिक नरभक्षक जमातींची असावे.
राम दिसल्यावर शूर्पणखेने त्याची अभिलाषा व्यक्त केली. राम-लक्ष्मणांनी तिची टवाळी केली. तिला राक्षसी म्हटले आहे व विद्रूप असे वर्णन केले आहे तसेच ’सुंदर’ असेहि म्हटले आहे. ती रावणाची बहीण, म्हणजे नरभक्षक जमातीची खासच नव्हती. त्यामुळे तिचे विद्रूप असे वर्णन तिला राक्षसी म्हणण्याशी निगडित आहे. रावण व त्याचे कुटुंब व प्रमुख मंत्री, हे यज्ञसंस्कृति मानणारे होते. यज्ञांचा विध्वंस करणार्‍यांपैकी नव्हते. त्यांचा राम प्रतिनिधित्व करणार्‍या आर्यकुळांशी दीर्घकाळाचा वैरभाव कां होता? सत्तास्पर्धा हे एकच कारण होते काय? आर्यावर्तातील क्षत्रियकुळांशी वैर होते म्हणून तर रावण लंकेमध्ये सुरक्षित राजधानी बनवून राज्य करत होता काय? हे एक न उलगडलेले कोडे आहे. काही वेळ शूर्पणखेची टवाळी केल्यावर राम-लक्ष्मणानी तिला समजावून परत पाठवण्याऐवजी तिला विद्रूप केले याला खरे तर काही सबळ कारण नव्हते. हे मुद्दाम खुसपट काढल्यासारखेच वाटते! जणू राम-लक्ष्मणाना आता, रावणाबरोबर अद्याप न घडलेला, संघर्ष हवाच होता.

1 comment:

  1. माझ्या मते रावण हा सुखदुःखाचा लाभ फक्त इंद्रियांद्वारे घेतला जाऊ शकतो असे मानणार्या यज्ञसंस्कृतीचा प्रतिनिधी होता. सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास यासाठी भौतिक पातळीवरूनच म्हणजे काम्य यज्ञाद्वारेच प्रयत्न झाले पाहिजेत असे ही संस्कृती मानते. राम हा सुखदुःख मनोनिर्मित भावना आहेत असे मानणार्या संस्कृतीचा प्रतिनिधी होता. मनावर ताबा मिळवूनच सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास शक्य आहे असे ही संस्कृती मानते. या संस्कृतीचा यज्ञाना सरसकट विरोध नव्हता तर केवळ काम्य यज्ञाना विरोध होता. राम-रावण युद्ध या दोन संस्कृतीमधील संघर्ष आहे.

    ReplyDelete

Locations of visitors to this page