वानरसमाजाचे प्रमुख किष्किंधेत जमल्यावर, सुग्रीवाने त्याना दिशा वाटून देऊन सीतेचा तपास करण्यासाठी सर्वत्र पाठवले. सीतेला रावणाने नेले आहे हे खरेतर माहीत होते तरीहि सर्व दिशा धुंडाळण्याचे ठरले याचे कारण बहुधा असे कीं रावणाने सीतेला लंकेलाच नेले कीं इतर कोठे याबद्दल खात्री नव्हती. बहुधा खुद्द लंका कोठे आहे व तेथे कसे पोचायचे याचीहि खात्रीलायक माहिती वानरसमाजाला नसावी. राम-लक्ष्मणांना तर ती नव्हतीच. सर्वत्र शोध घेण्याची व्यवस्था केली तरी खुद्द सुग्रीवपुत्र अंगद व हनुमान यांच्या नेतृत्वाखालील समुदाय दक्षिण दिशेला पाठवला गेला तेव्हां लंका त्याच बाजूला कोठेतरी असावी असा तर्क झाला असावा. सर्व वानरप्रमुखांना एक महिन्याची मुदत दिलेली होती.
सुग्रीवाने वानरप्रमुखांना त्यांच्या वाट्याच्या दिशेला कोणता भूप्रदेश लागेल याचे सविस्तर वर्णन ऐकविले. ते वाच्यार्थाने घेतले तर काहीच अर्थबोध होत नाही. त्यामुळे ते काल्पनिक वाटते. रामायणकाळी सर्व भारतदेशाच्या भौगोलिक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान असणे असंभवच म्हटले पाहिजे.
अंगद व हनुमान यांच्या पुढारीपणाखाली गेलेल्या वानरसमुदायाच्या खडतर प्रवासाचेहि सविस्तर वर्णन केलेले आहे तेहि लाक्षणिक अर्थानेच घ्यावे लागते.
महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व कष्ट सोसूनहि सीतेचा ठावठिकाणा न लागल्यामुळे अंगद व इतर वानर फार निराश झाले. आपण हात हलवीत परत गेलो तर सुग्रीवाचा कोप होईल या भीतीने अंगद व इतरानी असा विचार मनात आणला कीं आपण परत जाऊंच नये! त्यावर हनुमानाने समजावून सांगितले कीं ’तुम्ही परत गेलां नाही तरी सुग्रीवापासून तुम्ही कसे वांचाल? तुम्हाला शोधून काढून तो तुम्हाला कठोर शिक्षा केल्यावांचून राहणार नाही. तेव्हां धीर धरून प्रयत्न चालू ठेवलेच पाहिजेत.’
पुढील प्रवासामध्ये वानरगण एका मोठ्या गुहेत अडकले व मग त्या गुहेच्या स्वामिनीच्या कृपेनेच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला असे वर्णन आहे. किष्किंधेपासून पूर्व किनार्यापर्यंत अशी कोणती पर्वताची ओळ व प्रचंड गुहा त्यांना आड आली असेल याचा काहीहि तर्क करतां येत नाही. त्यामुळे ही वर्णने ’काव्य’ म्हणून सोडून देणे भाग आहे. अखेर या वानरगणाची गाठ जटायूचा भाऊ संपाति याचेशी पडली व त्याचेकडून त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली कीं लंका समोर दिसणार्या समुद्रापलिकडे आहे व सीता लंकेतच आहे. संपाति हा गृध्र होता व त्याच्या दीर्घ व तीक्ष्ण दृष्टीमुळे त्याला हे सर्व प्रत्यक्ष दिसत होते असे रामायण म्हणते. हे सर्व लाक्षणिक अर्थानेच घेतले पाहिजे. या भागात समुद्रतीरावर असणार्या मानवसमाजाला लंकेत घडणार्या घटनांची काही माहिती असणे सयुक्तिक वाटते व संपाति त्यांच्या संपर्कात असावा असे मानता येईल.
वानर समाज समुद्रतीरावर पोंचला व आतां समुद्र ओलांडून कसे जाणार याची चर्चा सुरू झाली. सर्व प्रमुख वानरांनी आपले बळ (वय झाल्यामुळे) पुरे पडणार नाही असे म्हटल्यामुळे शेवटी अंगद कीं हनुमान एवढाच पर्याय उरला तेव्हां अंगद हा युवराज व समर्थ असला तरी वयाने व अनुभवाने लहान म्हणून हे काम हनुमानानेच अंगावर घेतले. सीतेच्या शोधासाठी निघताना हनुमानाने रामाकडून खुणेची अंगठी मागून घेतली होती, इतर दिशांना गेलेल्या समुदायपुढार्यांनी तसे केलेले नव्हते. तेव्हां दक्षिण हीच तपासाची महत्वाची दिशा आहे हे सर्वांनी ओळखलेले होते असे दिसते.
हनुमानाने समुद्र ओलांडण्यासाठी ’उड्डाण’ केले असे रामायण म्हणते. ते वाच्यार्थाने घेतले तर प्रष्नच उरत नाही. तर्क करावयाचा तर त्या काळी भारत व लंका याना जोडणारी एक उंचवट्यांची रांग समुद्रात आज आहे तशीच पण आजच्यापेक्षा जास्त वर असली पाहिजे व या छोट्यामोठ्या बेटांच्या रागेचा उपयोग करून, काही पोहून, काही उड्या मारून, धावून, चालून हनुमान लंकेला पोचला असला पाहिजे. मात्र ते सोपे खासच नव्हते. त्याकाळी होड्या होत्या काय? असणार कारण रामाने गंगा नदी गुहकाच्या नौकेवरूनच पार केली होती. मात्र गंगा वेगळी आणि समुद्र वेगळा! पण कठीण कां होईना पण समुद्र ओलांडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे कारण खुद्द रावण व त्याचे सैन्य, भारतात ये-जा करतच होते! या प्रष्नाचा उलगडा होणे कठीण आहे तेव्हां तो वाचकांच्या कल्पनाशक्तीवरच सोडणे आवश्यक आहे.
किष्किंधाकांडाची येथे अखेर होते.
Sunday, February 6, 2011
Wednesday, January 26, 2011
किष्किंधा कांड - भाग ६
वर्षाकाळ संपेपर्यंत राम-लक्ष्मण त्या गुहेच्या आश्रयाने राहिले. रामाला शोक वाटला कीं लक्ष्मण त्याची समजूत करी. शरदऋतु संपल्यावरच रावणावर स्वारी करतां येणार होती. तोवर स्वस्थ बसणे भागच होते.
किष्किंधेत सुग्रीव तारा-रुमा यांच्यासह कामभोगात मग्न होता. शरद संपत आल्यावर हनुमानाने त्याला कर्तव्याची आठवण करून दिली. हनुमान हा राम व सुग्रीव या दोघांचाहि खरा हितकर्ता होता. मग सुग्रीवाने वानरवीर नील याचेकडून सर्व वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश कळवले.
सुग्रीवाकडून काही कळत नसल्यामुळे रामाला राग आला. ’सुग्रीव काही करीत नाही तर लक्ष्मणा तूं जाऊन त्याला आठवण दे व निष्क्रिय राहिलास तर वालीप्रमाणे मी तुलाहि शासन करूं शकतों असे सांग’ असे त्याने लक्ष्मणाला म्हटले. लक्ष्मणाला खूप राग आला पण रामानेच त्याला संयम न सोडण्यास सांगितले. लक्ष्मणाने किष्किंधेस जाऊन सुग्रीवाला कडक भाषेत निरोप कळवला. सुग्रीव अजूनहि कामभोगातच दंग होता. हनुमानाने पुन्हा कर्तव्याची जाणीव करून दिली. ’रामाने लोकापवादाची पर्वा न करतां तुझ्यासाठी वालीला मारले’ याची जाणीव करून दिली. ( वालीचा वध हा रामायणकर्त्याच्या मतेहि दोषास्पद होता हे येथे स्पष्ट सूचित होते!)
लक्ष्मणाचा निरोप मिळाल्यावर सुग्रीवाला भय वाटले. त्याने तारेला लक्ष्मणाला समजावण्यासाठी पाठवले. तिने सांगितले की सुग्रीव स्वस्थ बसलेला नाही. लक्ष्मणाने तरीहि राग सोडला नाही तेव्हां वालीकडून पूर्वी ऐकलेले रावणाचे सैन्यबळ त्याच्या निदर्शनास आणले व मोठ्या सैन्याशिवाय युद्ध विफल होईल हे दाखवून दिले. वानरसमाजाला एकत्र येण्याचे आदेश पाठवलेले आहेत हेहि सांगितले. मग लक्ष्मणाचा राग निवळला. सुग्रीवानेहि विनम्रभाव धरला. हनुमानाकडून पुन्हा सर्व वानरवीरांना समज देऊन दहा दिवसांत किष्किंधेला जमण्यास सांगितले. लक्ष्मण व सुग्रीव दोघानी सैन्य जमत आहे असे रामाला कळवल्य़ावर राम आनंदित झाला. ’सीतेच्या जीविताचा व रावणाच्या निवासस्थानाचा निश्चित ठावठिकाणा लागल्यावर मग पुढचे बेत आखूं’ असे त्याने म्हटले. कितीहि शोक असला तरी रामाचे परिस्थितीचे भान सुटलेले नव्हते! सुग्रीवाच्या मदतीशिवाय आपण एकट्याने काही करू शकत नाही हे त्याला स्पष्ट दिसत होते.

Thursday, January 6, 2011
किष्किंधा कांड - भाग ५
वालीचा वध ग्रीष्म ऋतूच्या शेवटी झाला असा स्पष्ट कालनिर्देश केलेला आढळतो. मात्र महिना, तिथि सांगितलेली नाही. सीताहरण माघ वद्य अष्टमीला झाले होते, त्यानंतर जवळपास तीन महिन्यांचा काळ लोटला होता.
वाली घायाळ होऊन कोसळल्यावर त्याला दिसले कीं आपल्याला रामाचा बाण लागला आहे. त्याने अनेक प्रकारे रामाला वाक्ताडन केले. ’माझे तुमचे काहीहि भांडण वा वैर नसतां, मी तुमच्या राज्याला उपद्रव दिलेला नसतां व मी दुसर्याशी युद्ध करण्यात गुंतलो असतां, लपून राहून मला मारण्याचे तुम्हाला काय कारण? जर आपण युद्धस्थळी माझ्यासमोर येऊन युद्ध केले असते तर माझ्याकडून नक्कीच मारले गेले असतां. सीतेच्या मुक्तीसाठी तुम्हाला मदत पाहिजे होती तर मीहि समर्थ होतो. तुम्ही मला अधर्माने मारले आहे ते कां? त्याचे कारण विचार करून मला सांगा’ असा स्पष्ट जाब विचारला.
यावर रामाने दिलेले उत्तर पूर्णपणे गोलमाल स्वरूपाचे आहे. वालीवर ठेवलेल्या अनेक निरर्थक आरोपांपैकी ’तूं सुग्रीवाच्या पत्नीशीं, जी तुला पुत्रवधूसारखी आहे, कामभोग घेतोस’ हा एकच आरोप खरा होता. मात्र एकीकडे तूं शाखामृग आहेस म्हणून तुझी शिकार करण्याचा क्षत्रिय या नात्याने माझा धर्म आहे’ असे म्हणावयाचे तर दुसरीकडे त्याच्या वर्तनाला सुसंस्कृत मानवसमाजाची नीतिमूल्ये लावावयाची हा प्रकार अशोभनीय होता. ’मी लपून कां मारले कारण तूं शाखामृग म्हणून तुझी शिकार केली’ असे समर्थन केले कारण लपून लढण्याचे दुसरे योग्य कारण देतांच येत नव्हतें! जो आरोप खरा होता तो नंतर सुग्रीवालाहि लागू झाला होता पण त्याला रामाने दोषहि दिला नाही वा शासनहि केले नाहीं. खरे कारण एकच होते कीं वालीला मारून सुग्रीवाला आपलेसे करून घेणे.
रामाचे समर्थन पटो वा न पटो, वालीचा मृत्यु अटळच होता. त्याच्या मृत्यूनंतर तारेने अपार शोक केला. तिनेहि रामाची निंदा केली. हनुमानाने अखेर तिची कशीतरी समजून घातली. आता सुग्रीवाला पश्चात्ताप झाला. ’वालीच्या मनात मला मारून टाकण्याचे कधीहि आले नाही’ अशी त्याने स्पष्ट कबुली दिली. ’मलाहि मारून टाका’ असे तारेने रामाला विनवले. राम व सुग्रीवाने तिचे सांत्वन केले.
वालीची उत्तरक्रिया झाली. (हा वानरसमाज आर्यांच्या चालीरीती पाळणारा कसा काय?) त्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. मात्र वनवासाचे बंधन असल्याचे कारण सांगून रामाने किष्किंधेत जाण्याचे नाकारले. या सर्वामध्ये आणखी काही काळ गेला. ’आता श्रावण महिना सुरू झाल्या’चा रामाचे तोंडी उल्लेख येतो. ’आता वर्षाकाळ असल्यामुळे कार्तिकमासापासून तूं युद्धप्रयत्नाना लाग’ असे रामाने सुग्रीवाला म्हटले. तुंगभद्रेच्या जवळील प्रस्रवण पर्वताच्या गुहेत राम-लक्ष्मण जाऊन राहिले.

Monday, December 6, 2010
किष्किंधा कांड भाग ४
रामाने वालीला मारण्याचे वचन दिले खरे पण सुग्रीवाला खात्री पटली नाही कीं महाबली वालीचा राम बाणाने वध करूं शकेल कीं नाहीं? मग रामाने आपल्या धनुष्याची ताकद एका सालवृक्षावर बाण सोडून दाखवून दिली. एक बाण सात वृक्षांना भेदून गेला हे रामायणातील वर्णन मला अर्थातच अतिशयोक्त वाटते त्यामुळे भावार्थ लक्षात घ्यावयाचा. सुग्रीवाची खात्री पटल्यावर त्याने रामाच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्यावर विसंबून, किष्किंधेत जाऊन वालीला युद्धाचे आव्हान दिले. दोघांचे जोरदार द्वंद्व झाले. राम वालीला बाण मारील हा सुग्रीवाचा भरवसा फोल ठरला. शेवटी मार खाऊन सुग्रीवाला पळावे लागले. ’तुम्ही बाण कां मारला नाही आणि मारायचा नव्हता तर मला कशाला भरीला घातले’ असे सुग्रीवाने रामाला रागावून विचारले. रामाने सारवासारव केली कीं तुम्ही दोघे इतके सारखे दिसत होतां कीं मला ओळखूं येईना व उगीच तुला इजा होऊं नये म्हणून मी हात उचलला नाही. मला वाटते कीं रामाचे मन द्विधा झाले असावे कीं आपण असें लपून राहून बाण मारावा कीं नाहीं?
मग रामाने पुन्हा सुग्रीवाला खात्री दिली कीं पुन्हा वालीला आव्हान दे, यावेळी मी नक्की बाण सोडीन. मग हनुमानाने सुग्रीवाच्या गळ्य़ात एक फुललेली वेल हारासारखी खुणेसाठी घातली! सुग्रीवाने पुन्हा धीर धरून वालीला आव्हान दिले. वाली त्याच्या गर्जना ऐकून संतापला व द्वंद्वाला निघाला. पत्नी तारेने त्याला सावध केले कीं हल्लीच तुमच्याकडून मार खाऊन पळालेला सुग्रीव लगेच पुन्हा आव्हान देतो आहे तेव्हां त्याला कोणीतरी जबरदस्त मदतनीस मिळाला असावा तेव्हां एकट्यानेच द्वंद्वाला जाऊं नये. मात्र सल्ला न जुमानतां वाली युद्धाला गेलाच. रामायण म्हणते कीं वालीच्या अंगावर आभूषणे होतीं व गळ्यात सुवर्णमाला होती व सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ होती त्यामुळे यावेळी रामाला ओळख पटण्याला अडचण पडली नाही! नवल वाटते कीं पहिल्या वेळी हीं आभूषणे वालीच्या अंगावर नव्हतीं काय? दुसरी गोष्ट म्हणजे वालीचा पुत्र अंगद चांगला जाणता झालेला होता व सुग्रीवाला अद्याप अपत्य नव्हतें तेव्हां दोघे जुळे तर नव्हतेच पण वयांतही पुष्कळ फरक असावा. (चंद्रकांत व सूर्यकांत हे मराठी सिनेनट खूप सारखे दिसत खरे पण वयाचा फरक लपत नसे.) तेव्हा पहिल्या वेळी रामाला ओळख पटली नाही हे खरे नव्हे! द्विधा मनस्थिति हे कारण! यावेळी अर्थात रामाचा बाण वर्मीं लागून वाली कोसळला.

Monday, November 29, 2010
किष्किंधा कांड भाग ३
वाली व सुग्रीव यांचेमधील कलहाबद्दल रामाला पूर्वीची काहीहि माहिती नव्हती. वानर हा समुदाय पशूंचा खासच नव्हता कारण त्यांचा व मानवांचा खुलासेवार वाद आणि संवाद होऊं शकत होता. मात्र उत्तर भारतातील ज्या मानवसमूहातून राम आला होता त्यांचा व वानरकुळांचा संबंध आलेला नव्हता. उलट रावणाचा व वाली-सुग्रीवांच्या वानरसमाजाचा संबंध व विग्रह होता असे वर्णनावरून स्पष्ट दिसते. या समाजाचे रीतिरिवाज रामाला अपरिचित होते. वाली व सुग्रीवांचा कलह ही रामायणातील वर्णनावरून एक दुर्दैवी घटना होती. वालीचा सुग्रीवावर राग होण्यास त्याच्या दृष्टीने सबळ कारण घडले होते कारण वालीची वाट पहात न बसतां त्याने राज्य स्वीकारले होते. मात्र तरीहि वालीने सुग्रीवाला ठार मारले नव्हते तर राज्याबाहेर घालवले होते. राज्यावर वालीचाच अधिकार होता. सुग्रीवाची पत्नी वालीने बळकावली होती हा त्याच्यावर प्रमुख आरोप होता. मात्र पूर्वी वाली गुहेत अडकला असताना व (लोकाग्रहास्तव) राज्य चालवताना व वालीवधानंतर सर्वाधिकारी झाल्यावर सुग्रीवानेहि वालीची पत्नी तारा हिला (तिच्या इच्छेने कीं इच्छेविरुद्ध?) पत्नीपद दिलेच. अर्थ इतकाच घेतला पाहिजे कीं वानरसमाजात पतिपत्नी नाते काहीसे ढिलेच होते! त्यामुळे वालीचा अपराध वधाची शिक्षा देण्याएवढा घोर नक्कीच म्हणतां येत नाही आणि रामाला वालीला मारण्याचा काही खास नैतिक अधिकार होता असा दावा करता येत नाही. रामाने सुग्रीवाला वचन दिले त्याचे कारण वेगळे शोधले पाहिजे.
रामाला स्पष्ट दिसत होते कीं सीतेच्या शोधासाठी व रावणावर स्वारी करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार होते. ते अयोध्येहून मिळवतां आले असते पण फार वेळ गेला असता. त्यापेक्षा जवळचा मार्ग म्हणजे दक्षिण भारतातील या प्रबळ वानरसमाजाला आपल्याकडे वळवणे. वालीकडेच मदत मागितली असती तर कदाचित त्यानेहि दिली असती. पुढे वालीने मरणापूर्वी तसे रामाला म्हटले देखील. पण ’गरजू’ म्हणून वालीपुढे जाण्यापेक्षा ’उपकारकर्ता’ म्हणून सुग्रीवाचे साहाय्य घेणे जास्त सन्मानाचे! त्यामुळे वाली-सुग्रीवांच्या कलहाची कथा ऐकल्यावर, योग्यायोग्य, नैतिक-अनैतिकतेचा घोळ घालत न बसतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं ’मी तुझ्या वतीने वालीचा वध करीन’ व त्या बदल्यात सुग्रीवाकडून सीतेचा शोध व सुटका यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे वचन मिळवले.

Wednesday, November 24, 2010
किष्किंधाकांड भाग २
राम-लक्ष्मण सुग्रीवाला भेटण्याच्या हेतूने मतंगवनाच्या परिसरात पोचले. ऋष्यमूक पर्वतावर आसरा घेतलेल्या सुग्रीव, हनुमान व इतरांनी त्याना पाहिले व हे कोण असतील हे त्याना कळेना. हे तरुण, सुदृढ व धनुष्यबाण धारण करणारे मानव आपल्याला मारण्यासाठी वालीकडून आले असावे अशी सुग्रीवाला भीती वाटली कारण तो सदैव वालीच्या भीतीने ग्रस्त होता व जीव मुठीत धरून या भागात वावरत होता. त्याने हनुमानाला सांगितले कीं तू नीट शोध घे कीं हे कोण व काय हेतूने येथे आले आहेत. त्याने हनुमानाला मार्मिक सूचना केली कीं त्यांच्याशी बोलताना अशी काळजी घे कीं तुझे मुख माझ्या दिशेला असेल म्हणजे मला लांबूनहि कळेल कीं हे मित्र कीं शत्रु! हनुमान राम-लक्ष्मणांपाशी आला. त्याने आपला व सुग्रीवाचा परिचय करून दिला व तुम्ही कोण अशी विचारणा केली. त्यावर रामाने खुलासा केला कीं आम्ही सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून त्याला भेटण्यास आलो आहोत. मग हनुमानाने सुग्रीवास आश्वासन देऊन राम-सुग्रीव भेट घडवून आणली. परस्परांनी आपली हकीगत व मदतीची अपेक्षा एकमेकांस सांगितली तेव्हां सहजच दिसून आले कीं दोघांनाहि एकमेकांची गरज आहे. सुग्रीव-वाली यांचेमधील कलहाची हकीगत ऐकल्यावर वालीची बाजू ऐकण्याची वाट न पाहतां रामाने खुशाल सुग्रीवाला वचन दिले कीं मी तुझ्यासाठी वालीला मारीन! सुग्रीवानेहि वचन दिले कीं सीतेच्या शोधामध्ये मी व माझे सर्व अनुचर संपूर्ण सहकार्य़ करूं सीतेने वानरांकडे फेकलेलीं वस्त्रे-आभूषणे समोर ठेवलीं गेलीं व तीं ओळखून रामाने अपार शोक केला. परस्परांनी वारंवार मदतीच्या आणाभाका घेतल्या. हनुमानाने मध्यस्थाचे काम उत्तम पार पाडले व येथून पुढे प्रत्येक प्रसंगात सुग्रीवाचे व रामाचे हित सारख्याच तत्परतेने सांभाळले. रामाने प्रथमच कळलेल्या वाली-सुग्रीव कलहात, न्याय-अन्याय ठरवण्यात वा वालीला भेटण्यात वेळ न घालवता, सरळ एकतर्फी सुग्रीवाची बाजू घेतली, असे कां केले याचा थोडा उहापोह पुढील भागात करूं.
Wednesday, November 3, 2010
किष्किंधा कांड - भाग १
अरण्यकांडावरील लेखन संपून बरेच दिवस झाले काही कारणामुळे पुढील लेखन थांबवले होते. वाचकांपैकी काहीनी उत्सुकता व्यक्त केलेली दिसून आली व तिला प्रतिसाद म्हणून पुढील किष्किंधाकांडाला सुरवात करीत आहें.
या कांडात वर्णिलेल्या कथाभागाचे दोन स्पष्ट भाग जाणवतात. राम-लक्ष्मण व सुग्रीव यांची भेट, मैत्री व परस्परांस मदतीचीं आश्वासने, रामाच्या हस्ते वालीचा मृत्यु, सुग्रीवाने किष्किंधेत व रामाने पर्वतगुहेत पर्जन्यकाळ काढणे व नंतर सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानराना सर्वत्र पाठवणे हा एक भाग आणि इतर दिशाना गेलेल्या वानराना अपयश पण दक्षिण दिशेला गेलेल्या हनुमान अंगदाना समुद्रकिनार्यापर्यंत पोचण्यात यश व मग हनुमानाने समुद्रपार होण्यासाठी सज्ज होणे हा दुसरा भाग. पहिला भाग सुस्पष्ट आहे. वालीमृत्यु हा त्यातील प्रमुख प्रसंग आहे. (मी मुद्दामच वालीवध असा शब्दप्रयोग टाळला आहे.) दुसर्या भागांतील अनेक स्थलवर्णने काव्यमय असलीं तरी न उलगडणारीं आहेत. मी त्याबद्दल काही लिहिणार नाही. पुढील लेखापासून पहिल्या भागाची सुरवात करणार आहें.

Subscribe to:
Posts (Atom)